रस्ता रुंदीकरणात जाणारे मारुति मंदिर वाचवा ! – करंजे आणि खेड परिसरातील भाविक-नागरिक यांची मागणी
सातारा, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – जुने वाहतूक परिवहन कार्यालय (आर्.टी.ओ. ऑफिस) ते वाढे फाटा या रस्त्यावर रुंदीकरणाचे काम चालू आहे. या रुंदीकरणात अडथळा ठरणारे ऐतिहासिक मारुति मंदिर विकासकाकडून हटवले जाणार आहे. त्यामुळे हे ऐतिहासिक मारुति मंदिर वाचवण्यात यावे, अशी मागणी करंजे आणि खेड परिसरातील भाविक अन् नागरिक करत आहेत. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक) जिल्ह्यातील महामार्गासमवेतच रहदारीच्या रस्त्यांचेही रुंदीकरण हाती घेण्यात आले आहे. पहिल्याच टप्प्यात जुने वाहतूक परिवहन कार्यालय ते वाढे फाटा या रस्त्यावर रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम युद्धपातळीवर चालू असून त्यामध्ये जरंडेश्वर नाक्यावरील ऐतिहासिक मारुति मंदिर येत आहे. हे मंदिर आहे तिथे राहू द्यावे, अशी मागणी भाविक आणि नागरिक करत आहेत; मात्र ठेकेदार काहीही न ऐकता मंदिरासाठी दुसरी जागा शोधून मंदिर बांधून देण्याची भाषा करत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस १२ मीटर रस्त्याचे रुंदीकरण होणार असून मंदिराला पर्यायी जागा शोधण्याचे काम ठेकेदाराने हाती घेतले असल्याचे समजते.