श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांच्यामध्ये भ्रमणभाषवर झालेला आनंददायी भावसंवाद !
४.१०.२०२२ या दिवशी प्रसिद्ध केलेल्या लेखात आपण श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांच्यात झालेल्या संभाषणातील ‘पू. दीपाली मतकर यांची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी असलेली एकरूपता आणि पू. दीपालीताईंची भावस्थिती’, ही सूत्रे पाहिली. या भागात आपण त्यांच्या संभाषणातील ‘सोलापूर सेवाकेंद्रात जाणवलेले पालट आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. दीपालीताई यांना केलेले अनमोल मार्गदर्शन’, ही सूत्रे पहाणार आहोत.
(भाग २)
मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/617437.html
५. पू. दीपाली मतकर यांना सोलापूर सेवाकेंद्रात जाणवलेले पालट
५ अ. सोलापूर सेवाकेंद्रातील सर्व वस्तू पुष्कळ आनंदी झाल्याचे जाणवणे आणि त्या वस्तूंना हात लावतांना स्वतःच्या हाताच्या जागी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा हात दिसणे
पू. दीपाली मतकर : ‘सेवाकेंद्रातील सर्वच वस्तू पुष्कळ आनंदी झाल्या आहेत’, असे मला जाणवते. त्यामुळे त्यांना स्पर्श करतांना मलाही पुष्कळ आनंद होतो. ‘त्या वस्तूंवर पुष्कळ प्रेम करावे’, असे मला वाटते. सेवाकेंद्रातील प्रत्येक वस्तूच माझ्याशी बोलते. ताई, त्या वस्तूंना हात लावतांना मला माझ्या हाताच्या जागी तुमचाच हात दिसतो.
५ आ. सेवाकेंद्राच्या आजूबाजूला असणारी झाडे सेवाकेंद्राच्या दिशेने झुकत असून ‘ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी लीन होत आहेत’, असे जाणवणे : सेवाकेंद्राच्या आजूबाजूची झाडेही सेवाकेंद्राकडे झुकत आहेत. सेवाकेंद्रातील ध्यानमंदिराच्या मार्गिकेसमोर कडूनिंबाचे झाड आहे. त्या झाडाच्या फांद्या सेवाकेंद्रातील मार्गिकेकडे झुकल्या आहेत. ‘जणू ध्यानमंदिरातील गुरुदेवांच्या छायाचित्राचे दर्शन घेण्यासाठी आणि गुरुमाऊलीच्या चरणी लीन होण्यासाठी ते झाड आत झेपावत आहे’, असे मला वाटते.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : अगं, हा निसर्ग आपल्याला आपल्या भावानुसार सतत आशीर्वाद देत असतो. काल इथे (रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात) सत्यनारायणाची पूजा झाली. त्या पूजेसाठी जे केळीचे खांब लावले होते, ते आता ४ दिवसांनीही आहेत तसेच आहेत. आता आपले बोलणे चालू आहे, तर त्यांनाही पुष्कळ आनंद झाला आहे. तेही पुष्कळ आनंदाने हलत आहेत.
मी (पू. दीपाली मतकर) : इथली झाडेही पुष्कळ आनंदाने हलत आहेत. ‘तीही तुमचे बोलणे ऐकत आहेत’, असे मला वाटत आहे. ताई, आता मला सर्व साधकांविषयी पुष्कळ कृतज्ञता आणि प्रेम वाटते.
६. रामनाथी आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेल्या खोलीतील श्रीकृष्णाची मूर्ती आनंदी आणि हसरी दिसणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : रामनाथी आश्रमात मी सेवा करत असलेल्या खोलीत श्रीकृष्णाची मूर्ती आहे. त्याचे मुख पुष्कळ आनंदी दिसत आहे. ‘तो पुष्कळ आनंदाने मधुर मधुर हसत आहे’, असे जाणवते.
पू. दीपाली मतकर : तुम्ही बोलतांना मलाही ती कृष्णाची मूर्ती आनंदाने हसतांना दिसत आहे.
७. पू. दीपाली मतकर यांनी गौरी-गणपतीच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सत्संगात गौरीची भावार्चना घेऊन साधकांना साधनेसाठी दिलेले प्रोत्साहन आणि साधकांचा मिळालेला चांगला प्रतिसाद !
