नाशिक येथे ५ वर्षांनी सप्तश्रृंग गडावर बोकडबळी !
२५ सहस्र भाविकांची उपस्थिती !
नाशिक – येथील सप्तश्रृंग गडावर गेल्या ५ वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या बोकड बळीची प्रथा ५ ऑक्टोबर या दिवशी विधीवत् पार पडली. महाराष्ट्रासह विविध राज्यांतून २५ सहस्र भाविक मंदिरात उपस्थितीत होते. श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात अनुमाने ५ सहस्र भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तश्रृंग गड येथे नवरात्रोत्सवाच्या दशमीनिमित्त विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांनी सपत्नीक श्री सप्तश्रृंगी देवीची महापूजा केली. सकाळी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आले होते. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. प्रतिवर्षीप्रमाणे आश्विन नवमीस गडावर नवमीच्या दिवशी शतचंडी याग आणि होमहवन विधी चालू करण्यात आला. बोकड बळीच्या विधीनंतर पुरोहितांच्या मंत्रघोषात बळीची आहुती देऊन दसर्याचा सोहळा पार पडला.