भारताचे दुसरे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (संरक्षणप्रमुख) लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आशादायी !
२८ सप्टेंबर २०२२ या दिवशी देशाचे दुसरे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लेफ्टनंट जनरल’ अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे ‘इन्फंट्री’ म्हणजे पायदळाचे आहेत. ते ‘गोरखा रायफल्स’ या रेजिमेंटचे असून दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. ते ‘ईस्टर्न कमांड’मधून ‘जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ या पदावरून निवृत्त झाले होते. भारतात सैन्याचे ५ मोठे कमांड असून त्यातील ईस्टर्न कमांड हा भारत-चीन सीमेकडे पहातो.
१. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती हा सरकारचा योग्य निर्णय !
१ अ. शत्रूराष्ट्रांच्या सीमा, आतंकवाद आणि बंडखोरी यांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अनुभवी अधिकारीच आवश्यक असणे : जनरल बिपीन रावत यांचा १० मासांपूर्वी अपघाती मृत्यू झाल्यानंतर ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ पदावर कुणाला नियुक्त करायचे, यावर चर्चा चालू होती. अनेकांच्या मतांनुसार वायूदल किंवा नौदल येथील अधिकारी व्यक्तीची नियुक्त केली जाण्याची शक्यता होती; परंतु शासनाने अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे. भारताला चीन आणि पाकिस्तान सीमेवर भूमी सीमांचे आव्हान आहे, तसेच देशात आतंकवाद, ‘इन्सर्जन्सी’चे (बंडखोरीचे) आव्हान आहे. यासाठी भारताला या क्षेत्रातील अनुभवी अधिकार्याची आवश्यकता होती.
१ आ. जनरल अनिल चौहान यांनी भारतातील सर्वच लढाई क्षेत्रांवर काम केलेले असून त्यांनी आतंकवादविरोधी आघाड्यांमध्ये मोठी भूमिका बजावलेली असणे : ‘आर्मी स्टाफ’चे चीफ (संरक्षणदलप्रमुख) मनोज नरवणे निवृत्त झाल्याने ‘ते या पदावर नियुक्त होतील’, असेही काहींना वाटले होते. मनोज नरवणे हेसुद्धा पुष्कळ अनुभवी असल्याने, तसेच ते सर्वांत उच्च पदाला पोचलेले असल्याने त्यांची नियुक्तीही योग्यच ठरली असती. ‘जनरल चौहान यांची नियुक्ती अतिशय चांगली आहे’, असे म्हणता येईल; कारण भारतातील सर्वच लढाई क्षेत्रांवर जनरल चौहान यांनी काम केले आहे, उदा. त्यांनी काश्मीरमध्ये बटालियन आणि ब्रिगेड कमांड केली आहे. बारामुल्ला भागामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाची अशी ‘१९ डिव्हिजन’ कमांड केली आहे. त्यानंतर त्यांनी लेफ्टनंट जनरल म्हणून ‘III कॉर्प्स्’चे नेतृत्व केले. ‘ईस्टर्न कमांडचे कमांडर इन चीफ’ म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. थोडक्यात त्यांना भारत-चीन सीमेवर लढण्याचा अनुभव आहे. त्यांनी आतंकवादविरोधी आघाड्यांमध्ये मोठी भूमिका बजावलेली आहे. ते पायदळाचे अधिकारी असल्यामुळे त्यांचा भूमीवरील अनुभव अधिक आहे.
१ इ. जनरल चौहान यांच्या अनुभवाचा भारतीय सैन्य आणि तिन्ही सैन्यदले यांना लाभ होईल ! : सरकारने घोषित केल्याप्रमाणे वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत जनरल चौहान ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ म्हणून राहू शकतात. ते २ वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांना ‘नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायजर’ (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) यांच्या कार्यालयामध्ये ‘मिलिट्री ॲडव्हायजर’ (सैन्याचे सल्लागार) म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा कार्यानुभवही अधिक आहे. मला निश्चिती आहे की, त्यांच्या अनुभवाचा भारतीय सैन्य आणि ‘भारतीय आर्म्ड फोर्सेस’ यांना (भूदल, नौदल आणि वायूदल यांना) चांगला उपयोग होईल.
२. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’समोरील आव्हाने !
२ अ. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे पद १० मास रिक्त रहाणे हे शत्रूच्या दृष्टीने योग्य नव्हे ! : जनरल बिपीन रावत हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. त्या वेळी सर्वानुमते भारतीय सैन्यदलाच्या इतिहासामध्ये ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त करणे’, हा एक क्रांतीकारी निर्णय होता. दुर्दैवाने जनरल रावत यांचे काम पूर्ण होण्याआधीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर गेले १० मास ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे पद रिक्त राहिले. असे पद रिक्त ठेवणे हेही शत्रूला चांगला संदेश देत नाही; परंतु आता जनरल चौहान यांची तेथे नियुक्ती झाली आहे. त्यामुळे ते आता आपल्या कामास प्रारंभ करतील. यामुळे सैन्याच्या तिन्ही दलांमधील समन्वय चांगला होईल.
२ आ. चीन आणि पाकिस्तान यांचे मोठे आव्हान भारतासमोर असणे : भारतासाठी ‘थिएटर कमांड’ सिद्ध केले जाणार होते, उदा. लँड थिएटर कमांड, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड, चीन आणि पाकिस्तान यांच्या विरुद्ध एक एक कमांड, १ पेनिन्सुलार कमांड, एअर डिफेन्स कमांड आदी. या सर्व महत्त्वाच्या कामांचा आरंभ होईल. चीन आणि पाकिस्तान यांचे आपल्यासमोर आव्हान आहे. ते येणार्या काळामध्ये अल्प होण्याची जराही शक्यता नाही. उलट चीन आणि पाकिस्तान केवळ आपल्याला पारंपरिक युद्धामध्ये आव्हान देतील, असे नाही. चीन आणि पाकिस्तान यांचे आव्हान ‘हायब्रिड युद्ध’(एकही गोळी न चालवता युद्ध पुकारणे), ‘अनरेस्ट्र्रिक्टेड वॉरफेअर’(अनिर्बंध युद्ध), ‘ग्रे झोन वॉरफेअर क्षेत्र’ (जेथे युद्धही नाही आणि शांतताही नाही), ‘मल्टीडोमेन वॉरफेअर क्षेत्र’ (वैचारिक युद्ध) यांमध्ये आहे.
जनरल चौहान हे तिन्ही सैन्यदलांचा ‘हायब्रिड’ युद्धासाठी चांगला उपयोग करतील. जिथे आपल्याला चीन त्रास देतो, तिथे आपल्याला ‘मिलिटरी रिस्पॉन्स’ (सैनिकी प्रत्युत्तर) द्यायचा आहे. ते सर्व न्यून करण्याचे कार्य जनरल चौहान चांगल्या पद्धतीने करतील, याविषयी माझ्या मनामध्ये काही शंका नाही.
३. ‘बेटर लेट दॅन नेव्हर’ ! (कधीहीपेक्षा उशिरा चांगले)
जनरल चौहान यांची नियुक्ती हा अतिशय चांगला निर्णय आहे. त्यासाठी शासनाचे कौतुक करायला हवे. ही नियुक्ती आणखी लवकर झाली असती, तर निश्चितच चांगले झाले असते; परंतु ‘बेटर लेट दॅन नेव्हर’ म्हणून आपण जनरल अनिल चौहान यांना त्यांच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा देऊया ! आशा करूया की, येणार्या काळामध्ये भारताची लढणे, आक्रमणे करणे आणि देशाचे रक्षण करणे यांची क्षमता आणखी चांगली होईल अन् भारत अधिक सुरक्षित होईल. यामध्ये जनरल अनिल चौहान यांचे योगदान महत्त्वाचे असेल !
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे