जगाची वाटचाल अत्यंत कठीण आणि भयंकर मार्गावर चालली आहे ! – सुरेश प्रभु, माजी केंद्रीय मंत्री
सावंतवाडी – सध्या जागतिक आर्थिक घडी बिघडल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जागतिक आर्थिक मंदीचे सावट येण्याची शक्यता आहे. यासह देशाला पर्यावरणात होणार्या पालटांचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पश्चिम आणि पूर्व या घाटांतील जैवविविधतेचे संरक्षण होण्याची आवश्यकता आहे. आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या जगाची वाटचाल अत्यंत कठीण अन् भयंकर मार्गावर चालली आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी येथे व्यक्त केले.
शहरातील राजवाडा येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी ‘जागतिक पातळीवर मंदी’ या विषयावर बोलतांना प्रभु म्हणाले, ‘‘जागतिक पातळीवर आयात-निर्यात वाढत जाते, तेव्हा आर्थिक प्रगती होते. आर्थिक व्यापार उणावू लागला की, अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे उर्जेवर परिणाम होईल. त्यामुळे अर्थव्यवस्था बिकट होण्याची शक्यता आहे. ‘पुढील काळात मानव जगणार कि नाही’, असा परिणाम करणारी अर्थव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावरील पर्यावरणीय पालटाचा परिणाम होत आहे. जगातील अनेक देशांतील नद्या कोरड्या पडत आहेत. पर्यावरणातील पालट जगाची गंभीर परिस्थिती निर्माण करणारा ठरेल. जगाची परिस्थिती अतीदक्षता विभागात (आय.सी.यू.मध्ये) असल्यासारखी होण्याची शक्यता आहे. जैवविविधता, नद्या हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. पश्चिम घाट आणि पूर्व घाट जागतिक पातळीवर पर्यावरणरक्षण करणारे होते. दोन्ही ठिकाणी परिणाम झाला, तर हवामान पालटाची मोठी शक्यता आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे, ती नष्ट होण्याची भीती आहे. तसे झाले, तर माशांपेक्षा प्लास्टिकच वाढेल. याचे दुष्परिणाम देशाला भोगावे लागतील.’’