सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग आणि त्यांचा अंत्यसंस्कार यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे संत पू. चत्तरसिंग इंगळे यांच्या देहत्यागानंतरचा आज दहावा दिवस आहे, त्या निमित्ताने…
‘मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील आणि सध्य रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांनी २९.९.२०२२ या दिवशी रात्री ८ वाजता देहत्याग केला. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) गेले होते. तेव्हा त्यांनी मला पू. काकांची स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर त्यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये भ्रमणभाषवरून सांगितली. ती ऐकल्यावर माझ्या डोळ्यांच्या समोर पू. इंगळेआजोबांचे पार्थिव आणि तोंडवळा समोर आला अन् माझ्याकडून त्यांचे सूक्ष्म-परीक्षण करण्याची सेवा झाली. या सेवेच्या वेळी जाणवलेली सूक्ष्म स्तरावरील सूत्रे येथे लेखबद्ध करून पू. इंगळेआजोबांच्या चरणी श्रद्धांजलीच्या रूपाने सविनय अर्पण करत आहे.
१. देहत्यागापूर्वी २ – ३ दिवस आधी पू. इंगळेआजोबांनी बोलणे न्यून करून शांत होणे, याचा आध्यात्मिक कार्यकारणभाव
पू. इंगळेआजोबांना मृत्यूचे वेध लागल्यामुळे त्यांनी २ – ३ दिवसांपासून मनाचे बाह्य कार्य थांबवून त्यांचे अंतर्मन प्रथम जागृत ध्यानावस्थेत आणि नंतर निर्विकल्प समाधी अवस्थेत नेऊन स्थिर केले. त्यामुळे त्यांचे इतरांशी बोलणे किंवा त्यांना प्रतिसाद देणे, यांसारखे बाह्य कार्य संपुष्टात येऊन त्यांचे चित्त भगवंताच्या चरणी पूर्णपणे स्थिर झाले होते.
२. पू. इंगळेआजोबांची खोली पुष्कळ प्रकाशमान दिसणे, याचा आध्यात्मिक कार्यकारणभाव
पू. इंगळेआजोबांना अथर्ववेदातील महावाक्य ‘अहं ब्रह्मास्मि ।’ याची प्रचीती आली होती. या प्रचीतीमुळे त्यांना ‘मीच ईश्वर आहे’, हे आत्मज्ञान प्राप्त झाले होते. या आत्मज्ञानाचा चैतन्यमय पिवळा प्रकाश त्यांच्या देहातील हृदयमंदिरातून त्यांच्या रहात्या खोलीमध्ये पसरला होता. त्यामुळे त्यांची खोली ज्ञानप्रकाशामुळे उजळून गेली होती.
३. पू. इंगळेआजोबांच्या खोलीत ‘ॐ’ काराचा नाद ऐकू येणे आणि त्यांच्या कपाळावर पांढर्या रंगाचा ‘ॐ’ दिसणे, याचा आध्यात्मिक कार्यकारणभाव
पू. इंगळेआजोबांनी मागील ४ जन्मांमध्ये केलेल्या साधनेमुळे त्यांच्या देहातील पंचमहाभूतांपैकी पृथ्वी, आप, तेज आणि वायु या चार तत्त्वांची शुद्धी झाली होती. या जन्मात त्यांनी केलेल्या व्यष्टी आणि समष्टी साधनेमुळे त्यांच्यातील आकाशतत्त्वाची शुद्धी होण्यास प्रारंभ झाला. आकाशतत्त्व हे पंचमहाभूतांपैकी सर्वाेच्च तत्त्व असून त्यामुळे नादशक्ती जागृत होते. जेव्हा पू. काका दुर्ग येथे धर्म आणि अध्यात्म प्रसाराची सेवा करत होते, तेव्हा त्यांच्यामध्ये सगुण तत्त्व कार्यरत झाले होते. जेव्हा ते सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात वास्तव्यास आले, तेव्हा त्यांच्या साधनेची वाटचाल निर्गुणाकडे चालू झाली. त्यामुळे जेव्हा त्यांनी देहत्याग केला, तेव्हा त्यांच्या शिवात्म्याचे प्रयाण ईश्वराच्या निर्गुण रूपाकडे चालू असल्याची प्रचीती देण्यासाठी त्यांच्या कपाळावर ‘ॐ’ हे चिन्ह उमटले आणि त्यांच्या खोलीत ‘ॐ’ काराचा सूक्ष्म नाद येऊ लागला.
