स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांकडून मिळणारा निर्वाह भत्ता हा देशद्रोह, तर तोच भत्ता घेणार्या म. गांधी यांनाही देशद्रोही ठरवणार का ?
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा सावरकरद्वेष पुन्हा उफाळून वर आला !
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या बुद्धीचा आवाका सर्वांना ज्ञात आहे. त्यासह त्यांची वक्तृत्व शैली अतिसामान्य असल्याचा अनुभव आपण अनंत वेळा घेतला आहे. ‘कर्तृत्वशून्य माणसाने स्वतःची पात्रता ओळखून समाजात वावरावे’, असा एक शिष्टसंमत संकेत आहे. याचे भान नसलेल्या राहुल गांधी यांनी अनेक वेळा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या तेजस्वी पुरुषाचा अवमान केला आहे.
‘गांडुळाने गरुड भरारी घेण्याचे स्वप्न पहावे किंवा स्वतःची गरुडाशी तुलना करण्याचे दु:साहस करावे’, तसा हा प्रकार आहे. तर्कहीन, मूर्खासारखी बडबड करणारे राहुल गांधी यांना ज्ञानयोगी, कर्मयोगी आणि संन्यस्त वृत्तीच्या सावरकर यांच्या चरणरजाशीसुद्धा बरोबरी करता येणार नाही.
१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची महानता इंग्रजांनी जाणणे; पण सुमार बुद्धीमत्ता असलेल्या राहुल गांधी यांना ती न कळणे
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची महानता इंग्रजांसारख्या शत्रूने जाणली होती. हे जाणण्याएवढा राहुल गांधी यांचा अभ्यास नाही. लंडनच्या ‘इंडिया हाऊस’मध्ये सावरकरांचे वास्तव्य होते. सावरकरांसारखा एक बुद्धीमान राजकीय विचारवंत लंडनच्या या वास्तूत रहात होता, त्याचा अभिमान इंग्रजांनी बाळगला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी तशा प्रकारचे स्मृतीचिन्ह सन्मानपूर्वक खास समारंभ आयोजित करून इंडिया हाऊस या वास्तूवर भारताचा थोर क्रिकेटवीर सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत लावण्यात आले.
ही गोष्ट सुमार बुद्धीमत्ता असलेल्या राहुल गांधी यांच्या अधू मेंदूपर्यंत पोचू शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे सूर्यासारखे तेजस्वी आणि स्वयंप्रकाशी आहेत. राहुल गांधी यांची तुलना अंधारात चमकणार्या काजव्यासारख्या सामान्य कीटकाशीही करता येणार नाही.
२. सावरकरांवर टीका करून राहुल गांधी यांनी स्वतःच स्वतःचे वस्त्रहरण करून घेणे
राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती, शौर्य, वीरता, प्रतिकारनिष्ठा, विजिगीषु वृत्ती, अशा शतावधी गुणांनी ज्यांचे जीवन नटलेले आहे आणि ज्यांना स्वतःची संस्कृती, धर्म अन् थोर ऐतिहासिक परंपरा यांचा उत्कट अभिमान आहे, अशा सावरकरांवर टीका करून जगाच्या चव्हाट्यावर राहुल गांधी यांनी स्वत:च स्वतःच्या हातानेच स्वतःचे वस्त्रहरण केले आहे. बुद्धीहीनतेचा कैफ चढलेल्या राहुल गांधींना त्याचे भानही नाही. एवढा पराकोटीचा सावरकरद्वेष त्यांच्या नसानसांत पसरला आहे.
३. ‘सावरकर यांना ब्रिटीश सरकारकडून मिळत असलेला पैसा म्हणजे देशद्रोह’, हा आरोप तथ्यहीन !
सावरकरांच्या जीवनात शिवराय सर्वोच्च स्थानावर आहेत. त्या शिवरायांनाच ‘लुटारू’ म्हणणार्या कुळात राहुल गांधींचा जन्म झाला. अशा कुसंस्काराने मंडित झालेल्या राहुल गांधींना सावरकर देशद्रोही आणि इंग्रज सरकारकडून पैसे घेणारे वाटतात. त्यांनी सावरकरांवर केलेले सर्व आरोप द्वेषभावनेने केले आहेत. त्यामुळे राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. ‘सावरकरांना ब्रिटीश सरकारकडून मिळत असलेला पैसा म्हणजे देशद्रोह’, असा तथ्यहीन आरोप सावरकर यांच्यावर केला जातो.
वास्तविक सावरकर यांना ब्रिटीश सरकारकडून ‘निर्वाह भत्ता’ मिळत होता आणि तो घेणे, हा देशद्रोह ठरत नाही. असा निर्वाह भत्ता मोहनदास करमचंद गांधी यांनाही मिळत होता. सावरकर यांना मिळणारा निर्वाह भत्ता म्हणजे देशद्रोह असेल, तर ब्रिटीश सरकारकडून निर्वाह भत्ता घेणार्या गांधींना सुद्धा देशद्रोही ठरवावे लागेल. ब्रिटीश सरकारकडून निर्वाह भत्ता घेणारे गांधी देशद्रोही नसतील, तर सावरकर सुद्धा देशद्रोही नाहीत; पण ही गोष्ट ठाऊक नसलेल्या राहुल गांधींना कितीही समजावण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांच्या बालबुद्धीत ते शिरत नाही, हेच दुर्दैव आहे.
४. सावरकर यांच्यावर तथ्यहीन आरोप करून राहुल गांधी यांनी स्वतःचे बौद्धिक दिवाळे घोषित करणे
सावरकर यांनी ब्रिटीश सरकारला स्वतःच्या धाकात ठेवले होते. ‘या सावरकरांमुळेच हिंदुस्थानात स्वतःची सत्ता रहाणार नाही’, या भयापोटीच ब्रिटीश सरकारने त्यांना अंदमानच्या कारागृहात ठेवून त्यांचा अनंत छळ केला. त्यांच्या सर्व संपत्तीवर टाच आणली. त्यांचा नित्य वापरायचा चष्मा सुद्धा इंग्रज सरकारने जप्त केला. त्या इंग्रज सरकारकडून सावरकर पैसे घेत होते आणि इंग्रज सरकार सावरकर यांना पैसे देत होते, यावर रात्री झोपेत गादी ओली करणारे छोटे बाळही विश्वास ठेवणार नाही.
तरीसुद्धा पुन्हा पुन्हा असे तथ्यहीन आरोप करून स्वतःचे बौद्धिक दिवाळे निघाल्याचे राहुल गांधी वारंवार सिद्ध करतात. त्यांना सद्बुद्धी प्राप्त व्हावी आणि त्यांची या विकृत मानसिकतेतून कायमची मुक्तता व्हावी, यासाठी त्यांच्यावर प्रेम करणार्यांनी प्रयत्न करावा, एवढीच माफक अपेक्षा !
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक (९.१०.२०२२)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या क्रांतीसूर्यावर आक्षेप घेणे म्हणजे काजव्याने सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखेच हास्यास्पद ! |