‘वन्दे मातरम् !’
‘शासकीय कामानिमित्त जनता किंवा लोकप्रतिनिधी यांच्याशी दूरभाष किंवा भ्रमणभाष यांद्वारे बोलतांना वा अभिवादन करतांना वन विभागाचे सर्व अधिकारी अन् कर्मचारी यांनी ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ या शब्दाचा वापर करावा’, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. याविषयी महसूल आणि वन विभागाकडून आदेश काढण्यात आला असून याची प्रत्यक्ष कार्यवाही २ ऑक्टोबरपासून चालू झाली. या निर्णयाला समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी विरोध करत ‘आमचे देशावर प्रेम आहे; मात्र अल्लासमोर केवळ डोके टेकवायचे आहे. त्यामुळे आम्ही ‘वन्दे मातरम्’ कधीच म्हणणार नाही’, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. अर्थात् हिंदुद्वेष्टे असलेल्या अबू आझमींकडून यापेक्षा अधिक अपेक्षा काय ठेवणार ?
भारतीय स्वातंत्र्याचा मूलमंत्र ठरलेले ‘वन्दे मारतम्’ हे गीत ७ नोव्हेंबर १८७५ या दिवशी लिहिले गेले. या गीतामुळे स्वातंत्र्याच्या लढ्यात हौतात्म्य पत्करण्याचे आणि इंग्रजांनी झाडलेल्या गोळ्या अन् लाठ्या छातीवर घेण्याचे बळ क्रांतीकारकांमध्ये निर्माण झाले. लाखो देशभक्तांनी त्यांच्या प्राणांची आहुती देऊन भारताला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त केले. त्यामुळे सद्यःस्थितीतही नागरिकांमध्ये स्वराष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी, तसेच नवचैतन्य निर्माण होऊन त्यांची मने राष्ट्रभक्तीने प्रज्वलित करण्यासाठी ‘वन्दे मारतम्’चा उद्घोष सातत्याने होणे आवश्यक आहे !
पारतंत्र्यातील कुठल्याही राष्ट्राला स्वातंत्र्य मिळताच राष्ट्रातील पारतंत्र्याच्या खुणा उखडून फेकून देणे, हे राष्ट्रहिताचे असते. स्वकीय इतिहासाचा अभिमान म्हणून स्वभाषेचा पुरस्कार करणेही अपेक्षित असते. भारतात मात्र तसे झाले नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतरही जनता मानसिक गुलामगिरीतच असल्याने भ्रमणभाषवर बोलतांना ‘हॅलो’ म्हणण्यात त्यांना काहीही चुकीचे वाटत नाही. ‘हॅलो’सह अशा अनेक गोष्टी आता रूजल्या आहेत की, त्या स्वकीयच वाटत आहेत. त्यामुळे सांस्कृतिक आक्रमण मोडून काढण्यासाठी केवळ शासकीय कर्मचार्यांनीच नाही, तर सामान्य नागरिकांनीही एकमेकांशी बोलतांना ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अत्यावश्यक आहे ! हे म्हणणे इतके मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे की, त्याचे चळवळीत रूपांतर होऊन हिंदुद्रोह्यांना धडकी भरली पाहिजे !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर