मुलायम !
समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तरप्रदेशचे ३ वेळा मुख्यमंत्री राहिलेले, तसेच केंद्रीय संरक्षणमंत्रीपद सांभाळलेले मुलायमसिंह यादव यांचे १० ऑक्टोबर या दिवशी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील अन्य राजकीय नेते आदींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने ३ दिवसांचा ‘राजकीय शोक’ घोषित केला आहे. भगवान श्रीरामाने रावणाच्या वधानंतर लक्ष्मणाला सांगतांना ‘मरणान्ति वैराणि’ असे म्हटले होते, म्हणजे एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संदर्भातील वैर संपते. प्रभु श्रीराम म्हणतात, ‘रावणाला त्याच्या दुष्कृत्याची शिक्षा मिळाली आहे. तो अखेरचा श्वास घेत आहे. तो दुष्ट असला, तरी तो एक विद्वान, वेदसंपन्न, शूर, बलवान, राजकारणी होता, हे आपल्याला विसरता येणार नाही. त्या विद्वत्तेला माझा नमस्कार आहे !’ त्यामुळे हिंदु एखाद्याच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयीचे वैर ठेवत नाहीत. प्रभु श्रीरामांची शिकवण ते आचरणात आणतात. ज्या भाजपने रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये कारसेवा करण्यासाठी रामभक्तांना अयोध्येत बोलावले होते, त्या रामभक्तांवर त्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या मुलायमसिंह यादव यांनी गोळ्या झाडण्याचा आदेश दिला होता. यात शेकडो कारसेवक ठार झाल्याचे म्हटले जाते. ‘अधिकृतरित्या आकडा १०० हून अल्प दाखवण्यात आला असला, तरी तो खरा नाही’, असे भाजपवालेच सांगतात. अनेक मृतदेहांना दगड बांधून ते अयोध्येतील शरयू नदीत फेकण्यात आल्याच्या चित्रफीती भाजपनेच संपूर्ण देशात नंतर दाखवल्या होत्या, हे अनेकांना आजही आठवत असेल. अशा (मुल्ला) मुलायमसिंह यादव यांना पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ हे श्रद्धांजली वाहून त्यांच्या जीवनाविषयी ‘मरणान्ति वैराणि’ यावरून गौरवोद्गार काढतात, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. रावणाला बाण लागल्यावर तो मरणासन्न स्थितीत असतांना प्रभु श्रीरामाने लक्ष्मणाला रावणाकडे जाऊन मार्गदर्शन घेण्यास सांगितले होते. श्रीरामाच्या आज्ञेचे पालन करून लक्ष्मणाने रावणाकडून मार्गदर्शन घेतले होते. ते मार्गदर्शन आजही लोकांना दिशादर्शक आहे.
मुलायमसिंह यांनी कारसेवकांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर पुढच्या निवडणुकीत हिंदूंनी मुलायमसिंह यांच्या पक्षाचा पराभव करून भाजपला सत्तेवर बसवले. कल्याणसिंह मुख्यमंत्री झाले आणि ६ डिसेंबर १९९२ या दिवशी भाजपच्या सत्ताकाळात कारसेवकांनी बाबरीचा ढाचा पाडून गेल्या १ सहस्र वर्षांनंतर शौर्य गाजवले. मुलायमसिंह मात्र पुढे मुसलमानांचे लांगूलचालन करत राहिले आणि श्रीराममंदिराला अन् एकूणच हिंदुत्वाचा विरोध करत आयुष्य घालवले. ते स्वतःला समाजवादी म्हणवून घेत होते; मात्र त्यांच्या समाजवादात हिंदू आणि त्यांच्या धार्मिक भावना यांना स्थान नव्हते; पण मुसलमानांना केवळ स्थानच नाही, तर डोक्यावर बसवून ठेवले होते. समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात राज्यात सर्वाधिक हिंसाचार, दंगली, गुन्हे घडल्याच्या नोंदी आहेत. ‘रावण ब्राह्मण, विद्वान असला, तरी त्याला राक्षस म्हणूनच ओळखले जाते. त्याची हेटाळणीच केली जाते’, हेही तितकेच सत्य आहे, हे कुणीही नाकारणार नाही. मुलायमसिंह समाजवादीपेक्षा ‘कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश देणारी व्यक्ती’ म्हणून हिंदूंच्या लेखी त्यांची ओळख असणार, यातही दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिल्याविषयी कधीही क्षमायाचना केली नाही, हे लक्षात घ्यायला हवे !