कवळे (फोंडा, गोवा) येथील सद्गुरु कुवेलकरआजी (वय ८८ वर्षे) यांच्याशी झालेली अविस्मरणीय भेट आणि त्या वेळी त्यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘खरेतर यापूर्वी माझी सनातनच्या सद्गुरु प्रेमा कुवेलकरआजींशी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती आणि माझे त्यांच्याशी भ्रमणभाषद्वारेही कधी बोलणे झाले नव्हते; पण अनुमाने ३ मासांपूर्वी त्यांची सून सौ. रूपा कुवेलकर यांच्याद्वारे त्यांनी मला निरोप पाठवला, ‘गिरिधरला घरी येऊन भेटून जायला सांग.’ तेव्हा मी त्यांना ‘हो. येतो’, असे कळवले; पण माझ्याकडून त्यांच्याकडे जाणे झाले नव्हते. नंतर मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांच्याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा लेख वाचला. तेव्हा ‘आता उशीर न करता लवकरच सद्गुरु आजींच्या दर्शनाला जायला हवे’, असे प्रकर्षाने मला वाटले. मी २७.९.२०२२ या दिवशी सद्गुरु कुवेलकरआजी यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो आणि तिथे १० मिनिटांनीच अन्य ३ साधक-साधिका सद्गुरु आजींना भेटायला आल्या. त्या प्रसंगी आम्हाला निरपेक्ष प्रेमाची अनुभूती देणार्‍या आणि आध्यात्मिकदृष्ट्या बरेच काही शिकवणार्‍या सद्गुरु कुवेलकरआजींशी झालेली अविस्मरणीय भेट, तसेच आम्हाला त्यांच्याविषयी स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवर लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे देत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या सतत अनुसंधानात असणार्‍या  सद्गुरु प्रेमा कुवेलकरआजी !

सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी

सद्गुरु आजींना प.पू. गुरुदेवांविषयी सतत अनुभूती येत असतात आणि घरात प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व सतत जाणवते. त्यांना प.पू. गुरुदेव सूक्ष्मातून योग्य-अयोग्य सांगतात. ‘भगवंत भक्ताच्या सान्निध्यात असतो’, हे सद्गुरु आजींच्या संदर्भात शिकायला मिळते. आश्रम त्यांच्या घराजवळ असला, तरी त्या आश्रमात जाऊन प.पू. गुरुदेवांना भेटू शकत नाहीत आणि प.पू. गुरुमाऊलींची प्राणशक्ती अल्प असल्याने ते पू. आजींना भेटायला जाऊ शकत नाहीत, तरी दोघांची सूक्ष्मातून भेट होतच असते.’

१. निरपेक्ष प्रेमाची अनुभूती देणार्‍या सद्गुरु कुवेलकरआजी यांच्याशी झालेली अविस्मरणीय भेट !

१ अ. सद्गुरु कुवेलकरआजींनी प्रथम भेटीतच दिलेले निरपेक्ष प्रेम पाहून त्यांच्यातील संतत्वाची प्रचीती येणे : आम्ही सद्गुरु कुवेलकरआजींकडे गेल्यावर आम्ही प्रत्येकाने स्वतःचे नाव सांगितले. तेव्हा सद्गुरु आजी म्हणाल्या, ‘‘तुम्ही घरी येण्याची वाट मी पहात होते.’’ त्या पुढे मला म्हणाल्या, ‘‘मी तुमचा गणपति पाहिला (श्री गणेशचतुर्थीला घरी स्थापन केलेल्या श्री गणेशमूर्तीचे छायाचित्र तुझ्या भ्रमणभाष क्रमांकावरील ‘स्टेटस्’वर पाहिले) आणि त्याचे विसर्जन करायला जातांना (व्हिडिओद्वारे) तुझे बाबा, भाऊ आदी कुटुंबियांनाही पाहिले.’’ त्या वेळी प्रथम भेटीतच त्यांचे ते निरपेक्ष प्रेमाचे शब्द ऐकतांना मला वाटले, ‘जणूकाही मी माझ्या सख्याआजीलाच भेटत आहे.’ नंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या विवाहापूर्वीपासूनचा साधनाप्रवास सांगितला. तो ऐकतांना आम्हाला त्यांचा शिर्डीचे संत श्री साईबाबा, त्यांची कुलदेवी कवळे (फोंडा, गोवा) येथील श्री शांतादुर्गादेवी, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आदींप्रतीचा भक्तीभाव अनुभवायला मिळाला.

