भाजपची साथ सोडली म्हणून हिंदुत्व सोडलेले नाही ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना
मुंबई येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सहस्रोंची उपस्थिती !
मुंबई – शिवसेना आणि भाजप या पक्षांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचे ठरले होते, हे मी शपथ घेऊन सांगतो. भाजपने पाठीत वार केला. त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसैनिकांना धमकी दिली जाते की, शिंदे गटात जा अन्यथा खटले बाहेर काढू. शिवसैनिक शांत आहेत, तोपर्यंत शांत आहेत. जर माझ्या शिवसैनिकांवर अन्याय कराल, तर ते आम्ही कदापी सहन करणार नाही. ही शिवसेना एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. भाजपची साथ सोडली; म्हणून हिंदुत्व सोडलेले नाही. भाजप देशातील अनेक पक्ष संपवत आहे. त्यामुळे देश हुकूमशाहीकडे जात आहे, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केली.
५ ऑक्टोबर या दिवशी येथील शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेतील आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर प्रथम झालेल्या दसरा मेळाव्यात ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासमवेत पक्ष सोडून गेलेले आमदार आणि खासदार यांच्यावर घणाघाती टीका केली. या मेळाव्याला महाराष्ट्रातून शिवसैनिक आले होते. शिवाजी पार्क संपूर्ण भगवामय झाले होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की,
१. प्रतिवर्षी परंपरेप्रमाणे मेळाव्यानंतर शिवाजी पार्क येथे रावण दहन होणार आहे. यावर्षीचा रावण वेगळा आहे. जसा काळ पालटतो, तसा रावणही पालटतो. पूर्वी १० तोंडाचा रावण होता, आता ‘५० खोक्यांचा, खोकासूर’ रावण आहे.
२. शिवसेनेचा दसरा मेळावा अभूतपूर्व असून मी भारावून गेलो आहे. हे प्रेम विकत मिळत नाही. ही कोरडी गर्दी नाही. मी शिवसैनिकांसमोर नतमस्तक झालो आहे. माझ्या अंतःकरणात असलेल्या जिवाभावाच्या लोकांची गर्दी आहे. तुम्ही पाठीशी असल्याने मी अडीच वर्षे काम केले. हेच ते प्रेम आणि आशीर्वाद आहे !
३. शिंदे गटावर टीका करतांना ते म्हणाले की, शिवसेनेतून काही लोकांनी गद्दारी केली. मी त्यांना गद्दारच म्हणणार. मंत्रीपदे काही काळापुरतीच आहेत; मात्र कपाळावरील ‘गद्दार’ हा शिक्का पुसला जात नाही. शिवसेनेचे काय होणार ? माझ्या मनात चिंता नव्हती. येथे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. एकनिष्ठ माझ्यासमोर बसलेले आहेत.
४. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणतात की, स्त्री-पुरुष समानता हवी. उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणात भाजपचा कोणता नेता होता ? महिला शक्तींचा अनादार कोण करत आहे ?
५. तुम्ही ठरवणार आहात मी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून रहायचे कि नाही ? शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ‘कायद्याच्या चौकटीत राहून बोला. कायदा आपले काम करेल’, असे वक्तव्य केले आहे. कायदा आम्हाला कळतो. सर्वांनी कायदा पाळायला हवा. स्थानबद्धतेचे आदेश दिले जातात. शिवसैनिकांना तडीपार केले जाते. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरे पाळायची का ?
६. आज आणि उद्याही आम्ही हिंदूच असणार आहे. भाजपने हिंदुत्व शिकवू नये. जिनाच्या थडग्यावर डोके टेकवणार्या नेत्यांच्या पक्षाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्व हे खणखणीत असले पाहिजे. हिंदुत्व करत गायीवर न बोलता महागाईवर बोला. महागाईने देश होरपळत आहे. या वेदना जाणवू नयेत; म्हणून हिंदुत्वाचा डोस दिला जातो.
७. माझ्यासमवेत चालायचे असेल, तर निखार्यावर चालण्याची सिद्धता हवी. तुमच्या मनातील या आगीतून उद्या हिंदुत्वाचा वणवा पेटणार आहे. त्यात सर्व गद्दारांची गद्दारी भस्मसात होणार आहे. तुम्ही साथ द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.