शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवले !

  • ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल यांची मागणी !

  • ‘शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)’ अशा नावाचीही मागणी !

मुंबई – शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ ऑक्टोबरच्या रात्री घोषित केला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही.  आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नवे नाव आणि निवडणूक चिन्ह यांची निवड करावी लागणार आहे. १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत नाव आणि चिन्ह यांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच ‘शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)’ अशा नावाचीही मागणी केली आहे. चिन्ह आणि नाव गोठवल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र ‘पोस्ट’ करत ‘जिंकून दाखवणारच !’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

१ ऑक्टोबर १९८९ मध्ये ‘धनुष्यबाण’ या चिन्हाची नोंदणी होण्याआधी शिवसेनेने नारळाचे झाड, रेल्वे इंजिन, तलवार, ढाल, मशाल, कप आणि बशी या चिन्हांचा वापर केला होता.

न्यायदेवता न्याय देईल हा विश्वास आहे ! – उद्धव ठाकरे

मुंबई – न्यायदेवता न्याय देईल असा मला विश्वास आहे. निवडणूक आयोगाने आमचे चिन्ह गोठवले. शिवसेना हे पवित्र नावही गोठवले. निवडणूक आयोगाकडून हा निर्णय अपेक्षित नव्हता. संकटातही संधी असते. ती संधी मी शोधत आहे. त्या संधीचे मी सोने करीन, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारवाईवर ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे प्रतिक्रिया देतांना केले.