श्री. गिरिधर वझे

१ आ. सद्गुरु आजींनी थकवा जाणवत असल्याने पलंगावर पहुडणे आणि त्यांनी त्वचा पहाणार्‍या साधकांना ‘ती नीट पहाता यावी’, यासाठी स्वतःचे दोन्ही पाय वर उचलणे : नंतर त्यांची सून सौ. रूपाताई यांनी आम्हाला सांगितले, ‘‘सद्गुरु आजींची त्वचा अतिशय मऊ झाली आहे. ८ दिवसांपूर्वी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ घरी आले होते. तेव्हा त्यांनी सद्गुरु आजींच्या हातांच्या तळव्यांची त्वचा कापसासारखी मऊ झाल्याचे लक्षात आणून दिले. तुम्ही त्यांच्या हाता-पायांना स्पर्श करून पाहू शकता.’’ त्यानुसार त्यांच्या हाताला स्पर्श केल्यावर आम्हाला त्यांची त्वचा कापसासारखी मुलायम जाणवली. नंतर मी त्यांचे चरण पहाण्यासाठी वाकल्यावर सद्गुरु आजींनी ‘त्यांचे दोन्ही चरण आम्हाला नीट पहाता यावेत’, या उद्देशाने पहुडलेल्या स्थितीतच वर उचलले. तेव्हा त्यांच्यातील ‘इतरांचा विचार करणे’ हा गुण पाहून मला अगदी ओशाळल्यासारखे वाटले आणि मी त्यांना म्हणालो, ‘‘आजी, तुम्ही चरण खाली ठेवले, तरी चालेल.’’ चरणांना तेल लावलेले नसतांनाही आध्यात्मिक वैशिष्ट्य म्हणून त्यांच्या त्वचेला वेगळ्याच प्रकारची चकाकी आल्याचे दिसते.

१ इ. सद्गुरु आजींच्या सांगण्यानुसार साधकाने अनुभूती सांगितल्यावर त्यांनी ‘‘तुमच्या पूर्वजांना सद्गती मिळाली’’, असे सांगणे : मग सद्गुरु आजी मला म्हणाल्या, ‘‘साधना करतांना तुला आलेली एखादी अनुभूती सांग.’’ त्या वेळी मी त्यांना एक अनुभूती सांगितली, ‘‘भाद्रपद कृष्ण नवमी (१९.९.२०२२) या दिवशी मी रामनाथी आश्रमात होतो आणि माझे ती. बाबा कुटुंबियांसह घरी महालय श्राद्ध करत होते. तेव्हा तिथे देवतांचे पूजन झाल्यावर आणि पितरांचे पूजन चालू होण्यापूर्वी अध्यात्मातील एक अधिकारी व्यक्ती दत्तावतार श्री  नृसिंह सरस्वती यांची मूर्ती हातात घेऊन स्वतःहून आमच्या घरी आले. नंतर त्यांनी श्राद्धविधीच्या अनुषंगाने श्री नृसिंह सरस्वती यांना प्रार्थना केली. नंतर ती. बाबांनी त्यांना दक्षिणा आणि श्रीफळ अर्पण केले. तेव्हा त्यांनी केवळ खडीसाखर खाल्ली; पण वझे कुटुंबियांना पेढे इत्यादी प्रसाद  देऊन ते परगावी गेले. त्या दिवशी कुटुंबियांनाही श्राद्धविधीतून प्रथमच अतिशय समाधान मिळाले.’’ ही अनुभूती ऐकल्यावर सद्गुरु आजींनी सांगितले, ‘‘तुमच्या पूर्वजांना सद्गती मिळाली.’’ ते ऐकताच गुरुदेवांसह (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासह) सद्गुरु आजींप्रती माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

२. सद्गुरु कुवेलकरआजींची भौतिकदृष्ट्या लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

२ अ. उत्तम दृष्टी : वयाची ४० वर्षे ओलांडल्यावर तरी बहुतांश व्यक्तींना उपनेत्राविना (चष्म्याविना) जवळचे किंवा दूरचे दिसत नाही. याउलट सद्गुरु आजींचे सुपुत्र श्री. नागराज कुवेलकर यांनी सांगितले, ‘‘सद्गुरु आजी अगदी १५ दिवसांपूर्वीपर्यंत उपनेत्राविना दैनिक ‘सनातन प्रभात’ पूर्णतः वाचत असत. सध्या थकव्यामुळे ‘सनातन प्रभात’ केवळ वरवर पहातात.’’

