‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’कडून आतंकवादी आक्रमण होण्याच्या शक्यतेवरून पाककडून राष्ट्रव्यापी इशारा !

‘जे पेरते, तेच उगवते’ ही म्हण सार्थ ठरवणारा जिहादी आतंकवादाचा पोशिंदा पाकिस्तान !

इस्लामाबाद – ‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या जिहादी आतंकवादी संघटनेसमवेत झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने या संघटनेकडून येणार्‍या काळात देशभरात आतंकवादी आक्रमणे होऊ शकतात, असा इशारा पाकिस्तान सरकारने दिला आहे. यासाठी सुरक्षायंत्रणांनी अत्यंत सतर्क रहावे, असा अहवाल जारी करण्यात आला आहे.

पाकिस्तानी सरकारने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, टीटीपीच्या प्रमुख आतंकवाद्यांची अफगाणिस्तानच्या पाकतिका येथे नुकतीच बैठक झाली असून पाक सरकारकडून ओमर खालिद खोरासानी आणि आफ्ताब पारके या टीटीपीच्या कमांडर्सची हत्या झाल्यावरून त्याचा प्रतिशोध घेण्यावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे गृहमंत्रालयाने सर्व प्रांतांच्या सुरक्षायंत्रणांना सतर्क केले असून कुठे आतंकवादी कारवाईची माहिती मिळाल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.