थर्माकोल वापरल्याने लातूर येथे महाराष्ट्रातील पहिली दंडात्मक कारवाई
दुकानातून प्रतिबंधित प्लास्टिक आणि ‘थर्माकोल प्लेट्स’ विकत घेऊ नये ! – पृथ्वीराज बी.पी., जिल्हाधिकारी तथा आयुक्त लातूर महानगरपालिका
लातूर – जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहरात प्लास्टिक बंदी या विषयावर प्रभावी कार्यवाही चालू केली आहे. या संदर्भात लातूर नगर प्रशासन विभागाचे सहआयुक्त रामदास कोकरे यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख रमाकांत पिडगे यांच्यासमवेत कचरा संकलनाची पहाणी केली. या वेळी एका नागरिकाने कचर्यामध्ये वापरलेल्या थर्माकोलच्या प्लेट्स आणल्या होत्या. त्यावरून त्याला प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी अधिनियमानुसार ५ सहस्र रुपयांचा तात्काळ दंड आकारण्यात आला.
प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी अधिनियम अधिसूचनेनुसार प्लास्टिक आणि थर्माकोल विक्रेता अन् वापर करणारे दोघेही दंडास पात्र असल्याने हा दंड करण्यात आला. यापुढे दुकानातून प्रतिबंधित प्लास्टिक आणि थर्माकोल प्लेट्स विकत घेऊ नये आणि वापरू नये. अन्यथा आपल्या कचर्यात जरी या गोष्टी आढळल्या, तरी त्या व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना लातूर महानगरपालिका उपायुक्त वीणा पवार यांनी केल्या आहेत. ‘सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियानास सहकार्य करावे’, असे आवाहन लातूर महानगरपालिकेने केले आहे.