जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरील स्थगिती उठवली ! – दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक
नाशिक – जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरील स्थगिती उठवण्यात आली आहे. १ सहस्र कोटी रुपयांचा निधी संमत झाला असून त्यांपैकी २७५ कोटी रुपये मिळाले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या विकासकामांतील निधीचे न्याय वाटप करणार आहोत. आधी निधी वाटपात असमतोल होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात पालट करणार आहे, अशी माहिती बंदरे आणि खनिजकर्म मंत्री दादा भुसे यांनी येथे दिली. मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली १० ऑक्टोबर या दिवशी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, नाफेडचा कांदा खराब झाल्याने त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सततच्या पावसाने शेतकर्यांच्या पिकांची हानी होत आहे, त्यांचा पंचनामा करून सरकारला अहवाल दिला जाणार आहे. विजेचा जळलेला ट्रान्सफार्मर २-३ दिवसांत दुरुस्त करावा. दिवाळीत वीजपुरवठा खंडित नसावा.
आगामी कुंभमेळ्याच्या संदर्भात दादा भुसे म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी सर्व विभागांनी एकत्र येऊन काम करावे. जनतेच्या सूचनांसाठी पोर्टल बनवणे, त्यावर २-३ मासांत जनतेच्या सूचना घेणार आहोत. सप्तश्रृंगी गडावर वाढती गर्दी लक्षात घेता नवा विकास आराखडा सिद्ध करणार आहोत. आरोग्य शिक्षण यांवर भर देण्यात येईल.
जिल्हा परिषदेच्या १०० शाळा ‘मॉडेल स्कूल’ करणार आहे. शाळा आणि शासकीय रुग्णालये सौरऊर्जेवर चालवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे विजेचे देयक आणि वीज वापर यांची बचत होईल.