नंदुरबार येथे पोलिसांकडून ८ लाखांची गांजा शेती उद्ध्वस्त !
नंदुरबार – जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सटीपाणी गावाच्या परिसरात कापसाच्या शेतात केली जाणारी गांजाची शेती पोलिसांनी ३ ऑक्टोबर या दिवशी उद्ध्वस्त केली. या शेतातून गांजाची १५० झाडे जप्त करण्यात आली आहेत. या शेतात अनुमाने ११३ किलोग्रॅम वजनाची ७ लाख ८६ सहस्र ३३१ रुपये किमतीची एकूण १५० गांजाची झाडे होती. या प्रकरणी पोलिसांनी शहादा पोलीस ठाण्यात गणेश भोसले यांच्यावर गुन्हा नोंद केला असून सध्या ते पसार आहेत.
पोलीस अधीक्षक पाटील यांना शहादा तालुका क्षेत्रातील सटीपाणी गावात गणेश भोसले यांनी कपाशीच्या शेतात अनधिकृतरित्या गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्याची शहानिशा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि शहादा पोलिसांचे पथक गेले होते. शेताकडे पोलीस येत असल्याचे पाहून भोसले यांनी पलायन केले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला; मात्र ते लगतच्या अरण्यात पळून गेले. (पोलिसांचे कुचकामी सापळे ! – संपादक)