मैलापाणी थेट नदीमध्ये येत असल्याने पुणे शहराचे ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये नामांकन घसरले !
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे स्पष्टीकरण
पुणे – केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये मुळा-मुठा नदीत येणार्या मैलामिश्रित पाण्यामुळे पुणे महापालिकेचे नामांकन घसरले आहे. त्यामुळे ‘जायका प्रकल्प’ जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुण्याला ‘पंचतारांकित’ शहराचे नामांकन मिळणार नाही आणि पहिल्या पाचमध्येही स्थान मिळवणे अवघड आहे, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहे. सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता, जनजागृती आणि बेशिस्तांना शिक्षा यांवर पालिका भर देणार आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून वर्ष २०१६ पासून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवले जाते. त्याअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर शहरांचे नामांकन घोषित करून त्यांचा सत्कार केला जातो. वर्ष २०२१ मध्ये पुणे शहर ५ व्या क्रमांकावर होते ते घसरून वर्ष २०२२ मध्ये १७ व्या क्रमांकावर आले आहे.
आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘पहिल्या ८ शहरांनी त्यांच्याकडे मैलापाण्यावर १०० टक्के शुद्धीकरण होते, असे दाखवले आहे. त्यामुळे त्यांना पंचतारांकित नामांकन मिळाले. यामध्ये पुणे शहर ५ व्या क्रमांकावरून ९ व्या क्रमांकावर घसरले आहे, तसेच केंद्र सरकारकडून वर्षामध्ये ३ वेळा नागरिकांचा अभिप्राय घेतला गेला, त्यामध्ये २ वेळा अल्प गुण मिळाले. शहरामध्ये मैलापाणी शुद्धीकरण करण्यासाठी ‘जायका प्रकल्पा’चे काम चालू होईल. हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत नामांकन वाढवण्यावर मर्यादा येणार आहेत.’’