शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप !
मुंबईतील दसरा मेळावे !
मुंबई – दादर येथील शिवाजी पार्कवर ५ ऑक्टोबर या दिवशी प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला, तर दुसरीकडे बीकेसी मैदानात (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.
तुम्ही मला साथ दिली, तर शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री करीन ! – उद्धव ठाकरे
तुम्ही मला साथ दिली, तर मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवीन, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसर्या मेळाव्याच्या वेळी उपस्थित सहस्रो शिवसैनिकांना केले. या वेळी त्यांनी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासमवेतचे आमदार यांच्यावर कठोर टीका केली. त्याच प्रमाणे भाजपच्या हिंदुत्वावर टीका करतांना शिवसेनेचे हिंदुत्व किती प्रखर आहे, हे उदाहरणासह स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनाप्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणार नाही ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘आम्ही शिवसेनाप्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणार नाही’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानात शिवसेनेच्या दसर्या मेळाव्यात केले. या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येणार्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. ‘वर्ष १८५७ मध्ये करण्यात आलेले इंग्रजांच्या विरोधातील बंड नव्हते, तर ती क्रांती होती. आम्ही केलेले बंड नसून क्रांती आहे. वेडे लोकच इतिहास घडवतात’, असेही मुख्यमंत्री शिंदे या वेळी म्हणाले.