सप्तश्रृंगीदेवीच्या पूजनाविषयीचा एक पेशवेकालीन दस्तऐवज पुणे येथील पेशवे दप्तरात सापडला !
पुणे – इतिहास अभ्यासक राज मेमाणे यांना पुणे पुरालेखागारातील पेशवे दप्तरात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक वणीच्या सप्तश्रृंगीदेवीच्या पूजनाविषयीचा एक ऐतिहासिक पेशवेकालीन दस्तऐवज सापडला आहे. देवीच्या पूजेसाठी कोणती सामग्री किती प्रमाणात वापरायची ? त्यासाठी केलेली देणगी व्यवस्था, नवरात्रात आणि इतर वेळी देवीचे पार पडणारे सोपस्कार, या सर्वांची माहिती देणारा मोडी लिपीतील हा दस्तऐवज आहे. देवीची शेकडो वर्षांपासून चालत आलेली पूजा-अर्चा कशा पद्धतीने होती ? याचे पेशवेकालीन दाखले उपलब्ध झाल्याने आता मंदिर व्यवस्थापनाला या दाखल्यांनुसार पुन्हा एकदा पूजा-अर्चा करता येणार आहे.
देवीच्या नैवेद्यासाठी पेशव्यांनी ताट, वाट्या, पंचपात्र, चंबू अशी चांदीची भांडी दिली होती. पुजार्यांनी देवीची सेवा व्यवस्थित वेळच्या वेळी अहोरात्र करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्याचाही उल्लेख या दस्तऐवजात करण्यात आला आहे. देवीच्या प्रतिदिनच्या पूजेच्या खर्चासाठी मौजे चंडकापूर या गावात भूमी इनाम होती. तिथे देवीच्या नित्य पूजेसाठी फुले वगैरेंचे उत्पन्न घ्यावे, असे आदेशही पेशव्यांकडून देण्यात आले होते.
इतिहास अभ्यासक आणि मोडी तज्ञ राज मेमाणे यांनी सांगितले की, हा दस्तऐवज भाविक आणि देवस्थानचे पदाधिकारी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे पूजेअर्चेविषयीचे अनेक पैलू उलगडणार आहेत.