रावणदहन केले म्हणून भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा नोंद !
सरकारने गुन्हा त्वरित मागे घ्यावा ! – महाराष्ट्र करणी सेनेची मागणी
१० ऑक्टोबरला उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालणार !
मुंबई – सिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी येथील आदिवासी समाजाला समवेत घेऊन रावणदहनाचा कार्यक्रम केल्याच्या कारणावरून त्यांच्या स्थानिक विरोधकांनी त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवल्याने त्यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधकांनी पोलिसांना धमकावून हा गुन्हा नोंद करण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे. ‘जर गुन्हा नोंद झाला नाही, तर रावल यांच्या घरावर मोर्चा काढून तोडफोड करू’, अशी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांना गुन्हा नोंद करणे भाग पडले, असे समजते.
सौजन्य : TV9 Marathi
रावणदहन केल्याने भाजपच्या आमदारांवर गुन्हा नोंद होणे, हे लज्जास्पद ! – अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना
रावणदहन केल्याने भाजपच्या आमदारांवर गुन्हा नोंद होणे, हे लज्जास्पद आहे. सामाजिक माध्यमांतून ‘रावण हा आदिवासी होता’, अशी दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे ‘रावणदहन केल्यास ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा नोंद करू’, अशी धमकी त्यांना देण्यात आली होती. या अपप्रचारामुळे स्थानिक आदिवासी समाजातील काहींनी त्यांना विरोध केला. प्रत्यक्षात रावण हा ब्राह्मण होता. राजकीय सूडबुद्धीने राष्ट्रवादीचे नेते हेमंतकुमार देशमुख यांनी हे कटकारस्थान केले आहे. त्यामुळे ‘हा गुन्हा तात्काळ रहित करावा’, अशी मागणी आम्ही करत आहोत, असे महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी म्हटले आहे.
हिंदु धर्माचे अस्तित्व संपवण्यासाठी ठिकठिकाणी रावण दहन कार्यक्रमाला विरोध होणे चालू झाले आहे. विविध हिंदु संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांनी हा गुन्हा रहित केला नाही, तर राजपूत महामोर्चा आणि महाराष्ट्र करणी सेना मंत्रालयावर मोर्चा काढून गृहमंत्र्यांना घेराव घालू, असेही सेंगर यांनी म्हटले आहे.