४. पू. इंगळेआजोबांच्या खोलीत भस्माचा दिव्य सुगंध येणे आणि त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तुळशी अन् चंदन यांचा सुगंध येणे, याचा आध्यात्मिक कार्यकारणभाव
पू. इंगळेआजोबांनी मागील काही जन्मांत शिवाची उपासना करून ध्यानयोगानुसार साधना करून शिवाची कृपा प्राप्त केली होती. त्यामुळे जेव्हा पू. इंगळेआजोबांचा देहत्यागाचा क्षण जवळ आला, तेव्हा त्यांना शिवलोकात नेण्यासाठी नंदी आणि शिवगण आले होते. त्यांनी शिवाकडून आणलेले गंगाजल त्यांना पाजले आणि त्यांच्यावर शिवाने अंगावर धारण केलेल्या चिताभस्मातील काही अंश पू. इंगळेआजोबांना लावले. त्यामुळे पू. इंगळेआजोबांच्या खोलीत भस्माचा सुगंध दरवळत होता. त्याचप्रमाणे मागील काही जन्मात पू. इंगळेआजोबांनी श्रीविष्णूची उपासना करून भक्तीयोगानुसार साधना केली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये भगवंताप्रती अनन्यभाव आणि साधकांप्रती प्रीती हे दोन्ही गुण होते. जेव्हा पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा श्रीविष्णूच्या दूतांनी त्यांच्या पार्थिवावर चंदनाची एक समिधा ठेवून त्यांच्या पार्थिवावर तुळशीपत्रांचा हार घातला होता. त्यामुळे पू. इंगळेआजोबांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वातावरणात तुळशी आणि चंदन यांचा सुगंध येत होता. जेव्हा पू. इंगळेआजोबांनी देहत्याग केला, तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्वर्गलोकातील देवतांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली होती. तेव्हा देवतांनी केलेल्या पुष्पवृष्टीतील विविध प्रकारच्या दैवी पुष्पांचे विविध दैवी सुगंध वातावरणात दरवळत होते.
५. पू. इंगळेआजोबांचे ललाट (कपाळ) पांढर्या रंगाच्या प्रकाशाने प्रकाशमान होणे, याचा आध्यात्मिक कार्यकारणभाव
पू. इंगळेआजोबांनी आयुष्यभर केलेल्या साधनेमुळे त्यांच्यावर आदिशक्तीची कृपा होऊन त्यांची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन ती उर्ध्व दिशेने प्रयाण करत होती. त्यामुळे मृत्यूच्या समयी त्यांची कुंडलिनीशक्ती आज्ञाचक्रापर्यंत पोचली होती. जेव्हा पू. इंगळेआजोबांनी देहत्याग केला, तेव्हा त्यांचे प्राण त्यांच्या आज्ञाचक्रातून बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्या कपाळावर दैवी प्रकाशरूपी छटा निर्माण होऊन त्यांचा शिवात्मा तपोलोकाकडे प्रयाण केल्याची प्रचीती त्यांच्या कपाळावरील दैवी प्रकाशातून मिळाली. अशा प्रकारे जेव्हा स्थूल देह ७० टक्क्यांपेक्षा शुद्ध होतो, तेव्हा स्थूल देहावर दैवी चैतन्याची स्थुलातून खूण निर्माण होते. पू. इंगळेआजोबांचा स्थूल देह ८० टक्क्यांपेक्षा शुद्ध झाल्यामुळे त्यांच्या स्थूल देहावर दैवी प्रकाशाची खूण निर्माण झाली.
६. पू. इंगळेआजोबांचा तोंडवळा पिवळा धमक दिसणे, याचा आध्यात्मिक कार्यकारणभाव
पू. इंगळेआजोबांनी देहत्याग केला, तेव्हा त्यांची प्राणज्योत त्यांच्या आज्ञाचक्रातून बाहेर पडली. या प्राणज्योतीमध्ये सामावलेल्या आत्मज्योतीची पिवळसर रंगाची छटा त्यांच्या मुखमंडलावर पसरली. त्यामुळे पू. इंगळेआजोबांच्या तोंडवळ्यावर चैतन्यमय पिवळसर रंगाचा प्रकाश पसरून त्यांचा तोंडवळा पिवळा धमक दिसू लागला. यावरून हे लक्षात येते की, जेव्हा संतांचा देहत्याग होतो, तेव्हा त्यांच्या देहातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य वायूमंडलात प्रक्षेपित होते आणि त्यांच्या पार्थिवावर चैतन्याची खूण निर्माण होते. यालाच ‘संतांच्या दिव्यत्वाची प्रचीची येणे’, असे आध्यात्मिक परिभाषेत म्हणतात.