पू. दीपाली मतकर : गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातील ‘ऑनलाईन’ सत्संगात भ्रमणभाषच्या पडद्यावर तुमचे (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे) आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले छायाचित्र ठेवले होते. गौरीची भावार्चना करून मी साधकांना म्हणाले, ‘‘समोर दिसणार्या ‘समष्टी गौरी’ (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) काय म्हणतात ?’, ते अनुभवूया. नाम, सत्संग, प्रवचन आणि ग्रंथ या माध्यमांतून सगळीकडे चैतन्य पसरवा’, असे त्या सांगत आहेत ना ?’’ तेव्हा साधकांना पुष्कळ आनंद होऊन त्यांचा भाव जागृत झाला. त्यामुळे सणांच्या कालावधीतही सगळ्यांनी चांगली समष्टी सेवा केली.
एरव्ही ‘गौरी-गणपतीच्या वेळी घरातील गणपति आणि गौरी यांची सजावट अन् नैवेद्य यांमुळे व्यष्टी साधना अन् समष्टी सेवा झाली नाही’, असे साधक सांगायचे; पण या वेळी काही साधिकांनी रात्री जागून, तर काहींनी सकाळी लवकर उठून घरातील स्वच्छता आणि सजावटीची सेवा केली. त्याच समवेत त्यांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्नही चालू ठेवले.
८. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !
८ अ. व्यष्टी आणि समष्टी साधना हाच साधकांचा श्वास असला पाहिजे, त्यामुळे चैतन्याचा स्रोत कार्यरत राहील !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : फारच सुंदर ! आता आपल्याला समष्टी ध्येयच ठेवायचे आहे. आपल्या श्री गुरूंना समष्टी पुष्कळ प्रिय आहे. ‘समाजासाठी कष्ट घेत राहून समष्टी साधना करणे’, हे गुरुदेवांना पुष्कळ आवडते. त्यामुळे ‘समाजासाठी झटत रहाणे’, हीच आपली साधना आहे. ही सेवा, म्हणजेच आपला श्वास असला पाहिजे. प्रयत्न केले नाहीत, तर ‘माझा श्वास बंद झाला कि काय ?’, असे आपल्याला वाटायला हवे. व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न आणि धडपड करत रहायचे. चुका झाल्या, तरी त्यांतून शिकत रहायचे. ‘साधेनेसाठी धडपड आणि प्रयत्न करत राहिलो, तर श्वास चालू रहातो’, हे आपण अनुभवतो. त्या वेळी आपण सहजता आणि अंतरात भगवंताची भक्ती अनुभवतो. सगळ्यांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न छान आणि झोकून देऊन करा. त्यातूनच चैतन्याचा स्रोत सर्वत्र कार्यरत होईल.
पू. (कु.) दीपाली मतकर : श्रीसत्शक्ति बिंदाताई, ‘आताच तुमच्या बोलण्यातून चैतन्याचा स्रोत कार्यरत झाला’, असे मला वाटत आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : माझ्यामुळे नाही. तुमच्यातील भावभक्तीमुळे तो कार्यरत होईल. तुम्ही सर्वांनी समष्टी गौरीची जी उपासना केली ना, ती लिहून पाठवा. फार सुंदर प्रयत्न आहेत.
८ आ. भाव, भक्ती, तळमळ आणि प्रीती हीच साधनेतील खरी श्रीमंती !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : खरी श्रीमंती, म्हणजे साधनेतील प्रगती ! आध्यात्मिक पातळी अनेक गोष्टींवर अवलंबून असते. देव बघतो, ‘कोण किती धडपड करतो ? कोण किती कष्ट घेतो ? कोण सवलत घेण्यावर मात करतो ?’ प्रगती ही त्रास, प्रारब्ध आणि इतर बर्याच गोष्टी यांवर अवलंबून असते. आपण धडपड केली, तर या सर्व गोष्टींवर मात करून पुढे जातो. साधनेच्या दृष्टीने खरी श्रीमंती, म्हणजे रत्ने, माणके, हिरे इत्यादी नसून आपल्यातील भाव, भक्ती, तळमळ आणि प्रीती ही आहे ! तळमळ आणि समष्टी साधना यांनीच साधनेत परिपूर्णता येते.
९. कृतज्ञता
‘हे परम प्रिय श्रीकृष्णा, कृपाळू गुरुमाऊली, ‘आपल्या कृपेमुळेच मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा दैवी आणि चैतन्यदायी सत्संग मिळाला’, याबद्दल माझ्या मनात अखंड कृतज्ञताभाव राहू दे. मला या सत्संगाचा तळमळीने लाभ करून घेता येऊ दे’, अशी आपल्या पावन चरणी प्रार्थना !’
(समाप्त)
– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (३०.११.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |