सिद्धेश्वर एक्सप्रेसला चाकांमधील घर्षणामुळे आग लागली !
सोलापूर – सोलापूरहून मुंबईकडे निघालेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाडीच्या चाकांमधील घर्षणामुळे खंडाळा ते कर्जत रेल्वे स्थानक या दरम्यान आग लागली. गाडीमध्ये आग लागल्याची माहिती ‘आर्.पी.एफ्.’च्या सैनिकांना मिळताच श्री सिद्धेश्वर एक्सप्रेस कर्जत रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. आग आटोक्यात येईपर्यंत प्रवाशांना अन्य डब्यात हलवण्यात आले होते. गाडीतील ‘आर्.पी.एफ्.’चे सैनिक आणि तिकीट तपासनीस यांनी तात्काळ अग्नीरोधक यंत्राचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवण्यासाठी ३० मिनिटे गाडी कर्जत स्थानकावर थांबवण्यात आली होती. पुणे विभागातील नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि यंत्रणा घटनास्थळी आल्या. त्यांनी गाडीची पहाणी करून गाडी पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना केली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.