२ आ. स्वावलंबी : सद्गुरु आजींच्या शरिराच्या बहुतांश हाडांवर केवळ त्वचा दिसते. एवढी त्यांची शरीरयष्टी कृश आहे, तरीही त्या कुणाच्याही आधाराविना उठून पलंगावर बसल्या आणि त्यांनी स्वतःच्या हाताने ‘पाठीसाठी आधार’ म्हणून उशी घेतली.

२ इ. उत्तम स्मरणशक्ती : वयाच्या ८९ व्या वर्षीही त्यांची ‘तरुणांनाही लाज वाटेल’, अशी स्मरणशक्ती आहे. रामनाथी आश्रमातून आम्ही ४ साधक-साधिका त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांपैकी एका साधिकेची सद्गुरु आजींशी न्यूनतम १४ वर्षांनी भेट झाली होती. तरीही सद्गुरु आजींनी वर्ष २००८ मध्ये त्यांच्याशी भेट होतांना त्या साधिकेच्या समवेत असलेल्या ५ साधक-साधिकांची नावे सांगितली.

३. सद्गुरु कुवेलकरआजींची जाणवलेली आध्यात्मिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

३ अ. सद्गुरु आजींचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी निरंतर अनुसंधान असते.

३ आ. सद्गुरु आजींच्या मुखकमलावर स्थिरता, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने जाणवतात अन् ती त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात सर्वत्र प्रक्षेपितही होतात.

३ इ. त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या दैवी स्पंदनांमुळे आपले देहभान हरपते आणि वेगळ्याच प्रकारच्या स्थिरतेची अनुभूती येते.

३ ई.  सद्गुरु आजींशी वेगवेगळ्या घटना किंवा प्रसंग यांविषयी संभाषण झाल्यावरही माझे मन अधिकाधिक अंतर्मुख झाले.

३ उ. सद्गुरु आजींच्या मुखकमलातून प्रक्षेपित होणार्‍या निरपेक्ष प्रेमामुळे त्यांच्याकडे गेल्यावर आमची दृष्टी त्यांच्यावर स्थिरावली.

३ ऊ. सद्गुरु आजींकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात न्हाऊन निघणे आणि ‘काही न बोलता शांतपणे त्यांच्यातील दैवी स्पंदनांचा लाभ घ्यावा’, असे वाटणे : सद्गुरु आजींनी काही वेळ आम्हाला त्यांच्या अनुभूती इत्यादी सांगितल्यावर त्यांना थोडा थकवा जाणवला; म्हणून त्या थोडेसे पाणी पिऊन काही मिनिटे शांत पहुडल्या. तेव्हा त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात आम्ही न्हाऊन निघालो. त्यामुळे आम्हा सर्वांना ‘अधिकाधिक वेळ काही न बोलता शांतपणे त्यांच्यातील दैवी स्पंदनांचा लाभ घ्यावा’, असे वाटत होते.

३ ए. सद्गुरु आजींच्या सहवासात मला वेगळीच स्थिरता जाणवली. तिथे आम्हाला ‘कधी २ घंटे झाले ?’, ते कळलेच नाही.

४. सद्गुरु आजींच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी साधकाने मनात आलेला विचार सांगताच त्यांनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या इच्छेनुसार होईल’, असे सहजभावात सांगणे

आम्हाला सद्गुरु आजींच्या सहवासात वरील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे जाणवल्यावर मी कृतज्ञताभावाने सद्गुरु आजींना म्हणालो, ‘‘इथे येण्यापूर्वी माझ्या मनात विचार आला की, परात्पर गुरु कालीदास देशपांडेकाका यांनी सनातनचे पहिले ‘परात्पर गुरु’पद प्राप्त केले. आता काही दिवसांतच आपण (सद्गुरु कुवेलकरआजींनी) सनातनचे दुसरे ‘परात्पर गुरु’पद प्राप्त केल्याचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले घोषित करतील.’’ त्या वेळी सहजभावामध्ये सद्गुरु आजी म्हणाल्या, ‘‘तुम्हा सर्वांची आणि परम पूज्यांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) जशी इच्छा असेल, तसे होईल !’’

