श्री महाकालीदेवी शिवपिंडीवर अभिषेक करतांना आणि अर्धमहाकालेश्वर यांचे कु. रजनीगंधा कुर्हे यांनी चित्र रेखाटल्यावर त्याविषयी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान
श्री महाकालीदेवी शिवपिंडीवर अभिषेक करतांना आणि अर्धमहाकालेश्वर यांचे चित्र रेखाटतांना कु. रजनीगंधा कुर्हे यांना आलेल्या अनुभूती आपण ३.१०.२०२२ या दिवशी पाहिल्या. आजच्या भागात या चित्रांविषयी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान पाहू.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/617107.html
५. साधिकेकडून ‘शिवपिंडीचे पूजन करतांना श्री महाकालीदेवी समोर बघत आहे’, असेच चित्र रेखाटले जाण्यामागील शास्त्र
५ अ. श्री. राम होनप : ‘श्री महाकालीला विशिष्ट कार्य अथवा उद्देश नसतो, तेव्हा ती तटस्थ असते. ही तिची ‘प्रत्यक्ष अवस्था’ साधिकेच्या चित्रातील महाकालीच्या डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त झाली.
साधिकेच्या मनात चित्र काढतांना ‘चित्र दैवी प्रेरणेने साकार व्हावे’, असा विचार प्रबळ होता; परंतु तिच्या मनात ‘महाकालीने शिवपिंडीवर अभिषेक करतांना त्याकडे पहावे’, अशी भावनाही होती. या प्रक्रियेत साधिकेत कर्तेपणा अल्प होता आणि चित्र काढतांना दैवी प्रेरणा अधिक होती. त्यामुळे तिच्याकडून अध्यात्मशास्त्रानुसार चित्रकला शुद्धस्वरूपात साकार झाली.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.९.२०२२)
५ आ. श्री. निषाद देशमुख
५ आ १. साधकांना येणार्या अनुभूतीमध्ये दिसणारे देवतेचे रूप देवतांच्या तत्त्वानुसार ७० टक्के, तर साधकाच्या भावानुसार ३० टक्के असणे : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी निगडित शक्ती एकत्रित असतात. या सिद्धांतानुसार िवशिष्ट देवतेच्या तत्त्वाची अनुभूती कोट्यवधी भक्तांना एकसारखी येते, उदा. देवीतत्त्वाची अनुभूती येतांना कुंकवाचा गंध येणे, लाल रंग दिसणे. गायत्री मंत्र म्हटल्यावर शरिरात उष्णता जाणवणे इत्यादी. याच कारणामुळे अनेक भक्तांना विशिष्ट देवतेचे दर्शन झाल्यावर त्यांचे रूप ७० टक्के एकसारखे दिसते, उदा. श्री गणपतीचे स्वरूप गजमुख, हनुमंताचे स्वरूप वानराप्रमाणे, भगवान शिवाचे स्वरूप जटाधारी आणि भस्म लावलेले इत्यादी.
असे असले, तरी भक्तांना होणार्या देवदर्शनात देवतेच्या रूपातील ३० टक्के रूप भक्ताच्या भावानुरूपही असते,
उदा. बालकभाव असणार्या भक्ताला ‘संबंधित देवता त्याच्या समवेत खेळत आहे’, असे किंवा देवतेचे बालरूपातील दर्शन होते. शरणागतभाव असणार्या भक्ताला देवतेचे भव्य रूपात, अनेक भुजा असलेल्या रूपात दर्शन होते. भाव असलेल्या; पण आध्यात्मिक त्रास असणार्या साधकाला देवतेचे मारक रूपात दर्शन होते. यामुळे संतांनी केलेल्या यज्ञ-यागांमध्ये विविध साधक किंवा भक्त यांना त्याच देवतेच्या विविध स्वरूपातील अनुभूती येतात, उदा. कुणाला ध्यानस्थ, कुणाला उभ्या, तर कुणाला वाईट शक्तींच्या संहार करत असलेल्या देवतेचे रूप दिसते.
५ आ २. ‘आपत्काळात रज-तम गुणांचा संहार करण्यासाठी श्री महाकालीदेवीचे तत्त्व कार्यरत आहे’, असा भाव असल्यामुळे साधिकेकडून ‘जागृत ध्यानावस्थेतील’ म्हणजे तारक-मारक स्थितीतील श्री महाकालीदेवीचे चित्र काढले जाणे : आपत्काळात सतत सूक्ष्मातील युद्ध होत असल्याने देवतातत्त्व मारक किंवा तारक-मारक या स्वरूपात कार्यरत असते, उदा. राम आणि रावण यांच्या युद्धाच्या वेळी हनुमंत रामाच्या बाजूने लढत होता. लढाई थांबल्यावर मध्ये वेळ मिळाल्यावरही हनुमंत ध्यान करत असे. त्या वेळी ध्यान करतांना हनुमंताने त्याची शेपूट गदेवर ठेवणे. ही हनुमंताची तारक-मारक स्थिती दर्शवते.
साधिकेने काढलेल्या चित्रात ‘श्री महाकालीदेवीने शिवपिंडीचे पूजन करतांना समोर बघणे’, हे ‘जागृत ध्यानावस्था’ आणि श्री महाकालीदेवीच्या तारक-मारक स्थितीचे प्रतीक आहे. ‘पूजन करतांना डोळे बंद असणे’, हे तारक स्थिती, म्हणजे ध्यानावस्था, भावस्थिती, एकरूपता, अंतर्मुखता आणि शरणागती यांचे, तर ‘डोळे उघडे ठेवणे’, हे जागृत ध्यानावस्था आणि सतर्कता यांचे प्रतीक आहे. ‘सध्याच्या आपत्काळात रज-तमाचा संहार करण्यासाठी श्री महाकालीदेवीचे तत्त्व कार्यरत आहे’, असा साधिकेचा भाव असल्यामुळे तिच्या भावानुसार तिला श्री महाकालीदेवी शिवाचे पूजन करत असतांना ‘जागृत ध्यानावस्थेत’ म्हणजे ‘तारक-मारक स्थितीत आहे’, असे दिसले आणि तिच्याकडून तसे चित्र रेखाटले गेले.
५ आ ३. साधिकेला दिसलेल्या दृश्यात श्री महाकाली तेजतत्त्वाच्या माध्यमातून सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे निर्माण झालेले सगुण-निर्गुण स्तरावरील त्रास नष्ट करण्याचे कार्य करत असल्याने श्री महाकालीदेवीने शिवपिंडीकडे न पहाता समोर बघणे आणि ही देवीची मारक स्थिती असणे : डोळे तेजतत्त्वाशी निगडित आहेत. श्री महाकालीतत्त्वही तेजतत्त्वाशी निगडित आहे. अनेक पुराणांमध्ये श्री महाकालीदेवीने डोळ्यांतून तेजतत्त्व प्रक्षेपित करून राक्षसांचा संहार केल्याच्या कथा आढळतात. सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे सगुण स्तरावर त्रास निर्माण झाल्यावर देवतांचे शस्त्र-अस्त्र यांतून शक्ती प्रक्षेपित होऊन ते त्रास नष्ट केले जातात. याउलट सूक्ष्मातील वाईट शक्तींमुळे सगुण-निर्गुण स्तरावर त्रास निर्माण झाला असेल, त्या वेळी देवतांचे डोळे आणि मुद्रा यांतून शक्ती प्रक्षेपित होऊन ते त्रास नष्ट केले जातात. साधिकेला दिसलेल्या दृश्यातही श्री महाकालीदेवी सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे निर्माण झालेले सगुण-निर्गुण स्तरावरील त्रास नष्ट करत होती. या प्रक्रियेत देवीच्या डोळ्यांतून तेजतत्त्वाशी निगडित मारक शक्ती प्रक्षेपित होत होती. यामुळे साधिकेला दिसलेल्या दृश्यात श्री महाकालीदेवीच्या हातात शस्त्र-अस्त्र इत्यादी न दिसता शिवपिंडीचे पूजन करतांना श्री महाकालीदेवी समोर बघत असल्याचे दिसले आणि तिच्याकडून तसे चित्र रेखाटले गेले.
५ आ ४. साधिकेने नामजपादी उपायांना भावप्रयोगाची जोड दिल्याने तिला तारक-मारक स्थितीतील श्री महाकालीदेवीचे दर्शन होणे : साधिका तिला होत असलेले त्रास दूर करण्यासाठी नामजपादी उपाय करत होती. या उपायांना तिने भावप्रयोगाची जोड दिली. भावप्रयोग हे तारक शक्तीशी, तर नामजपादी उपाय हे मारक शक्तीशी निगडित आहेत. दोन्ही शक्तींचा सुरेख संगम झाल्याने साधिकेला तारक-मारक स्थितीतील श्री महाकालीदेवीचे दर्शन झाले.
‘शिवपिंडीचे पूजन करणे’, हे कालीमातेची तारक स्थिती दर्शवते, तर ‘श्री महाकालीदेवीने शिवपिंडीकडे न बघता समोर बघणे’, हे तिने डोळ्यांतून मारक शक्ती प्रक्षेपित करून सूक्ष्मातील वाईट शक्तींचा संहार करण्याचे म्हणजेच तिच्या मारक स्थितीचे प्रतीक आहे. साधिकेला दिसलेल्या दृश्यात श्री महाकालीदेवी तारक-मारक स्थितीत कार्य करत आहे’, असे यांतून स्पष्ट होते.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)(आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.९.२०२२, संध्याकाळी ६.०९)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |