पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटात पी.एफ्.आय.चा सहभाग असल्याचे पुरावे !
राज्य आतंकवादविरोधी पथकाची न्यायालयामध्ये माहिती !
नाशिक – २२ सप्टेंबरला देशभरात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या संशयित पदाधिकार्यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्या निर्देशांनुसार आतंकवादविरोधी पथकांनी धाडी टाकत अटक केली होती. यात नाशिक आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.ने) मालेगावातून मौलाना सईद अन्सारी याच्यासह पुण्यातून अब्दुल शेख, रझी खान, बीडमधून वसीम अझीम, कोल्हापुरातून मौला मुल्ला या ५ जणांना अटक केली होती. या पाचही संशयितांच्या चौकशीतून गंभीर स्वरूपाची माहिती समोर आल्याचा दावा राज्य आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.ने) केला आहे. वर्ष २०११ मध्ये पुण्यात झालेला जर्मन बेकरी बाँबस्फोट आणि भाग्यनगर येथील दुहेरी स्फोट यांमध्ये या संघटनेचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे समोर येत आहेत.
11 जुलै 2006 मुंबई रेल्वे बाँबस्फोट, 2006 मालेगाव बाँबस्फोट, जर्मन बेकरी पुणे बाँबस्फोट, 26 नोव्हेंबर 2008 चे मुंबईवरील आतंकवादी आक्रमण, मुंबईच्या झवेरी बाजार बाँबस्फोट, अहमदाबाद बाँबस्फोट अशा अनेक आतंकवादी प्रकरणातील आरोपींना यांनी अनेक प्रकारे साहाय्य केल्याचे पुरावे आहेत..👇
— राईट विंग ऑफ महाराष्ट्र (@RWofMH) October 2, 2022
अन्वेषण पथकाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार
१. पाचही संशयित हे एकमेकांच्या संपर्कात आहेत. सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून त्यांच्यात झालेले संवाद हे आक्षेपार्ह आहेत. त्यांच्या संवादातील आवाजाचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ५ जणांपैकी काही संशयितांनी दुबई, सौदी अरेबिया आदी आखाती देशांचे दौरे केले आहेत. मालेगावातून अटक करण्यात आलेला मौलाना सईद अन्सारी याने बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.
२. पी.एफ्.आय.च्या संशयितांकडून जप्त करण्यात आलेली हार्डडिस्क आणि महत्त्वाची कागदपत्रे यांमध्ये ‘मॉडेल २०४७’ ए.टी.एस्. अधिकार्यांच्या हाती लागले आहे. यात भारत देश वर्ष २०४७ मध्ये कसा असेल ? या संदर्भात संशयास्पद माहिती आहे.
३. संशयितांच्या अधीकोषांच्या खात्यांतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असून यामागे परकीय हात असण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या ‘हार्डडिस्क’मधील माहिती देशविघातक असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला आहे. या सार्यांचा कसून शोध घेण्यासाठी ए.टी.एस्.च्या मागणीनुसार ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या पाचही संशयितांना नाशिक जिल्हा न्यायालयाने येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.