दिवाळीनिमित्त शिधावाटप दुकानात शिधा वस्तूंचा संच देण्याचा मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय !
४८६ कोटी ९४ लाख रुपये खर्च होणार !
मुंबई – दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयांत शिधा वस्तूंचे ‘दिवाळी पॅकेज’ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ४ ऑक्टोबर या दिवशी ही बैठक झाली. यासाठी ४८६ कोटी ९४ लाख रुपये खर्च होणार आहे. तसेच पोलिसांना घरबांधणीसाठी अधिकोषाद्वारे कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१. शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार्या ‘दिवाळी संचा’मध्ये (पॅकेज) रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी एक किलो आणि १ लिटर पामतेल हे असणार आहे. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना, म्हणजेच अनुमाने ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.
२. आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या कार्यवाहीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या आस्थापनांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोणत्याही आपत्तीस तोंड देतांना, तसेच आपत्ती सौम्यीकरणासाठी ज्या उपाययोजना करण्यात येतात, त्यांतील कामांच्या कार्यवाहीसाठी मदत पुनर्वसन विभागाकडे स्वत:ची यंत्रणा नाही. या आस्थापनांच्या माध्यमातून ही कामे करण्यात येणार आहेत.
३. १० एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयानुसार पोलीसदलातील अधिकारी आणि अंमलदार यांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी अधिकोषाद्वारे कर्ज देण्यात येणार आहे.
४. ‘नागपूर मेट्रो रेल प्रकल्प – टप्पा १’ ला गती देण्यासाठी ९ सहस्र २७९ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली. प्रकल्पाचा मूळ संमत खर्च ८ सहस्र ६८० कोटी रुपये इतका असून त्यात ५९९ कोटी ६ लाख रुपये इतकी वाढ झाली आहे.
५. भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेच्या ३३६ कोटी २२ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्यातील २७ आणि गोंदिया जिल्ह्यातील १ अशा २८ गावांतील ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सुरेवाडा गावाजवळ वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर हा प्रकल्प बांधण्यात येत आहे.
६. धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळी तालुक्यांना संजीवनी देण्यासाठी ‘कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पा’स गती देण्यात येणार आहे. यासाठी ११ सहस्र ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील २ जिल्ह्यांतील अवर्षणप्रवण क्षेत्रातील १३३ गावांतील १ लाख १४ सहस्र हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे.