कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने ६ लाख भाविकांनी घेतले श्री भवानीदेवीचे दर्शन !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री तुळजाभवानीदेवीचे ६ लाख भाविकांनी दर्शन घेतले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा अशा ४ राज्यांतून भाविक दर्शनासाठी आले होते. पौर्णिमेच्या दिवशी शहरात भाविकांचा महापूर दिसून आला. श्री तुळजाभवानीदेवीची सीमोल्लंघन सोहळ्यानंतर चालू झालेली श्रमनिद्रा पूर्ण झाली. तुळजाभवानीदेवीची मंचकी निद्रा पूर्ण झाल्याचा धार्मिक विधी देवीचे भोपे पुजारी यांनी परंपरागत पद्धतीने पूर्ण केला. भिंगार येथील मानाच्या पलंगावरून देवीची मूर्ती मुख्य गाभार्यात चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. घाटशिळ मार्गाने भाविकांना दर्शन मंडपात प्रवेश देण्यात येत होता. ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते ९ ऑक्टोबरचा पूर्ण दिवस श्री तुळजाभवानीदेवीचे दर्शन चालू ठेवण्यात आले होते.
सर्वाधिक भाविक सोलापूर येथून पायी चालत दर्शनासाठी आले होते. या मार्गावरील सर्व वाहतूक दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती. ही वाहतूक बायपास मार्गे ५० किलोमीटर अंतरावरून वळवण्यात आली होती. चालत येण्याच्या मार्गावर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील उद्योगपती, व्यापारी यांच्याकडून अन्नछत्र चालवण्यात आले. तेथे सर्व भाविकांनी स्नान करून आणि जेवून पुढील प्रवास केला.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून सुविधा उपलब्ध करून देण्याची भाविकांची मागणी !
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून तिरुपतीच्या धर्तीवर प्रसादाची व्यवस्था करण्यात यावी. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानकडून सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आम्ही अनेक वर्षांपासून तुळजापूर येथे दर्शनासाठी येतो; मात्र भाविकांच्या सोयीसाठी तुळजापूर येथे कमतरता आहे, असे महिला भाविकांनी सांगितले.