प्रभु श्रीरामचंद्र यांचा विज्ञापनातून अवमान करणार्या ‘मंगलम् ऑर्गेनिक्स’ या कापूर बनवणार्या आस्थापनाच्या मालकाची क्षमायाचना !
|
सावंतवाडी (जि. सिंधदुर्ग) – प्रभु श्रीरामचंद्र यांचा विज्ञापनातून अवमान करणार्या ‘मंगलम् ऑर्गेनिक्स’ या कापूर बनवणार्या आस्थापनाचे मालक पंकज दुधोजवाला यांनी समस्त रामभक्त आणि भाविक यांची सार्वजनिक क्षमा (माफी) मागितली आहे. आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर क्षमेचे चलचित्र (व्हिडिओ) संबंधित मालकाने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले आहे. हिंदूंच्या दृष्टीने ही आनंदाची बातमी असली, तरी आस्थापनाच्या मालकाने बांदा येथील रामभक्तांच्या गेले दीड वर्ष चालू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले होते, हे विसरून चालणार नाही.
कापूर बनवणार्या ‘मंगलम् ऑर्गेनिक्स’ या आस्थापनाने दीड वर्षांपूर्वी कापराचे विज्ञापन दूरदर्शवरून प्रकाशित केले होते. त्यात प्रभु श्रीरामचंद्र यांचा अवमान करण्यात आला होता. त्यामुळे भक्तांमध्ये अप्रसन्नता होती. बांदा शहरातील सर्व देवस्थाने, व्यापारी आणि नागरिक यांनी ‘या आस्थापनाचा कापूर वापरायचा नाही, अशी भूमिका घेत ‘त्याग’ आंदोलन चालू केले होते.
‘मंगलम् ऑर्गेनिक्स’ या आस्थापनाने प्रसिद्ध केलेला व्हिडिओ –
गेले दीड वर्ष चालू असलेल्या आंदोलनाची उचित नोंद घेतली न गेल्याने बांदा येथील आशुतोष भांगले यांनी सामाजिक माध्यमांतून राजकीय पक्षांना याची नोंद घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार बांद्याचे सरपंच अक्रम खान यांनी या आंदोलनाची माहिती घेऊन आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांना दिली. त्यानंतर आंदोलनाने प्रभावित झालेल्या आमदार राणे यांनी आंदोलकांची बांदा येथे भेट घेऊन कौतुकही केले होते, तसेच ‘या आस्थापनाला क्षमा मागण्यास भाग पाडू’, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार ‘मंगलम् ऑर्गेनिक्स’चे मालक पंकज दुधोजवाला यांनी क्षमा मागतांना ‘भक्तांच्या भावना दुखावण्याचा आमच्या आस्थापनाचा कोणताही हेतू नव्हता. हे विज्ञापन हटवण्यात आले असून कुणाच्या भावना दुखाल्या गेल्या असल्यास समस्त भक्तांची क्षमा मागत आहे’, असे व्हिडिओत म्हटले आहे.
आंदोलनाची नोंद घेऊन संबंधित आस्थापनाला क्षमा मागण्यास लावल्याविषयी बांद्यातील व्यापारी, आंदोलक आणि नागरिक यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.