दीपावलीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी कार्यवाही करा !
हिंदु जनजागृती समितीचे सुराज्य अभियानाअंतर्गत परिवहन अधिकार्यांना निवेदन
कोल्हापूर, १० ऑक्टोबर (वार्ता.) – सण, उत्सव, तसेच उन्हाळ्याची सुटी या कालावधीत खासगी प्रवासी टॅ्रव्हल्सकडून भरमसाठ तिकीटदर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट चालू आहे. हिंदु जनजागृती समितीने सुराज्य अभियानाच्या अंतर्गत खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट थांबवी, याविषयी गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, तसेच परिवहन आयुक्त यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी २५ ऑगस्ट २०२२ या दिवशी याविषयी करावयाच्या कार्यवाहीचे निर्देश सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांना निर्गमित केले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात तत्परतेने कार्यवाही व्हावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले, तर याच मागणीचे निवेदन सोलापूर येथे साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांना समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनी दिले. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे श्री. चंद्रकांत बराले, शिवसेनेचे करवीरतालुका प्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री. शशिकांत बीडकर, मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. रणजित घरपणकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. कैलास जाधव, श्री. सुरेश शिलेदार, महाराष्ट्र रिक्शाचालक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू जाधव, भाजपचे श्री. सतीश पाटील आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगली – याच मागणीचे निवेदन सांगली येथे साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी यांना देण्यात आले. त्यांनी या संदर्भात त्यांच्या विभागाच्या वतीने कार्यवाही चालू आहे, असे त्यांनी सांगितले.