वर्ष २०२० च्या नवरात्रीच्या कालावधीत भाववृद्धी सत्संग ऐकतांना ठाणे येथील साधकांना आलेल्या अनुभूती
१. सौ. शैला घाग, नौपाडा, ठाणे.
१ अ. रुग्णालयात असतांना भाववृद्धी सत्संग आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साधनेविषयी शंकानिरसनाच्या ध्वनीचकती ऐकल्याने मानसिक स्थिती चांगली रहाणे : ‘वर्ष २०२० मध्ये नवरात्रीच्या कालावधीत मला कोरोना झाल्याने मी रुग्णालयात होते. रुग्णालयातील वातावरणामुळे मला आधी थोडी भीती वाटली; पण दुपारचा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ प्रतिदिन घेत असलेला भाववृद्धी सत्संग ऐकतांना मला ‘प्रत्यक्ष देवीच भेटत आहे’, असे अनुभवता येत होते. मला रुग्णालयात त्या सत्संगाचा मोठा आधार वाटायचा. त्यामुळे ‘भाववृद्धी सत्संग कधी चालू होईल ?’, याची मी वाट पहात असायचे. भाववृद्धी सत्संग आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साधनेविषयी शंकानिरसनाची ध्वनीचकती ऐकल्यामुळेच मी रुग्णालयात मानसिकरित्या पुष्कळ चांगली राहू शकले.
१ आ. रुग्णालयातील अन्य रुग्णाला सत्संगाचा लाभ होऊन चांगले वाटणे : रुग्णालयातील माझ्या खोलीत एक पुरुष रुग्ण होते. त्यांनाही भाववृद्धी सत्संग ऐकता यावा; म्हणून मी भाववृद्धी सत्संग भ्रमणभाषच्या ‘स्पीकर’वर लावत होते. ‘त्यांनाही भाववृद्धी सत्संगाचा लाभ होऊन त्यांचाही मानसिक ताण न्यून व्हावा’, असा माझा हेतू होता. भाववृद्धी सत्संग ऐकून त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही प्रतिदिन हे काय लावता ? ते ऐकून मला चांगले वाटते.’’
२. सौ. प्राजक्ता ढगे, नौपाडा, ठाणे.
२ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भाववृद्धी सत्संगात देवींचे वर्णन करतांना देवींमध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे रूप दिसणे आणि ‘सत्संग संपूच नये’, असे वाटणे : ‘नवरात्रीच्या ९ दिवसांत माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला भरभरून चैतन्य मिळाले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भाववृद्धी सत्संग घेत असतांना देवींचे वर्णन करत असत. त्या वेळी मला देवींमध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचेच रूप दिसत होते. ‘महाभयंकर आपत्काळात तरून जाण्यासाठी देवी आपल्याला बळ देत आहे आणि आपत्काळ चालू होईल, त्या वेळी देवाप्रती भाव कसा वाढवायचा ?’, हे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई शिकवत आहेत’, असे मला वाटले. त्या वेळी ‘भाववृद्धी सत्संग संपूच नये’, असे वाटून भाववृद्धी सत्संग संपल्यावरही कितीतरी वेळ मला त्यांचा आवाज ऐकू येत असे.’
३. सौ. विजयालक्ष्मी आमडोसकर, वर्तकनगर, ठाणे.
३ अ. नवरात्रीच्या कालावधीत घरात देवीचे अस्तित्व जाणवणे : ‘नवरात्रीच्या कालावधीत मला घरात देवीचे अस्तित्व जाणवत होते. आमच्या घरी देवीला महानैवेद्य दाखवून नंतर महाप्रसाद ग्रहण केला जात होता. त्या वेळी संपूर्ण घर सुगंधाने भरून गेले होते. यजमान मला प्रतिदिन विचारायचे, ‘‘आज काय विशेष केले आहेस ? चांगले वाटत आहे आणि सुगंधही येत आहे.’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘घरात सूक्ष्मातून देवी आली आहे.’’
४. श्री. विठ्ठल लक्ष्मण कुंभार (अप्पा) कुंभार आणि सौ. विजया विठ्ठल कुंभार, वर्तकनगर, ठाणे.
४ अ. भाववृद्धी सत्संगांत देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन झाल्याने घरातील वातावरणात पालट होणे : ‘पूर्वीचे ऋषिमुनी आणि संत यांना साधनेसाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागले होते. गुरुदेवांच्या कृपेने आपण सहजतेने साधना करू शकतो, हे अनुभवयाला मिळाले. नवरात्रीच्या कालावधीतील भाववृद्धी सत्संगांत आम्हाला देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन झाले. तेव्हापासून घरातील वातावरणात पालट झाला आहे. हे केवळ गुरुदेवांच्या कृपेने झाले. त्यासाठी श्री गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
|