मानव आणि वन्यजीव संघर्ष !
२ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत चालू असलेल्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने
१. जंगलाचे स्वरूप लहान लहान तुकड्यांमध्ये पालटल्याने ‘मानव आणि वन्यजीव संघर्ष’ निर्माण होणे
‘प्राचीन काळापासून विचार केला, तर भारत हा जैवविविधतेने समृद्ध असणारा भूभाग आहे. दक्षिण भारतातील विषुववृत्तीय जंगले, उत्तरेत हिमालयात निर्माण झालेली बर्फाळ प्रदेशातील वने, पूर्व (ईशान्य) भारतात असणारी घनदाट जंगले आणि वायव्य भारताकडे निर्माण झालेली वाळवंटे ही सर्व नैसर्गिकरित्या आढळून येतात. याखेरीज संपूर्ण भारतात अनेक प्रकारची वने आहेत. यात प्रामुख्याने पानगळतीची वने, गवताळ आणि मैदानी प्रदेश, खुरटी वने यांचा समावेश होतो. अशा प्रकारची जैवविविधता एका देशात असणे, हे मोठे भाग्यच म्हणावे लागेल; मात्र गेल्या काही दशकांमध्ये जागतिक औद्योगिकरणाच्या परिणामामुळे जगभरातील जंगले नष्ट होत आहेत. त्याचा परिणाम भारतीय जंगलांवरही झालेला दिसून येतो. सध्या भारतात जवळपास सर्वच ठिकाणी पसरलेल्या जंगलांचे स्वरूप आता एकमेकांपासून वेगळ्या आणि लहान लहान तुकड्यांमध्ये पालटले आहे. त्याचे अनेक वाईट परिणाम असले, तरी त्यातील एक महत्त्वाचा आणि सध्या वाढत चाललेला परिणाम म्हणजे ‘मानव आणि वन्यजीव संघर्ष’ हा आहे.
२. प्रदेशानुसार पालटत जाणारे मानव आणि वन्यजीव संघर्षाचे स्वरूप
तसे पाहिले, तर मानव आणि वन्यजीव संघर्ष हा काही नवीन नाही. प्रत्यक्षात गेल्या काही शतकांपासून मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष चालू आहे. संपूर्ण भारताचा विचार केला, तर साधारण १०० ते १५० वर्षांपूर्वी भारतामध्ये १ सहस्रहून अधिक लोक प्रतिवर्षी वन्यप्राण्यांच्या आक्रमणाला बळी पडायचे. सध्या हे प्रमाण १०० हून अल्प झाले आहे. यावरून मानव आणि वन्यजीव संघर्ष न्यून होत आहे, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. सध्याचा विचार केला, तर जीवितहानी होण्याचे प्रमाण अल्प झाले आहे; परंतु संपूर्ण भारतभर असणारे मानव आणि वन्यजीव संघर्षाचे स्वरूप पालटून देशातील ठराविक ठिकाणी त्याची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येते, तसेच विविध ठिकाणी स्थानिक वन्यजिवांनुसार होणारे परिणामही पालटत आहेत, उदा. दक्षिण भारत, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या भागांतील काही ठिकाणी हत्तींपासून हानी होतांना दिसून येते. महाराष्ट्रातील जुन्नर, हिमालयातील गढवाल आणि कुमाऊं या प्रदेशांत बिबट्यांपासून त्रास होतो, मध्य भारताचा विचार करता तृणभक्षक प्राण्यांपासून शेतीची मोठ्या प्रमाणात हानी होते आणि मांसाहारी प्राण्यांपासून होणारी आक्रमणे, हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे वन्यजीव आणि मनुष्य यांचा अभ्यास करतांना स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करणे सर्वांत महत्त्वाचे ठरते.
