आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले यांनी भाव ठेवून सेवा केल्यावर त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून जाणवलेले अस्तित्व !
१. सेवा करतांना ‘शेजारी सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) बसले असून ते लिखाणात सुधारणा सुचवत आहेत’, असा भाव ठेवणे
‘एकदा रात्री मी एका ध्वनीमुद्रित केलेल्या संवादाचे केलेले टंकलेखन पडताळण्याची सेवा करत होते. त्यात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटायला सनातनच्या पू. (श्रीमती) सुशीला मोदी त्यांच्या साधक कुटुंबियांसह आले आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्येकाची अत्यंत प्रेमाने विचारपूस करत आहेत. प्रत्येक साधक त्यांना प्रथम ‘नमस्कार’ असे म्हणून बोलत आहे’, अशा प्रकारचा संवाद होता. त्या वेळी ‘मीही त्या सत्संगात बसले आहे आणि प्रत्येक साधकासह मीही परात्पर गुरुदेवांना नमस्कार करत आहे’, असा भाव ठेवला. मी ही सेवा करत असतांना ‘माझ्या शेजारी परात्पर गुरुदेव बसले असून ते मला लिखाणात सुधारणा सुचवत आहेत’, असा भाव ठेवला. त्या धारिकेतील अत्यंत भावपूर्ण संवाद वाचून माझी पुष्कळ भावजागृती झाली.
२. सेवा करतांना ‘अन्य साधक सेवेच्या ठिकाणाहून कधी गेले ?’, हे लक्षात न येणे
त्या धारिकेतील लिखाणात सुधारणा करतांना ‘वेळ कसा गेला ?’, ते मला समजलेच नाही. त्या वेळी जणू मी सर्वांगाचे कान करून ध्वनीमुद्रित केलेला संवाद ऐकत लिखाण पडताळत होते. ती सेवा पूर्ण झाल्यावर मी घड्याळात पाहिल्यावर माझ्या लक्षात आले, ‘रात्रीचे बारा वाजले आहेत.’ त्या वेळी ‘अन्य साधक सेवेच्या ठिकाणाहून कधी गेले ?’, हेही माझ्या लक्षात आले नाही. सेवेच्या ठिकाणी माझ्या व्यतिरिक्त अन्य कुणी नव्हते.
३. ‘शेजारी असलेली आसंदी मागे सरकली आणि त्यावर सूक्ष्मातून बसलेली व्यक्ती अंतर्धान पावली’, असे जाणवणे
मी त्या दिवसाची संगणक वापर केल्याची नोंद केली. त्या वेळी ‘माझ्या शेजारी असलेली आसंदी हळूच मागे तिरकी सरकली. जणू कुणीतरी तिच्यावर बसले होते आणि आता जाण्यासाठी ते उभे रहात आहेत’, असे मला जाणवले. नंतर मला वाटले, ‘मला आसंदी सरकल्याचा भास झाला.’ त्यानंतर मी ‘सेवा घंटे’ या धारिकेत नोंद केली. नंतर मी संगणक बंद केला. त्या वेळी पुन्हा ‘तीच आसंदी पुष्कळ मागे सरकली आणि त्यावर सूक्ष्मातून बसलेली व्यक्ती अंतर्धान पावली’, असे मला जाणवले.
३. सेवा करण्यापूर्वी केलेली प्रार्थना विसरल्याने ‘परात्पर गुरुदेव सूक्ष्मातून शेजारच्या आसंदीवर बसले आहेत’, याची आठवण न रहाणे आणि शेजारची आसंदी सरकल्यावर ‘त्या आसंदीवरील व्यक्ती साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत’, याची तीव्रतेने जाणीव होणे
मी जसा भाव ठेवला होता, त्यानुसार परात्पर गुरुदेव सूक्ष्मातून माझ्या समवेत शेजारी बसून मला लिखाणातील सुधारणा सुचवत होते. मी लिखाण पडताळत असतांना त्यातील चूक माझ्या लक्षात आल्यावर मी प्रत्येक वेळी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करत होते; मात्र मी सेवा करण्यापूर्वी जी प्रार्थना केली होती, त्याची मला सेवा करतांना आठवण नव्हती. ‘परात्पर गुरुदेव सूक्ष्मातून माझ्या शेजारच्या आसंदीवर बसले आहेत’, हे मी पूर्णतः विसरून गेले होते. आसंदी सरकल्यावर ‘तेथे बसलेली व्यक्ती अन्य कुणी नसून साक्षात् माझे प्राणप्रिय गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच आहेत’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली आणि माझे हृदय भरून आले.
४. ‘चूक झाल्याबद्दल क्षमायाचना करणे आणि सेवेच्या ठिकाणी असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे लक्ष गेल्यावर श्रीकृष्ण मिस्कील हसून क्षमा करत आहे’, असे जाणवणे
‘माझ्या शेजारी आसंदीवर सूक्ष्मातून गुरुदेव बसले आहेत’, याचे मला विस्मरण झाले होते. माझ्याकडून झालेल्या या चुकीबद्दल माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी कान पकडून क्षमायाचना करू लागले. मी माझ्या आसंदीवरून उठून उभी राहिल्यावर मला समोरच सेवेच्या ठिकाणी असलेले श्रीकृष्णाचे चित्र दिसले. त्यातील ‘श्रीकृष्ण माझ्याकडे पाहून मिस्कील हसून मला क्षमा करत आहे’, असे जाणवले. त्या वेळी माझ्या शरिरावर अलगद मोरपीस फिरवल्याप्रमाणे रोमांच आले.
५. ‘भाव तेथे देव’, या वचनाची प्रचीती येणे
या प्रसंगातून मला ‘भाव तेथे देव’, या वचनाची प्रचीती आली. मी शेजारच्या ‘त्या विशेष आसंदीला’ भावपूर्ण नमस्कार करून ती आसंदी सरळ ठेवली. माझे मन अत्यंत आनंदी आणि उत्साही झाले होते.’
– श्रीचरणी शरणागत,
सौ. कस्तुरी भोसले (वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे ‘स्थूल’ म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |