मनात जर दृढ निश्चय असेल, तर कुठल्याही उपासनेने फळ मिळते !
उद्या, ९ ऑक्टोबर २०२२ या दिवशी संत मीराबाई यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
संत मीराबाई आणि राजा भोजराज यांच्यामध्ये ईश्वर, भक्ती अन् साधना यांविषयी झालेले संभाषण येथे दिले आहे.
१. संत मीराबाईंनी राजा भोजराजला ‘ईश्वर निर्गुण-निराकार, सगुण-साकार आणि निराकार चेतन रूपात सृष्टीत भरलेला आहे’, असे सांगणे
राजा भोजराज : लोक म्हणतात, ईश्वर निर्गुण निराकार आहे. तो या साध्या नजरेने दिसत नाही. खर काय आहे ? मला समजत नाही. या माझ्या गुंतलेल्या मनाला बांधू शकेल, असे समाधान अजून मला मिळाले नाही, मीरा !
संत मीराबाई : ईश्वर निर्गुण-निराकार आणि सगुण-साकारही आहे. निराकार चेतन रूपात सृष्टीत भरलेला आहे. त्याच्याविना कुठेही काही नाही. वस्त्रात सूत असते आणि लाटेत पाणी असते, तसा तो सर्वत्र आहे. त्याच्याविना जगात कुठली सत्ता नाही. या गोष्टी ऐकून विश्वास ठेवावा लागतो. श्रद्धा आणि विश्वास यांच्याविना काही हाताला लागत नाही. तो स्वतःचे कार्य करण्यास जाणत नाही. मुलगा कसे जाणेल की, त्याचे वडील कोण आहेत ? मुलाला आईच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा लागतो.
राजा भोजराज : तू पुढे सांग ना, मी ऐकत आहे; परंतु निर्गुण-निराकार म्हणजे आकाश आणि प्रकाश यांचाच भाग आहे. तो प्रसन्न किंवा अप्रसन्न काहीच होत नसतो.
संत मीराबाई : तो सतत जगाला प्रकाश-चेतना देत असतो. त्याचा अनुभव घेतला जातो; परंतु पहाता येणे अशक्य आहे. त्याच्या वाटा पाहू शकत नाही; तरी तो पाहिजे ते घेऊ शकतो. तोच ईश्वर सगुण-साकार आहे. तो प्रेमाने-भक्तीनेच साध्य होत असतो. तो आतला आवाज ऐकून दर्शन देत असतो. (मीराबाईंच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांचा देह थरथर कापू लागला.)
राजा भोजराज : भगवंताची पुष्कळ नावे आणि रूपे आहेत. त्या नामरूपांच्या गोंधळात माणूस भरकटत नाही का ?
संत मीराबाई : त्या भरकटण्यापासून जर स्वतःला वाचवायचे असेल, तर साधा उपाय आहे. जे नामरूप स्वतःला चांगले आणि योग्य वाटेल, त्यालाच पकडून ठेवावे. त्याचाच जप-तप करावा. दुसर्या नावातही माझाच प्रभु आहे, जशा सर्व नद्या शेवटी समुद्राला मिळतात, तसेच सर्व धर्मग्रंथ, सर्व संप्रदाय एकाच ईश्वराच्या दिशेने जातात. सर्वांचा शेवट एकाच ठिकाणी होतो. मनात जर दृढ निश्चय असेल, तर कुठलीही उपासना फळ देत असते.
२. भगवंताच्या कृपेसाठी प्रेम साध्य असून त्याच्या पुढे हृदय उघडून बसायला हवे !
राजा भोजराज : भगवान उपासनेने प्राप्त होतो का ?
संत मीराबाई : नाही, उपासना मनाची शुद्धता करते. संसारात जितके नियम, संयम, धर्म, व्रत, दान, जे-जे लोक करतात, त्या सर्व उपायांनी जन्मोजन्मीची पापे धुतली जातात. सर्व शुद्धी झाल्यावर तुम्हाला भगवंताचे रूप अंतःकरणात दिसते. जसे आरसा पुसून स्वच्छ केल्यावर स्वतःचे मुख त्यात चांगले दिसते. भगवंताच्या कृपेसाठी प्रेम साध्य आहे. त्याच्या पुढे हृदय उघडून बसावे लागते. कुठे लपवाछपवी, स्वार्थीपणा आणि खोटेपणा चालत नाही, तरच तुम्ही त्याच्या अगदी जवळ जाऊ शकता. हे शक्य नसेल, तर दुसरा कुठलाही मार्ग नाही.
३. कानाच्या माध्यमातून वारंवार भगवंताचे रूप-गुण याचे वर्णन ऐकून विश्वास होऊ शकणे
राजा भोजराज : मनुष्याजवळ आपल्या इंद्रियांना सोडून अनुभवाचा दुसरा कोणता उपाय नाही का ? ज्याला पाहिले नाही, जाणले नाही, व्यवहारात दिसत नाही. मग त्यावर प्रेम कसे करणार ?
संत मीराबाई : आपल्याजवळ एक इंद्रिय असे आहे, त्याच्या साहाय्याने भगवंत अंतरी साकार होत असतो. ते इंद्रिय आहे कान ! वारंवार त्याचे रूप-गुण याचे वर्णन ऐकून विश्वास होतो आणि हृदयात ते प्रकाशित होते. त्याद्वारे त्या प्रतिकाची पूजा, उपासना आणि प्रेम आपण करू शकतो.
– शैला पिटकर (साभार : मासिक ‘भक्तीसंगम’)