३. विदर्भात गेल्या १० वर्षांत वन्यजिवांकडून अनुमाने २ सहस्र मनुष्यांवर आक्रमणे होणे, तर १० सहस्रांहून अधिक पाळीव पशूधनाची हानी होणे
महाराष्ट्रातील वाघांच्या एकूण संख्येपैकी साधारण ८० ते ९० टक्के संख्या चंद्रपूर या एका जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी आणि कधीही कोणता वन्यप्राणी पहायला मिळेल, हे सांगू शकत नाही. महाराष्ट्रातील विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती पहायला मिळते. विदर्भातील काही जिल्ह्यांचा विचार करता गेल्या १० वर्षांत अनुमाने २ सहस्र मनुष्यांवर वन्यजिवांकडून आक्रमणे झाली आहेत, १० सहस्रांहून अधिक पाळीव पशूधनाची हानी झाली आहे आणि ६० सहस्रांहून अधिक ठिकाणी शेतीच्या हानीच्या नोंदी वनविभागाकडे उपलब्ध आहेत. संपूर्ण भारताचा विचार करता विदर्भ हा मध्य भारतामध्ये स्थित असून त्याला ‘सेंट्रल इंडियन लँडस्केप’ या नावानेही संबोधले जाते. मध्य भारतातील हा परिसर ५ राज्यांमध्ये पसरला असून तेथे जंगल, तसेच वन्यजीव यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वन्यजिवांकडून होणारी हानीही मोठ्या प्रमाणावर आहे. अशाच प्रकारची परिस्थिती स्थानिक भागानुसार पालटलेली दिसून येते.
४. वन्यजिवांविषयी संशोधन करणार्या संस्था आणि संशोधक यांची संकुचित मानसिकता
मध्य भारतात साधारण १५ हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देश पातळीवर संशोधन करणार्या संस्था वन्यजिवांचा अभ्यास करतात. कामाच्या संदर्भात या संस्थांचा एकमेकांशी असणारा समन्वय फारच अल्प प्रमाणात आहे. प्रत्येक संस्था आणि तेथे कार्यरत असणारे संशोधक त्यांच्या पद्धतीनुसार काम करत असतात. प्रत्येकालाच त्याचे काम इतरांहून उच्च पातळीचे आहे, असा अभिमान निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक वेळा विविध बैठकांमध्ये किंवा वनविभागाने बोलावलेल्या बैठकांमध्ये एक संस्था दुसर्या संस्थेने केलेले काम कसे चुकीचे आहे आणि त्यात किती त्रुटी आहेत ? हे दाखवण्याच्या प्रयत्न करते. त्यांच्याकडून एकमेकांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जातात. प्रत्येक संस्था सर्वकाही आपल्यालाच करायला मिळावे आणि अन्य संस्था यातून कशा बाहेर पडतील ? याच प्रयत्नात असतात. या संस्थांमध्ये कार्यरत असणारे संशोधकही या क्षेत्राकडे (वन्यजीव संघर्षाकडे) स्वतःचे भवितव्य घडवण्याचे आणि पैसा मिळवण्याचे साधन या दृष्टीकोनातून पहातात. त्यामुळे त्यांनी काढलेल्या उपाययोजनाही वरवरच्या वाटतात. त्यांच्यात ‘मुळातच वन्यजीव संघर्ष हा भवितव्य घडवण्याचा भाग नाही, तर आपण मानव आणि वन्यप्राणी या दोघांच्या रक्षणासाठी महत्त्वाचे काम करत आहोत’, ही जाणीव फारच अल्प प्रमाणात पहायला मिळते.
५. हानीभरपाई मिळवून देण्यासाठी वनविभागाच्या कर्मचार्याने शेतकर्याकडे ५०० रुपयांची लाच मागणे
वनविभागाच्या कार्यपद्धतीनुसार एखादी घटना घडल्यानंतर तिचा पंचनामा केल्यानंतरच पुढील प्रक्रिया चालू होते. काही गावांमध्ये वनविभागाविषयी असणार्या रोषामुळे पोलीस घटनास्थळी पोचल्याविना वनविभागाचे कर्मचारी तेथे पंचनामा करण्यासाठी जात नाहीत. काही वेळा तर घडलेल्या घटनेचा पंचनामा कार्यालयातूनच केला गेल्याचे निदर्शनास आले आहे. विदर्भातील एका घटनेमध्ये शेतकर्याच्या बैलाची वाघाने शिकार केली, तेव्हा वनविभागाच्या कर्मचार्यांनी हानीभरपाईची प्रक्रिया चालू करण्यापूर्वी शेतकर्याकडे ५०० रुपयांची लाच मागितली. त्या वेळी त्या शेतकर्याची परिस्थिती चांगली नसल्याने त्याने लाच दिली नाही. परिणामी त्या शेतकर्याला हानीभरपाई मिळाली नाही. त्यानंतर पुढील काही दिवसांतच पुन्हा दुसर्या बैलाचीही शिकार झाली आणि वन कर्मचार्यांनी पुन्हा लाच मागितली. या वेळी शेतकर्याने लाच तर दिली नाहीच; पण शिकार केलेल्या बैलामध्ये विष घालून वाघालाही मारून टाकले.
६. दारुड्याने त्याचा वाहन अपघात रानडुक्कराच्या नावावर खपवून वन विभागाकडून हानीभरपाई मिळवणे
एका बाजूला वाघांचे रक्षण होऊन वाघांची संख्या वाढावी, यासाठी कोट्यवधी रुपये व्यय केले जातात, तर त्याच विभागातील लाचखोर कर्मचार्यांच्या चुकीमुळे वाघांचे प्राण जातात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणार्या नवेगाव नागझिरा अभयारण्यातील मंगेझरी (जिल्हा गोंदिया) गावाच्या चहुबाजूंनी जंगल पसरलेले आहे. एका प्रसंगात गावातील इतर मागासवर्गियांमध्ये मोडणारी व्यक्ती रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला घराच्या बाहेर आली होती. तेव्हा घराजवळच असणार्या अस्वलाने तिला गंभीर घायाळ केले. या घटनेनंतर पुढील १-२ दिवसांनी घडलेल्या अन्य एका घटनेत रात्रीच्या वेळेस दारू पिऊन गाडीवरून घरी जात असतांना गावातील गोंड समाजाच्या व्यक्तीचा अपघात झाला आणि तिचा पाय मोडला. या गावात केवळ चारच कुटुंबे इतर मागासवर्गीय समाजाची आहेत, तर उर्वरित सर्व गोंड समाजाचे आहेत. गोंड समाजाच्या लोकांनी दारू पिऊन घायाळ झालेल्या व्यक्तीला रानडुक्कर धडकल्याने पाय मोडल्याचा खोटा प्रसंग निर्माण केला आणि वनविभागाच्या कर्मचार्यावर दबाव टाकून तशी नोंद करायला लावली. दुसरीकडे अस्वलाच्या आक्रमणात घायाळ झालेल्या इतर मागास वर्गातील व्यक्तीची नोंदही होऊ दिली नाही. परिणामी दारू प्यायलेल्या व्यक्तीला हानीभरपाई मिळाली आणि अस्वलाच्या आक्रमणात घायाळ झालेल्या व्यक्तीला काहीच हानीभरपाई मिळाली नाही. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतींमध्ये पालट होणे आवश्यक आहे.
७. वनसंरक्षणासाठी लोकांची मानसिकता पालटणे आवश्यक !
अ. गेल्या काही वर्षांत वन्यजिवांचा अभ्यास करतांना स्थानिक लोकांशी पुष्कळ संपर्क आला. सायंकाळच्या वेळी जंगलाजवळच्या गावातील एक महिला शेतातील कामावरून घरी जात होती. आमच्या गटातील एकाने त्यांना त्या भागात वाघ असल्याने घरी लवकर परतण्यास सांगितले. तेव्हा ती महिला धीटपणे म्हणाली, ‘‘घरी लवकर जाऊन तरी काय करणार ? आणि वाघाने खाल्ले तर काय झाले? माझ्या मुलांचे कल्याणच होईल. आम्ही आयुष्यात १० ते १५ लाख रुपये मिळवू शकत नाही. वाघाने मारले, तर तेवढे पैसे तरी मुलांना मिळतील.’’ अशा प्रकारची मानसिकता बर्याच ठिकाणी आढळून आली.
आ. मध्य भारतात लोकांनी जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी किंवा अन्य वन्य वस्तू गोळा करण्यासाठी जाऊ नये; म्हणून वनविभागाने विविध योजना राबवल्या. त्यात घरगुती वापराच्या गॅस पुरवठ्यापासून ते गोबरगॅस बांधून देणे, गावात रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी दिव्यांची सोय करणे, उपजीविकेसाठी आर्थिक लाभ होण्यासाठी विविध प्रशिक्षणे देणे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एवढे प्रयत्न करूनही यातील बर्याच योजना अयशस्वी झाल्याचे दिसून येते. गावात घरगुती वापराचा गॅस दिल्यावरही लोकांची जंगलात जाऊन जळणासाठी लाकडे गोळा करण्याची सवय अजूनही बंद झालेली नाही. काहींनी तर मिळालेले गॅस सिलिंडर अन्य व्यक्तींना विकले आहेत.
