क्रांतीकारक नेता : प्रा. सुभाष वेलिंगकर !
प्रा. सुभाष वेलिंगकर यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
आज ७.१०.२०२२ या दिवशी असलेला प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा ७५ वा वाढदिवस आणि ९.१०.२०२२ या दिवशी असलेला त्यांचा अमृत महोत्सव सोहळा या निमित्ताने…
१. अनेक गुणांचा संचय असणे
प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या प्रीत्यर्थ त्यांनी केलेल्या एकंदर कार्यासंबंधी काही नोंदी करण्याची संधी त्यांच्यावरील गौरवग्रंथाच्या निमित्ताने मला प्राप्त झाली. जाणकारांचा मिळणारा उत्तम प्रतिसाद, जनतेशी उत्कृष्ट असा व्यवहार असणे, निरपेक्ष भावना, श्रद्धाभाव, तत्त्वनिष्ठ विचारसरणी, बाणेदार वृत्ती, जनतेशी असलेला निर्मळ मैत्रभाव, सर्वांविषयी असलेला जिव्हाळा, लेखनाद्वारे अभिव्यक्त केलेले चिंतन, सभा-संमेलनांतून ठामपणे मांडलेली मते, विचारांचे सौंदर्य, तत्त्वबोध घडवणारे भाष्य, अभ्यासपूर्ण प्रस्तावना आदींमुळे प्रा. वेलिंगकर गोमंतकीय जनमानसात सर्वपरिचित आहेत. स्वाभिमानी, शिस्तबद्ध, वक्तशीर, अभ्यासू, कर्तव्यनिष्ठ, चारित्र्यवान, विपुल ज्ञानभांडार असलेला, हरहुन्नरी तथा मनमिळावू, अनेक विषयांवर प्रभुत्व असलेला, विनम्र, महत्त्वाकांक्षी, हाती घेतलेले काम पूर्ण करण्याचा दृढविश्वास असलेला, माणूस पारखी, शुद्ध आचरणाचा, समृद्ध, सुबुद्ध आणि सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी आयुष्यभर झटणारा, स्वार्थासाठी तडजोड न करणारा, समाजकार्यात हिरीरिने आणि झोकून देऊन सहभाग घेणारा, अफाट मनोधैर्य आणि ताकद असलेला, प्रचंड कल्पनाशक्तीचा, प्रसन्न व्यक्तीमत्त्वाचा, सर्वांना पित्याची माया देणारा आदी अनेक गुणांमुळे ‘मरावे परि कीर्तिरूपे उरावे’ ही उक्ती त्यांनी सार्थ करून दाखवली आहे.
२. क्रांतीकारक नेता !
प्रा. वेलिंगकर यांनी सहस्रो विद्यार्थ्यांना घडवले. विद्यार्थ्यांवर मनापासून प्रेम केले. कित्येक सामाजिक चळवळींना हातभार लावला, तर काही चळवळी आणि आंदोलने यांचे नेतृत्व केले. अनेकांच्या जीवनातील अंधकार दूर केला. असे समाजसेवक अपवादानेच सापडतील. गोव्यातील ते क्रांतीकारक नेते आहेत. ‘ज्याच्या हाती विद्येची दोरी, तो जगाला उद्धरी !’ हीसुद्धा उक्ती त्यांनी सार्थ ठरवली आहे. प्रा. वेलिंगकर यांचे वाचन प्रचंड आहे. त्यांच्या एकंदर यशामागे त्यांच्या सौभाग्यवतीने दिलेले प्रोत्साहन महत्त्वपूर्ण आहे. मातापित्यांनी त्यांना उत्तम संस्कार दिल्याने त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली. ते अजातशत्रू आहेत आणि प्रत्येकाच्या चिरस्मरणात ते नेहमीच रहातील. अनेक संकटे आली, तरी ते लाचार बनले नाहीत, तर संकटांशी धैर्याने लढून ते यशस्वी झाले. ते गोव्याबरोबरच देशालाही भूषणास्पद ठरले आहेत. अशा काही व्यक्तींमुळेच भारत देश आज प्रगतीपथावर आहे.
३. मातृभाषा आणि मातृभूमी यांचा सदैव आदर करणे
प्रा. वेलिंगकर यांनी मातृभाषा आणि मातृभूमी यांचा सदैव आदर केला. ‘जननी जन्मभूमीश्च, स्वर्गादपी गरियसी’ (अर्थ : स्वर्गापेक्षाही जन्मभूमी श्रेष्ठ असणे) याचा विसर त्यांना कधीच पडला नाही. ‘हा देश माझा आहे’, या भावनेतूनच त्यांनी देशात राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि स्वराज्य यांचा पुरस्कार नेहमीच केला. शिक्षण हे मातृभाषेतूनच असावे, यासाठी ते आग्रही आहेत. ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे निमंत्रक म्हणूनही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. गोमंतकियांच्या रक्षणासाठी त्यांनी अवघे आयुष्य शिक्षण क्षेत्रात घालवले. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून समाज घडवला. सुजाण नागरिक असलेली भावी पिढी सिद्ध करण्याचे दायित्व त्यांनी पेलले. ‘असा जन्म लाभावा, देह चंदनची व्हावा’, या उक्तीनुसार त्यांच्या आयुष्यात सुगंध दरवळत आहे. प्रा. वेलिंगकर हे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांना आदर्श मानून जीवन जगले. ‘शाळा हे साक्षात् मंदिर आहे’, असा भाव ठेवून वागल्याने त्यांना विद्यार्थी दैवत मानत आहेत.
४. आणीबाणीच्या काळात कारावास भोगतांना राष्ट्रकार्याविषयी सदोदित प्रोत्साहन देणे
राष्ट्रभक्त प्रा. वेलिंगकर यांनी गोव्याच्या कानाकोपर्यांतून स्वयंसेवक आणि देशप्रेमी नागरिक घडवले. पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी शाळा आणि महाविद्यालय यांच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘भारतमाता की जय’ या संघटनेची उभारणी करून त्याच्या गोवाभर शाखा चालू केल्या आणि त्या अजूनही कार्यरत आहेत. प्रा. वेलिंगकर यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाही वृत्तीच्या राजवटीच्या विरोधात गोव्यात पुढाकार घेऊन मोर्चे काढले. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली, त्या वेळी प्रा. वेलिंगकर यांनाही कह्यात घेण्यात आले. त्या वेळी मलाही (श्री. चंद्रकांत पंडित यांना) कह्यात घेऊन आमची आग्वाद येथील कारावासात रवानगी करण्यात आली होती. आम्हाला कुणालाही भेटता येत नव्हते, तरीही प्रा. वेलिंगकर सर घाबरले नाहीत, तर उलट त्यांनी आम्हाला प्रोत्साहनच दिले. कारागृहातही प्रतिदिन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा चालवल्या जात. संघाचे काम चालूच होते. आमच्यामध्ये विचारविनिमयही होत होता. ‘सरां’ंचे नम्र वागणे, सर्वांना जुळवून घेणे, जे मिळेल त्या स्थितीत दिवस काढणे हे सर्व आम्ही त्या वेळी कारावासाच्या काळात अनुभवले आहे. या वेळी प्रा. सुभाष वेलिंगकर आणि माझ्याबरोबरच दत्ता भि. नाईक, प्रकाश कवळेकर, बाबा आजरेकर, आनंद चणेकर, डॉ. दुभाषी, जोगळेकर सर, तसेच डिचोली, म्हापसा, पणजी, मडगाव आणि वास्को भागांतील स्वयंसेवक आदींना कह्यात घेतले होते. या आंदोलनात प्रा. सुभाष वेलिंगकर आम्हाला राष्ट्रकार्याविषयी सदोदित प्रोत्साहन देत असत. सुमारे १८ महिने आम्ही कारावास भोगला; परंतु शाखा कधीही चुकवली नाही. ‘सर’ आमच्याबरोबर असल्याने आम्ही कधीच डगमगलो नाही आणि इंदिरा गांधी यांचा नेहमीच निषेध करत राहिलो. शेवटी इंदिरा गांधी यांना निवडणुकीत जनतेने हरवले आणि केलेल्या कर्माची फळे त्यांना मिळाली.
५. अवघे आयुष्य संघासाठी समर्पित करणे
हिंदु जनांचे कैवारी संघाचे संस्थापक प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी संघाच्या कार्यात उडी घेतली. त्यांनी अवघे आयुष्य संघासाठी समर्पित करून संघाचे ते स्वयंसेवक झाले आणि त्यांनी कालांतराने गोव्यात संघ रुजवला. गोवा मुक्तीनंतर वर्ष १९६२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा पणजीत त्या वेळचे संघाचे प्रचारक श्री. भाई सातार्डेकर यांच्याद्वारे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी चालू केली होती. प्रा. सुभाष वेलिंगकर त्या पहिल्या शाखेचे स्वयंसेवक होते. द्वितीय सरसंघचालक प.पू. श्री. गोळवलकरगुरुजी यांचा देशातील शेवटचा प्रवास म्हणजे वर्ष १९७३ मध्ये डिचोलीच्या शाखेला गुरुजींनी दिलेली धावती भेट ! त्या वेळी त्यांच्या दर्शनासाठी वेलिंगकर सरांनी अवघी डिचोलीच जणू शाखेवर आणली होती. गुरुजींचे दर्शन असो अथवा प.पू. सरसंघचालक मा. श्री. मधुकर दत्तात्रेय (बाळासाहेब) देवरस, प.पू. मा. श्री. सुदर्शनजी अथवा प.पू. श्री. राजेंद्रसिंह (रज्जूभैया) असोत, वेलिंगकर सरांनी त्या त्या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अक्षरश: रात्रीचा दिवस केला होता. कार्यपूर्तीसाठी त्यांना उसंतही नसायची. ‘फणसाच्या अंगी काटे, आत अमृताचे साठे’, हे वचन वेलिंगकर सरांना अगदी तंतोतंत लागू पडते.
६. प.पू. डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला आक्षेप घेणार्या शिक्षण अधिकार्याला सडेतोड उत्तर देणे
एकदा शिक्षण खात्याच्या एका अधिकार्याने त्यांच्या विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रपुरुषाच्या प्रतिमांसमवेत लावलेल्या प.पू. डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला आक्षेप घेतला आणि ती प्रतिमा काढण्याची सूचना केली; मात्र प्रतिमा काढण्यास नकार देऊन प्रा. वेलिंगकर म्हणाले, ‘‘प.पू. डॉ. हेडगेवार आणि त्यांचे कर्तृत्व म्हणजे आमची जीवनप्रेरणा आहे.’’ या उत्तराने ते अधिकारी निरुत्तर झाले. ‘संघटनेमुळेच मी मोठा झालो. संघटनेशी प्रतारणा करणे शक्य नाही. उलट स्वाभिमान बाळगू या’, असे वेलिंगकर सरांचे त्या वेळी म्हणणे होते.
७. राष्ट्रभक्त नागरिक घडवणे
वर्ष १९७४ मध्ये सरसंघचालक प.पू. बाळासाहेब देवरस यांचा मडगाव येथील दौरा तेथील शाखेत झाला होता. त्या वेळी आनंद चणेकर यांनी प्रार्थना म्हटली. त्या प्रसंगी प्रा. सुभाष वेलिंगकर सरांना संघाचे प्रचारक श्री. दुर्गानंद नाडकर्णी यांनी गोव्यात संघविस्तारासाठी चांगल्यापैकी साथ दिली. त्याच कालावधीत संघाचे स्वयंसेवक गुरुदास बांदेकर, सप्रे, अधिवक्ता शानबाग, वसंत सबनीस आणि मुकुंद कवठणकर यांनी आणीबाणीच्या वेळी कारावास भोगला. भूमीगत कार्य करणारे अवधूत पर्रीकर, मनोहर पर्रीकर (माजी मुख्यमंत्री), सुभाष देसाई, संजय वालावलकर, विजय आपटे, दिलीप महाले, अनिल सामंत, शशांक कामत, असे अनेक स्वयंसेवक त्या निमित्ताने घडले. उत्कृष्ट राष्ट्रभक्ती, निर्मळ चारित्र्य, निर्भयता, सामर्थ्य, शिष्यवर्गासाठी प्रेरणास्रोत बनणे, जाज्वल्य देशभक्ती, प्रखर ध्येयनिष्ठा, संघाशी प्रामाणिकपणा आदींच्या बळावर त्यांनी कित्येक राष्ट्रभक्त घडवले. स्नेहाने सहस्रो, लाखो हृदये जोडली. हिंदु राष्ट्राचे स्वप्नही पाहिले. प्रा. वेलिंगकर सरांची अथक शक्ती आणि स्फूर्ती यांच्या बळावर वैभवपूर्ण हिंदु राष्ट्र येवो, हिंदु जनांचा विजयघोष त्रिभुवनात होवो, सुंदर आणि सुखद स्वप्न साकार होवो, हीच माझी मनोभावना ! नवीन पिढी घडवणारे प्रा. वेलिंगकर सर दीर्घायू होवोत. त्यांना उत्तम आरोग्य लाभो, हीच माझी सदिच्छा !
– श्री. चंद्रकांत उपाख्य भाई पंडित, म्हापसा, गोवा.