संभाजीनगर येथे ‘पी.एफ्.आय.’चा मोठा अड्डा !
युवकांना जिहादी प्रशिक्षण देत असल्याचा संशय !
संभाजीनगर – येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) संघटनेच्या माध्यमातून मुसलमान युवकांना जिहादी आणि धर्मांध यांचे धडे देऊन त्यांचे ‘ब्रेन वॉश’ करत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘पी.एफ्.आय.’च्या विरोधात राज्यात चालू असलेल्या कारवाईनंतर अनेक कार्यकर्त्यांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे.
१. संभाजीनगर जिल्ह्यात पोलिसांनी ‘पी.एफ्.आय.’च्या ५-६ जणांना कह्यात घेतले आहे. कह्यात घेण्यात आलेला माजी जिल्हाध्यक्ष शेख इरफान, सय्यद फैजल, परवेज खान, अब्दुल हबीब आणि नासिर शेख यांची कसून चौकशी केली जात आहे.
२. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सय्यद फैजल हा केरळ येथून प्रशिक्षण घेऊन आला होता.
३. तो नारेगाव आणि पडेगाव या ठिकाणी जागा भाड्याने घेऊन काही मुलांना प्रशिक्षण देत होता, तसेच त्याने आतापर्यंत बीड, परळी अन् जालना येथे काही लोकांना प्रशिक्षण दिले असून काही बँकांमधून त्याने लाखो रुपयांचे व्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे.
४. परवेज खान हा फैजल याचा साहाय्यक (असिस्टंट) म्हणून काम करत होता. परवेजकडून भ्रमणसंगणकासह (‘लॅपटॉप’सह) काही गोष्टी कह्यात घेतल्या आहेत.
५. राज्य समितीचा सदस्य शेख इरफान इस्लामिक राष्ट्राच्या कटात अग्रणी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक बँकांत त्याने लाखो रुपयांचे व्यवहार केले असून मदरशांमधील तरुणांना जिहादचे प्रशिक्षण देण्याचे दायित्व त्याच्यावर असल्याचा संशय आहे. नाशिक, नांदेड, संभाजीनगर आणि मुंबई येथे त्याच्यावर ४ गुन्हे नोंद आहेत.
६. अब्दुल हबीब याच्यावर विद्रोही विचार पसरवण्याचे दायित्व असल्याचे समजते. त्याच्या घरात आक्षेपार्ह कागदांचे अनेक पुरावे सापडले आहेत. त्याच्या चेतावणीनंतरच मराठवाडा येथे अनेक जण कार्यरत असून तो महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगण्यात आले आहे.