वाळूचोरी होणार्या भागांतील अधिकारी होणार निलंबित ! – राधाकृष्ण विखे पाटील
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – राज्यातील अनेक जिल्ह्यांत वाळूचोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. लिलाव बंद असतांनाही राजरोसपणे वाळू तस्कर वाळूची चोरी करत आहेत. हे थांबवण्यासाठी ज्या भागातून वाळू चोरी केली जाते, त्या भागांतील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. सध्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाळू माफियांनी थैमान घातले आहे. यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे.
वाळूचोरीमुळे शासनाचा महसूल बुडवला जात आहे. त्यामुळे राज्यात सर्वच जिल्ह्यांत होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी लवकरच राज्य सरकार वाळूविषयी नवे धोरण राबवणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच ४ ऑक्टोबर या दिवशी सोलापूर जिल्हा दौर्यावर आले होते. या वेळी पंढरपूर येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.