मंगळुरू येथील सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांच्याविषयी कु. कुहु पाण्डेय यांना आलेल्या अनुभूती
‘माझे नाव भार्गवराम, रामराम ।’ याच शब्दांत पू. भार्गवराम यांनी मला त्यांचा परिचय करून दिला. ज्यांच्या नावातच राम आहे आणि जे आपला परिचय करून देतांनासुद्धा प्रभु श्रीरामाची साथ सोडत नाहीत, अशा महान संतांचे वर्णन मी शब्दांमध्ये कसे करू ? त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती मी श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करते.
१. शिवमंदिरात जाण्याच्या संदर्भातील अनुभूती
१ अ. स्वप्नात शिवाचे मंदिर दिसून त्याचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होणे : ‘पू. भार्गवराम आश्रमातील आमच्या निवासस्थानी येणार आहेत’, याची मला पूर्वकल्पना नव्हती; परंतु त्यांच्या शुभागमनापूर्वी एकदा मला मध्यरात्री स्वप्न पडले. स्वप्नात मला ‘महाबळेश्वर’ मंदिरात जायचे होते. यापूर्वी मी कधीही या मंदिराचे नावसुद्धा ऐकले नव्हते. जाग आल्यावर मी ‘ते कोणत्या देवतेचे मंदिर आहे आणि कुठे आहे ?, ते ‘गूगल’वर शोधले. तेव्हा ते मंदिर शिवाचे असल्याचे मला समजले. माझ्या मनात ‘त्या मंदिरात जाऊन शिवाचे दर्शन घ्यावे’, अशी तीव्र इच्छा जागृत झाली. त्यानंतर एक दिवसाने पू. भार्गवराम आमच्या निवासस्थानी रहायला आले.
१ आ. सध्या पू. भार्गवराम शिवाचा नामजप करत असल्याचे कळणे आणि त्यांच्या भेटीनंतर मंदिरात जाण्याची इच्छा न रहाणे : काही दिवसांनी त्यांच्यासह आमची एका संतांशी भेट झाली. तेव्हा बोलतांना ‘पू. भार्गवराम सध्या स्वतःहूनच ‘ॐ नमः शिवाय ।’ हा जप करत आहेत’, हे समजले. ते ऐकताच ‘पू. भार्गवराम यांच्या येण्यापूर्वी स्वप्नात शिवाचे मंदिर दिसणे, शिवाचे दर्शन घेण्याची इच्छा होणे आणि पू. भार्गवराम यांची भेट झाल्यानंतर माझी शिवाचे दर्शन घेण्याची इच्छाच न रहाणे’, या घटनांचा मला उलगडा झाला. याचा अर्थ ‘त्यांच्या माध्यमातून मला अपेक्षित ऊर्जा आणि चैतन्य मिळणार आहे’, असा शुभसंकेत मिळाला होता.’
१ इ. रामनामाचा अखंड जप होऊन समाधान आणि शांती अनुभवायला मिळणे : माझ्या जीवनात पू. भार्गवराम यांचे आगमन झाल्यानंतर (त्यांच्या समवेत रहात असतांना) माझा अंतर्मनातून रामाचा नामजप होऊ लागला. ‘अनेक कृती करतांना आणि कोणतेही प्रयत्न न करता माझा रामनामाचा जप चालू असायचा’, असे माझ्या लक्षात आले. यामुळे मला समाधान आणि शांती दोन्ही अनुभवायला मिळाली. त्यानंतर काही दिवसांनी एका सद्गुरूंनी मला ‘रामा’चा जप करायला सांगितला.
१ ई. पू. भार्गवराम यांनी सूक्ष्मातून वाईट शक्तींशी लढणे आणि त्यांना घालवून देणे : एकदा पू. भार्गवराम मला खोलीच्या आगाशीत घेऊन गेले आणि म्हणाले, ‘‘ती बघ वाईट शक्ती.’’ मला वाटले, ‘मला तर काहीच कळत नाही, मग मला ती कशी दिसणार ?’ मी विचारले, ‘‘कुठे आहे वाईट शक्ती?’’ त्यांनी बोट दाखवून सांगितले, ‘‘ती बघा तिकडे आहे, इकडेही आहे. अरे, पुष्कळ वाईट शक्ती आल्या आहेत. चला त्यांना मारूया.’’ हे सर्व माझ्या बुद्धीच्या पलीकडचे होते; परंतु त्यांनी सांगितले, ‘‘सर्व वाईट शक्ती गेल्या. आता एकही नाही.’’ मी त्या दिशेला पाहिले, तर आता तेथे हलकेपणा जाणवत होता आणि वातावरणही स्वच्छ अन् मोकळे दिसत होते. तेव्हा मला ‘त्यांचे कार्य सूक्ष्म स्तरावर चालू असते’, याची जाणीव झाली.
१ उ. पू. भार्गवराम यांची विविध रूपे आठवून भावजागृती होणे : कधी-कधी माझ्याशी खेळतांना ते ‘प.पू. भक्तराज महाराज काठी घेऊन उभे आहेत’, अशा मुद्रेत स्थिर उभे रहायचे, तर कधी सुदर्शनचक्र धारण केलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या मुद्रेत उभे रहात होते. त्यांची ती सर्व रूपे आजसुद्धा माझ्या डोळ्यांसमोर येऊन भावजागृती होते.
१ ऊ. पू. भार्गवराम यांच्या कृतीने ‘गुरूंनी आपला हात पकडला असेल, तरच आपण साधना मार्गावर योग्य दिशेने चालू शकतो’, हे लक्षात येणे : एकदा मी त्यांना इमारतीतील एका साधकाच्या खोलीत घेऊन जात होते. त्यासाठी आम्हाला दोन माळे उतरून खाली जायचे होते. मी चुकून दुसर्याच एका सदनिकेच्या समोर आले आणि त्यांना म्हणाले, ‘‘आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत.’’ तेव्हा ते सहज हसून म्हणाले, ‘‘हो. आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत.’’ त्यानंतर त्यांनी आपल्या कोमल हाताने माझा हात पकडला आणि म्हणाले, ‘‘चला माझ्या बरोबर.’’ त्यांनी मला हात धरून योग्य सदनिकेत नेले. या प्रसंगातून माझ्या लक्षात आले, ‘गुरूंनी आपला हात पकडला असेल, तरच आपण साधना मार्गावर योग्य दिशेने चालू शकतो.’ आणि तेच आपल्याला योग्य दिशा दाखवून ध्येयापर्यंत पोचवतात.
२. प्रार्थना
पू. भार्गवराम यांच्या लीलांचे वर्णन करण्याची माझ्यासारख्या अज्ञानी जिवाची पात्रता नाही. त्यांनी आम्हाला एवढा आनंद दिला आहे की, ते व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.
पू. भार्गवराम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडून मिळालेले आनंदाचे क्षण श्रीगुरूंच्या चरणी कृतज्ञताभावाने समर्पित करते. ‘पू. भार्गवराम यांच्या माध्यमातून कार्यरत असलेले चैतन्य आणि ऊर्जा यांचा विस्तार संपूर्ण ब्रह्मांडात व्हावा आणि शीघ्रातीशीघ्र संपूर्ण विश्व हिंदु राष्ट्र बनण्याच्या मार्गात अग्रेसर व्हावे’, अशी मी प्रार्थना करते.’
त्यांचे नाव पू. भार्गवराम ।
त्यांच्या चरणी कोटीशः प्रणाम ।
श्रीराम जय राम जय जय राम ।।
– कु. कुहु पाण्डेय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(४.६.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |