अणूयुद्धाचा धोका !
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याच्या घटनेला आता ८ मास झाले आहेत. हे युद्ध अद्याप थांबलेले नाही आणि थांबण्याची शक्यताही दिसत नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना ‘सध्या युद्धाची वेळ नाही’, असे म्हटले होते, त्यावर पुतिन यांनी ‘युक्रेन ऐकत नाही’, असे म्हणत ‘आपल्या हातात काहीच नाही’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला; मात्र या घटनेच्या काही दिवसांनंतर पुतिन यांनी ‘आम्ही कोणतेही शस्त्र वापरण्यास मुक्त आहोत’, असे घोषित केले. त्यामुळे ‘रशिया आता अण्वस्त्रांचा वापर करणार’, असे संपूर्ण जगाकडून म्हटले जात आहे. त्यातच प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्वीट करून ‘अणूयुद्धाची शक्यता जलदगतीने वाढत आहे’, असे म्हटल्याने याविषयीचे गांभीर्य आता अधिक वाढले आहे. मुळात रशिया आणि युक्रेन युद्ध चालू झाल्यावर काही दिवसांतच रशियाकडून अणूबाँबचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती; मात्र तसे काही अजून झाले नसले, तरी ते भविष्यात होणार नाही, असे नाही, हेच आता पुन्हा त्याविषयी होत असलेल्या विधानांवरून लक्षात येत आहे. आता प्रश्न आहे की, जर रशियाने युक्रेनवर अणूबाँब टाकला, तर पुढे काय ? ‘रशियाने अणूबाँबचा वापर केला, तर ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) देश युक्रेनला अणूबाँब देणार का ? किंवा ते रशियावर अणूबाँब टाकणार का ?’, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही ‘युद्धाचा रोख आता युरोपच्या दिशेने वळण्याची शक्यता आहे’, असे म्हटले आहे. याचा अर्थ उद्या रशियाने युक्रेनवर अणूबाँबद्वारे आक्रमण केले आणि त्याविरोधात ‘नाटो’ देशांनी रशियाच्या विरोधात अणूबाँबचा वापरण्याचा प्रयत्न केला, तर रशिया युरोपवर अणूबाँब टाकण्यास मागे-पुढे पहाणार नाही, असे म्हटले जात आहे. जर असे झाले, तर तिसर्या महायुद्धाला तोंड फुटणार, यात शंकाच नाही.
ज्योतिषांच्या मते दुसर्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेने हिरोशिमावर अणूबाँब टाकला, त्या वेळी जी ग्रहस्थिती होती, तशीच स्थिती येत्या २६ ऑक्टोबरनंतर असणार आहे. त्यामुळे अणूबाँब वापराची शक्यता अधिक दिसून येत आहे, अशी चर्चा आहे. अणूबाँबचा वापर गेल्या ८० वर्षांत झालेला नाही. जर वापर झालाच, तर विनाशाखेरीज काहीच या पृथ्वीवर नसणार, हे सर्वांनाच ठाऊक आहे. तो टाळण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, असेच जगालाही वाटत आहे. मोदी यांनी एक पाऊल टाकले होते आणि त्यांनी आणखी एक पाऊल टाकावे, हे जगाच्या भल्यासाठी योग्य ठरेल.
अणूयुद्धाचा धोका पहाता जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे, हे लक्षात घ्या ! |