वाराणसी आश्रमात झालेल्या श्री वाराहीदेवीच्या होमाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
११.८.२०२० या दिवशी वाराणसी आश्रमात श्री वाराहीदेवीचा होम झाला. त्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. श्रेया प्रभु
१ अ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वाराणसी आश्रमात आगमन होताच मनाची नकारात्मकता आणि निराशा दूर होणे अन् ‘त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आगमन झाले आहे’, असे जाणवणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ वाराणसी आश्रमात येण्यापूर्वी माझ्या मनाची स्थिती थोडी निराशाजनक होती. ‘माझे मन आणि बुद्धी यांवर अधिक आवरण आले आहे’, असे मला वाटत होते. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वाराणसी आश्रमात आगमन होताच माझ्या मनाची नकारात्मकता आणि निराशा दूर झाली. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे आगमन होताच आश्रमातील वातावरण आनंदी झाले. ‘सर्व वृक्ष, झाडे-झुडपे आनंदी झाले आहेत’, असे मला वाटत होते. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आगमन झाले आहे’, असे मला जाणवत होते.
१ आ. श्री वाराहीदेवीच्या होमानंतर वातावरणात उष्णता जाणवणे, मन सकारात्मक आणि उत्साही होणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री वाराहीदेवीच्या होमाविषयी सांगितल्यावर अत्यल्प वेळात सर्व सिद्धता झाली. होमासाठी लागणारे सर्व साहित्यही त्वरित मिळाले आणि वेळेत होम आरंभ झाला. त्या वेळी ‘सर्व कार्य विनासायास होत आहे’, अशी मला अनुभूती येत होती. होमाच्या वेळी आणि होमानंतर संपूर्ण वातावरणात अत्याधिक उष्णता जाणवली. त्या वेळी ‘सूक्ष्मातून युद्ध चालू आहे’, असे मला वाटत होते. दुसर्या दिवशी पहाटेपासूनच वातावरण पुष्कळ शीतल झाले. होमानंतर माझे मन सकारात्मक आणि उत्साही झाले.
२. श्री. राजन केशरी
२ अ. श्री वाराहीदेवीची श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पूजा करतांना ‘देवी यज्ञ करत आहे, होमाचा धूर श्वासाद्वारे शरिरात गेल्यावर त्रासाचे प्रमाण अन् स्वभावदोष आणि अहं यांचे आवरण न्यून होत आहे’, असे जाणवणे : ‘श्री वाराहीदेवीचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पूजन करत होत्या. तेव्हा ‘देवी यज्ञ करत आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या देहातून तीव्र गतीने ऊर्जा प्रक्षेपित होत आहे. ती ऊर्जा अतिशय वेगाने वर आकाशाच्या दिशेने जात आहे’, असे मला जाणवत होते. सोसाट्याचा वारा वहात असतांना जसे वातावरण असते, त्या प्रकारचे वातावरण मी अनुभवत होतो. ‘होमाचा धूर श्वासाद्वारे माझ्या शरिरात जात असतांना माझ्या त्रासाचे प्रमाण आणि माझ्यातील स्वभावदोष अन् अहं यांचे आवरण न्यून होत आहे’, असे मला जाणवले.
३. श्री. सिमित सरमळकर आणि श्री. सौमेंद्र सिंह
३ अ. आश्रमासाठी घेतलेल्या नवीन जागेवर होमाची विभूती चारही दिशांना घालण्यात येणे, श्री वाराहीदेवीला प्रार्थना होणे आणि ‘श्री वाराहीदेवी भूमीचे रक्षण करत आहे’, असे लक्षात येणे : श्री वाराहीदेवीच्या होमानंतर आश्रमासाठी घेतलेल्या नवीन जागेवर होमाची विभूती चारही दिशांना घालण्यात आली. त्यानंतर आम्ही श्री वाराहीदेवीला प्रार्थना केली, ‘देवी, तूच या भूमीचे रक्षण कर.’ यापूर्वी त्या भूमीवर कितीतरी वेळा चोरी होण्याचे प्रसंग झाले होते. होमाची विभूती तेथे टाकल्यानंतर ‘दोन वेळा काही लोक त्या स्थानावर वाईट हेतूने आले असतांना श्री वाराहीदेवीच्या कृपेने आम्ही तेथेच उपस्थित होतो. त्यामुळे त्यांचा हेतू विफल होत होता. श्री वाराहीदेवी आम्हाला माध्यम बनवून योग्य वेळी तेथे पोचून भूमीचे रक्षण करत आहे’, असे लक्षात आले.
३ आ. नवीन घेतलेल्या भूमीवर उदबत्ती लावण्यासाठी प्रयत्न करतांना वार्यामुळे प्रयत्न असफल होणे, श्री वाराहीदेवी, श्री कालभैरव आणि श्री काशी विश्वनाथ यांना प्रार्थना करताच वार्याचा वेग न्यून होऊन उदबत्ती लावू शकणे : एकदा आम्ही नवीन घेतलेल्या भूमीवर उदबत्ती लावण्यासाठी प्रयत्न करत होतो; मात्र जोरात वहाणार्या वार्यामुळे आमचे प्रयत्न असफल होत होते. आम्ही श्री वाराहीदेवी, श्री कालभैरव आणि श्री काशी विश्वनाथ यांना प्रार्थना केली. नंतर वार्याचा वेग न्यून झाला आणि आम्ही उदबत्ती लावू शकलो. त्यामुळे वातावरणाची शुद्धी होऊ शकली. ‘श्री वाराहीदेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होऊन ते जागेचे रक्षण करत आहे’, असे आम्हाला जाणवले.
४. सौ. मीरा केशरी
४ अ. श्री वाराहीदेवीचा होम चालू असतांना देवीच्या प्रतिरूपाचे दर्शन होणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्री वाराहीदेवीचे पूजन करत असतांना मला श्री वाराहीदेवीच्या प्रतिरूपाचे दर्शन झाले. मला तिची पाषाणाची काळसर मूर्ती दिसली आणि ‘तिने सोनेरी आभूषणे धारण केली आहेत’, असे दिसले. मी कधीही तिच्या रूपाविषयी ऐकले नव्हते. त्यानंतर मला साधकांकडून ‘तिची मूर्ती काळसर रंगाची आहे’, असे समजले.
४ आ. होमाचा धूर खोलीत आल्यानंतर साधिकेला त्रास देणार्या वाईट शक्तीला सहन न होणे अन् एवढी शक्ती संपूर्ण खोलीत निर्माण होणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘होमाचा धूर आश्रमातील प्रत्येक खोलीत जायला हवा’, असे सांगितले. मी खोलीत आल्यावर मला त्रास देणार्या वाईट शक्तीला त्रास होऊ लागला. मला बसता येत नव्हते. एवढी शक्ती खोलीत निर्माण झाली होती.’
|