७. पू. इंगळेआजोबांचा पार्थिव देह तेजस्वी आणि हलका जाणवणे अन् त्यांचे स्नायू कडक न होणे, याचा आध्यात्मिक कार्यकारणभाव
पू. इंगळेआजोबांच्या साधनेचा स्तर आकाशतत्त्वापर्यंत पोचल्यामुळे त्यांच्या देहात पृथ्वी आणि आप या तत्त्वांचे प्रमाण न्यून झाले होते. त्यामुळे त्यांचे पार्थिव हलके जाणवत होते. पू. इंगळे आजोबांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्याचे प्रक्षेपण झाल्यामुळे त्यांचे पार्थिव पुष्कळ तेजस्वी दिसत होते. पू. इंगळेआजोबांच्या प्राणज्योतीने कालचक्रात प्रवेश करून थेट शिवलोकात स्थान प्राप्त केले होते. त्यांच्यावर शिवरूपी साक्षात् महाकाळाची कृपा असल्यामुळे त्यांच्या पार्थिवावर काळाचा परिणाम अल्प प्रमाणात होता होता. त्यामुळे सामान्य व्यक्ती गेल्यावर तिच्यावर काळाचा प्रभाव पडून तिचे पार्थिव कडक होऊन लवकर कुजू लागते. ही प्रक्रिया पू. इंगळेआजोबांच्या संदर्भात न घडल्यामुळे त्यांच्यावर काळाचा अधिक परिणाम झाला नाही आणि त्यांच्या पार्थिवातील स्नायू कडक न होता लवचिक होते.
८. पू. इंगळेआजोबांच्या मुखावर प्रसन्नता जाणवून त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असल्याचे जाणवणे, याचा आध्यात्मिक कार्यकारणभाव
पू. इंगळेआजोबांची भक्ती आणि त्यांच्यावरील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची गुरुकृपा यांच्यामुळे त्यांना आत्मज्ञान होऊन ते आत्मानंद अनुभवत होते. मृत्यूच्या क्षणीही त्यांची वृत्ती स्थिर होऊन त्यांचे चित्त आत्मानंदात लीन झाले होते. त्यांच्या मनातील आत्मानंदाचे प्रतिबिंब त्यांच्या मुखकमलावर पडल्यामुळे त्यांचे मुखकमल प्रसन्न वाटत होते. त्यांच्या देहातून धनंजय वायु मंद गतीने त्यांच्या देहातून बाहेर पडत होता. त्यामुळे त्यांच्या देहाची सूक्ष्मातून हालचाल होऊन त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असल्याप्रमाणे जाणवत होते. ‘संतांच्या देहत्यागानंतर त्यांच्या कुडीतील प्राण गेल्यावरही त्यांच्या देहामध्ये चैतन्याचा वास असतो’, याची ही प्रचीती होती.
९. पू. इंगळे आजोबांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यावर अग्नीच्या ज्वाळा पुष्कळ तेजस्वी दिसणे, याचा आध्यात्मिक कार्यकारणभाव
दिव्यशक्तीत सर्वांत प्राथमिक स्थान अग्नीचे, तर सर्वोच्च स्थान श्रीविष्णूचे आहे. जेव्हा पू. इंगळेआजोबांवर अंत्यसंस्कार विधींच्या अंतर्गत त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला, तेव्हा अग्नीनारायण स्मशानभूमीत प्रकटला आणि तो त्यांच्या चरणांच्या समोर हात जोडून उभा राहिला. त्याने पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवाला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या कालबंधनातून मुक्त करण्यासाठी त्यांच्या भोवती ३ वेळा प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर पू. इंगळेआजोबांच्या पावन चरणांना स्पर्श करून तो अंतर्धान झाला. अंतर्धान झालेल्या अग्नीनारायणाच्या निर्गुण रूपातून त्याचे ‘क्रव्याद’ हे रूप प्रकट झाले आणि त्याने स्थुलातून चितेवर रचलेल्या लाकडांना स्पर्श करून ‘चिताग्नि’ प्रज्वलित केला. पू. इंगळेआजोबांचा चैतन्यदायी पार्थिवाला स्वत:मध्ये सामावून घेतल्यामुळे चिताग्नीमध्ये कार्यरत असलेल्या अग्नीच्या ‘क्रव्याद’ रूपालाही आनंद झाला आणि तो अधिक शुद्ध अन् तेजस्वी झाला. सामान्य मनुष्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ‘क्रव्याद’ अग्नीमुळे मनुष्याच्या पार्थिव देहातील अशुद्धी नष्ट होऊन तो शुद्ध होत असतो. संतांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या चैतन्यदायी पार्थिव देहाला स्पर्श केल्यामुळे ‘क्रव्याद’ अग्नी शुद्ध होतो. यावरून संतांचे सामर्थ्य आपल्या लक्षात येते.
१०. पू. इंगळेआजोबांच्या शिवात्म्यातून विविध प्रकारच्या ज्योती प्रकटणे आणि त्या विविध देवतांमध्ये सामावणे, याचा आध्यात्मिक कार्यकारणभाव
पू. इंगळेआजोबांचा शिवात्मा जसा शिवलोकाकडे प्रयाण करत होता, तसतशी त्यांच्या शिवात्म्यातून आत्मज्योत प्रकटली आणि त्यातून विविध प्रकारच्या ज्योती प्रकटल्या. प्रथम त्यांची प्राणज्योत शिवगणांनी वायुदेवाला दिली. तेव्हा त्यांची प्राणज्योत वायुदेवात विलीन झाली. त्यामुळे त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्ती मिळाली. त्यानंतर त्यांची भक्तीज्योत प्रज्वलित होऊन ती विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी विलीन झाली. त्यामुळे त्यांना सायुज्य मुक्ती मिळाली. त्यानंतर त्यांची ज्ञानज्योत प्रज्वलित होऊन ती शिवाच्या हृदयात विलीन झाली. त्यामुळे त्यांची वाटचाल मोक्षप्राप्तीकडे वेगाने चालू झाली.
१० अ. प्राणज्योत, भक्तीज्योत आणि ज्ञानज्योत यांचे तौलनिक महत्त्व
टीप : आत्मज्योतीमध्ये प्राणज्योत, भक्तीज्योत, ज्ञानज्योत, धर्मज्योत इत्यादी प्रकारच्या ज्योती सामावलेल्या असतात. आवश्यकतेनुसार या ज्योती आत्मज्योतीतून प्रकट होऊन त्यांचे कार्य करतात.
११. पू. इंगळेआजोबांचा शिवात्मा शिवगणांनी शिवलोकात नेणे
तपोलोक आणि सत्यलोक यांच्यामध्ये उच्च देवतांचे लोक आहेत. त्यांचा क्रम गणेशलोक, दत्तलोक, हनुमानलोक, श्रीरामलोक, श्रीकृष्णलोक, श्रीदुर्गालोक आणि सर्वांत वर म्हणजे सत्यलोकाच्या समीप शिवलोक आहे. पू. इंगळेआजोबांची वाटचाल ईश्वराच्या निर्गुण रूपाकडे अधिक प्रमाणात असल्यामुळे शिवगणांनी त्यांचा शिवात्मा शिवलोकात नेला. तेथे त्यांची आत्मज्योत अमरनाथ शिवपिंडीप्रमाणे असणार्या शिवाच्या लिंगरूपी निर्गुण-सगुण रूपात विलीन झाली.
१२. पू. इंगळेआजोबांनी आतापर्यंतच्या २५ जन्मांमध्ये विविध योगमार्गांनुसार केलेली साधना
टीप : ‘आदी भ्रम’ म्हणजे स्वत:ला ईश्वराचा अंश न समजता स्थूल देह समजणे. ‘अनादी भ्रम’ म्हणजे संसाररूपी मायेलाच सत्य समजणे.
कृतज्ञता
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझ्यावर केलेल्या असीम गुरुकृपेमुळे पू. इंगळेआजोबांच्या शिवात्म्याच्या सूक्ष्म प्रवासाचे अवलोकन मला करता आले आणि त्यामागील कार्यकारणभावही उमजला’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१०.२०२२)
|