५. सद्गुरु आजींकडून निघतांना त्यांनी अतिशय प्रेमाने सर्वांना भरभरून आशीर्वाद देणे आणि ‘‘पुन्हा घरी भेटायला या हां !’’, असे सांगणे

त्या प्रसंगी मी सद्गुरु आजींसमोर हात जोडून प्रार्थना केली, ‘गुरुदेवांना अपेक्षित असे घडण्याच्या दृष्टीने साधनेत येत असलेले सर्व प्रकारचे अडथळे दूर होऊ देत आणि त्यांना अपेक्षित असे लवकरात लवकर मला घडता येऊ दे.’ त्यावर सद्गुरु आजी दोन्ही हात वर उचलून भरभरून आशीर्वाद देतांना म्हणाल्या, ‘‘हो. गुरुदेव सर्वांना घडवणारच आहेत !’’ त्या वेळी सद्गुरु आजींच्या घरून निघण्यासाठी आम्हा साधकांपैकी कुणाचेच मन सिद्ध होत नव्हते. त्या वेळी त्यांना भेटायला अन्य परिचित व्यक्ती आल्याने आम्ही सद्गुरु आजींना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून निघालो. त्या वेळी आम्ही सद्गुरु आजींना काही न सांगताच त्यांनी सर्वज्ञतेने आमची अवस्था जाणली आणि त्या अतिशय प्रेमाने म्हणाल्या, ‘‘घरी पुन्हा भेटायला या हां !’’

६. सद्गुरु आजींच्या हाता-पायांच्या त्वचेतून चैतन्यदायी स्पंदने प्रक्षेपित होणे आणि त्यांचा स्पर्श झालेल्या स्वतःच्या हातांना त्या चैतन्यदायी संवेदना ५ दिवस जाणवणे

मी सद्गुरु आजींच्या घरी त्यांच्या हाता-पायांची त्वचा पहातांना माझ्याकडून दोन्ही हातांच्या ज्या बोटांनी त्यांना स्पर्श केला गेला, त्या त्या ठिकाणच्या माझ्या त्वचेला चैतन्यदायी स्पंदने जाणवली. काही वर्षांपूर्वी सेवेच्या अनुषंगाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना एखादी वस्तू देतांना त्यांच्या हाताच्या बोटांना एक क्षण स्पर्श झाल्यावरही माझ्या हातांच्या त्या त्या बोटांच्या त्वचेला चैतन्यदायी संवेदना बरेच घंटे जाणवत असत आणि त्याद्वारे मला आध्यात्मिक लाभ होत असत. तशी अनुभूती मला सद्गुरु आजींच्या हाता-पायांना स्पर्श केल्यावर आली. नंतर मला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण सूत्र लक्षात आले की, सद्गुरु आजींची भेट झाल्यावर मी रामनाथी आश्रमात परतलो. त्या वेळी प्रवासात त्या चैतन्यदायी संवेदनांचे प्रमाण न्यून झाले. नंतर मी आश्रमात यज्ञाच्या ठिकाणी चैतन्य ग्रहण होण्यासाठी बसल्यावर माझ्या बोटांना जाणवणार्‍या चैतन्यदायी संवेदनांमध्ये अधिक प्रमाणात वाढ झाली. नंतर एक दिवसाने ती स्पंदने जाणवण्यात खंड पडला.

७. सद्गुरु आजींविषयी सूत्रे टंकलिखित करतांना त्यांतून स्वतःवर शक्तीसह चैतन्याचे पुष्कळ झोत प्रक्षेपित होणे

सद्गुरु आजींकडून आश्रमात आल्यावर ४ दिवसांनी मी वरील सूत्रांचे टंकलेखन केले. तेव्हा पुन्हा माझ्या हातांच्या (४ दिवसांपूर्वी सद्गुरु आजींचे हात आणि चरण यांना मी ज्या बोटांद्वारे स्पर्श केला होता,) त्या त्या बोटांच्या त्वचेला त्याच चैतन्यदायी संवेदना जाणवल्या. त्या वेळी वरील लिखाणातून माझ्या तोंडवळ्यावर शक्ती आणि चैतन्य यांचे पुष्कळ झोत प्रक्षेपित झाले अन् माझ्या सभोवती एक प्रकारे चैतन्याचे संरक्षककवच निर्माण झाले.

८. कृतज्ञता

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घडवलेले सनातनचे संत हे अध्यात्माविषयी केवळ तात्त्विक मार्गदर्शन करत नाहीत, तर सर्वाेत्तम गुरूंप्रमाणे अहंकाराचा लवलेशही न बाळगता स्वतःच्या कृतींतून किंवा शब्दातीत माध्यमांतून अध्यात्मातील अनेक सूत्रे शिकवून साधकांकडून साधना करवून घेतात. ही गोष्ट सद्गुरु आजींच्या वरील प्रथम भेटीतूनही प्रकर्षाने लक्षात आली. सध्याच्या कलियुगातही सद्गुरु कुवेलकरआजींप्रमाणे अनेक संत घडवणारे आणि त्यांच्या सहवासातून शिकण्याची संधी देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या पावन चरणी कृतज्ञतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार !’

– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक