कोल्हापुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसरा संचलन उत्साहात : नागरिकांकडून स्वागत
कोल्हापूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसरा संचलन ५ ऑक्टोबरला उत्साहात पार पडले. शहरातील प्रमुख मार्गांवर स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात संचलन केले. संचलनामध्ये राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबद्ध झालेल्या संचलनाचे स्वागत नागरिकांनी जागोजागी पुष्पवृष्टी करून केले.
विजयादशमीनिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रत्येक वर्षी संचलन करतात. कोल्हापुरात यंदा नांगिवली तालीम, ताराराणी विद्यालय, ८ क्रमांक शाळा, न.पा. हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल या ठिकाणी शहरातल्या वेगवेगळ्या भागातील स्वयंसेवक एकत्र आले. येथून स्वयंसेवक संचलन करत पेटाळा मैदानावर एकत्रित जमले. या ठिकाणी प्रार्थना होऊन मुख्य संचलनाला प्रारंभ झाला. खरी कॉर्नर, महाद्वार रोड, गुजरी कॉर्नर, भुर्के दुकान, रंकाळावेस, साई मंदिर, तटाकडील तालीम, अर्धा शिवाजी पुतळा, मिरजकर तिकटी या मार्गाने संचलन निघाले.
संचलनामध्ये स्वयंसेवकांनी घोषणांतील विविध वाद्यांवर भारतीय रचनांचे वादन केले. या घोष पथकाने सार्यांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक प्रतापसिंह दड्डीकर, जिल्हा संघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ, शहर संघचालक प्रमोद ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती