(म्हणे) ‘दुकानांवरील मराठी पाट्या लावल्यामुळे व्यापारावर परिणाम होतो !’
व्यापारी संघटनेचा विचित्र दावा !
मुंबई – राज्य सरकारने दुकानांवरील पाट्या ‘मराठी अक्षरा’त लावण्याचे आदेश दिले आहेत. याची कार्यवाही येथील महापालिकेकडून केली जात असतांना व्यापार्यांनी मात्र ‘व्यापारावर परिणाम होऊ शकतो’, असे कारण देत मराठी अक्षरांच्या पाट्या लावण्यास नकार दिला आहे. ‘याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली जाईल’, अशी माहिती व्यापारी संघटनांकडून देण्यात आली आहे.
व्यापारावर परिणाम होतो !
मुंबई येथील दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात, यासाठी महापालिकेकडून व्यापार्यांना आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी व्यापार्यांना ३ वेळा मुदतवाढही देण्यात आली. या मुदतीमध्ये ५ लाखांपैकी केवळ ५० टक्के दुकानदारांनी आपल्या दुकानांवरील पाट्या मराठीत केल्या आहेत. मराठी पाट्या न लावणार्या दुकानांवर कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असली, तरी न्यायालयाकडून त्यांना अद्याप दिलासा देण्यात आलेला नाही.
मराठी पाट्यांची सक्ती करू नये ! – विरेन शाह, अध्यक्ष, व्यापारी संघटना
मुंबई येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेश शाह म्हणाले, ‘‘दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयाला स्थिगिती द्यावी, या मागणीसाठी व्यापारी संघटना सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहे. महापालिकेला तशी नोटीस देण्यात आली आहे. राज्य सरकारने यावर आम्हाला कोणतेही उत्तर दिलेले नाही. मराठी अक्षरे मोठी ठेवल्यास त्याचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. यामुळे मराठी पाट्यांची सक्ती करू नये’’, असे आवाहन त्यांनी केले.
संपादकीय भूमिकाराज्य सरकारने आदेश दिलेले असतांनाही दुकानांवर मराठी पाट्या न लावणार्या व्यापार्यांचे परवाने रहित करण्याची कारवाई त्वरित केली पाहिजे ! |