हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील सहभाग घ्या ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
सोलापूर येथे २२५ हिंदूंच्या उपस्थितीत हिंदूसंघटन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला !
सोलापूर – हिंदूसंघटनाचे कार्य करतांना संख्याबळाची चिंता न करता कार्य करावे. भगवान श्रीकृष्णाच्या वचनानुसार साक्षात् भगवंत आपल्या पाठीशी उभा आहे. सध्या राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेले आघात रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने हाती घेतलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील सहभाग घ्या, असे आवाहन समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्ताने घोंगडे वस्ती येथे ७ ऑक्टोबर या दिवशी आयोजित ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’च्या अंतर्गत ‘हिंदूसंघटन मेळाव्या’त ते बोलत होते.
या वेळी ‘पद्मशाली ज्ञाती संस्थे’च्या माध्यमातून समाजकार्य करणारे श्री. सत्यनारायण गुर्रम, समितीचे जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. या मेळाव्यातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य संघटितपणे करण्याचा निर्धार उपस्थित २२५ धर्मप्रेमींनी केला.
यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘धार्मिक चिन्ह असलेले कपडे परिधान केलेल्या व्यक्तीचे प्रबोधन कसे करावे ?’ आणि ‘पडल्याने अस्थिभंग झाल्यास प्रथमोपचार कसा करावा ?’, या विषयांवर नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विपुल भोपळे यांनी केले, तर या कार्यक्रमाची सांगता हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीचा आता वटवृक्ष झाला आहे ! – सत्यनारायण गुर्रम, पद्मशाली ज्ञाती संस्था२० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंदु जनजागृती समितीचा आता वटवृक्ष झाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात जनजागृती, आंदोलने करण्यात येतात. या कार्यामध्ये धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. |
कृतीशील धर्माभिमान्यांचा समितीच्या वतीने सत्कार !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथील भ्रष्टाचाराच्या विरोधात वैध मार्गाने लढा देणारे पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’चे अध्यक्ष श्री. गणेश लंके आणि श्री तुळजाभवानी मंदिराच्या पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांचा सत्कार श्री. मनोज खाडये यांनी केला.
मनोगत
समितीच्या पाठिंब्यामुळेच या कार्यात आम्हाला यश मिळाले आहे ! – गणेश लंके
सर्वांचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सरकारीकरणाच्या विरोधात कायदेशीर लढाई देतांना हिंदु विधीज्ञ परिषदेने प्रत्येक स्तरावर आम्हाला साहाय्य केले. मंदिरातील अयोग्य प्रकारांच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला समितीच्या माध्यमातून बळ मिळते. प्रत्येक अडचणीमध्ये समितीच्या पाठिंब्यामुळेच या कार्यात आम्हाला यश मिळाले आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी समितीचे साहाय्य झाले ! – किशोर गंगणे
श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात भक्तांनी अर्पण केलेले सोने, चांदी, पैसे यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो. यातील एकाही गोष्टीचा व्यवस्थापनाकडे लेखाजोखा नाही. हिंदु जनजागृती समितीच्या साहाय्यानेच आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठामध्ये यासंदर्भात याचिका प्रविष्ट केली आहे. या लढ्याला यशही प्राप्त होत आहे.
विशेष
१. धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी धर्मावरील आघात रोखतांना आलेल्या अनुभवांचे कथन केले.
२. हिंदु जनजागृती समितीच्या देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी, तसेच विनामूल्य चालू असलेल्या स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके समितीच्या कार्यकर्त्यांनी सादर केली.