पुणे पोलिसांकडून तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा ‘क्लोजर रिपोर्ट’ न्यायालयात प्रविष्ट !
‘फोन टॅपिंग’ प्रकरण
पुणे – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे आणि माजी आमदार आशिष देशमुख यांचे ‘फोन टॅपिंग’ केल्याप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यामध्ये पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये ‘क्लोजर रिपोर्ट’ प्रविष्ट करण्यात आला आहे. शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे ‘फोन टॅप’ करून ते भाजपला पुरवले असल्याच्या, तसेच त्यांनी पुण्यातील कार्यकाळातही त्यांच्या पदाचा अपलाभ घेत अवैध ‘फोन टँपिंग’ केल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्याचे आदेश दिले होते. याविषयी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.