इ. मध्य भारतात मोठ्या प्रमाणात मोहाची फुले गोळा केली जातात. पहिल्या वर्षी कारोनाच्या संसर्गामुळे दळणवळण बंदी असतांना विदर्भातील अनेक गावांमधील लोक कामधंद्याविना घरी रिकामे होते. तेव्हा उन्हाळ्यामध्ये मोहाची फुले गोळा करण्यासाठी लोकांची स्पर्धा असायची. ज्या झाडाजवळ जो पहिल्यांदा पोचेल त्याचे ते झाड, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पेंच अभयारण्य परिसरात वनविभागाच्या कर्मचार्यांनी अगदी पहाटे ४ वाजता भ्रमणभाषसंचाच्या विजेरीमध्ये मोह गोळा करतांना लोकांना पकडले होते. याउलट चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण गाव लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात जात होता आणि त्याच काळात वन्यजिवांकडून अधिक प्रमाणात आक्रमणेही झाली होती.
वरील उदाहरणे प्राथमिक स्वरूपाची आहेत. यावरून लोकांची मानसिकता पालटणे फारच आव्हानात्मक असल्याचे दिसून येते.
८. वन्यजिवांची संख्या वाढणे आणि त्यांनी पालटत्या परिस्थितीशी जुळवून घेणे
गेल्या २० वर्षांत वनविभाग आणि अन्य यंत्रणा यांनी राबवलेल्या उपक्रमांमुळे भारतात नष्ट होत चाललेल्या वन्यजिवांची संख्या परत वाढायला लागली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, भारतात वाढणारी वाघांची संख्या हे सर्व जगाने आदर्श मानले आहे. भारतीय तज्ञांच्या मते सध्या असणार्या जंगलांमध्ये जेवढी वाघांची संख्या आहे, त्याहून कितीतरी अधिक प्रमाणात वाघ त्या जंगलांमध्ये राहू शकतात. प्रत्यक्षात बर्याच वेळा वाघांची मोठी झालेली पिल्ले ही अन्य ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे ती नागरी वस्तीत येत आहेत. अशा बिथरलेल्या प्राण्याकडून मनुष्यावर आक्रमणे झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यासमवेतच आजूबाजूच्या परिस्थितीनुसार वन्यप्राणी त्यांच्यात पालट करत असल्याचे दिसून येत आहे, उदा. उत्तरप्रदेशातील पिलीभीत किंवा महाराष्ट्रातील जुन्नर येथे उसाच्या शेतीमध्ये बिबट्यांचा असणारा वावर, दक्षिण भारत आणि आसाम भागात चहाच्या मळ्यांमध्ये हत्तींचा वावर, मध्य भारतामध्ये शेतीमध्ये वाघ किंवा अन्य प्राण्यांचा वावर हा नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी बिबट्यांनी पिल्लांना जन्म दिल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. यासमवेतच काही कालावधीपूर्वी भारत आणि बांगलादेश सीमेवरील कुंपणांमध्ये असणार्या साधारण ५ फूट रुंदीच्या दारातून हत्तींच्या कळपाने भारतात प्रवेश केला होता. याची चित्रफीत आजही ‘यू ट्यूब’वर पहाता येते. प्राण्यांचे निसर्गाचे ज्ञान मनुष्याहून चांगले असल्याने ते पालटत्या परिस्थितीशी लवकरात लवकर जुळवून घेत असल्याचे दिसून येते. याउलट मनुष्याला पालटत्या परिस्थितीशी जुळवून घेणे सहज शक्य होत नाही.
९. हत्तींकडून होणार्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी ‘नेचर कंझरवेशन फाऊंडेशन’ संस्थेचा उपक्रम यशस्वी होणे
गेल्या काही वर्षांत वनविभाग आणि संशोधक यांनी वन्यजीव संघर्ष अल्प करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचवल्या. यातील बर्याच उपाययोजना अपयशी ठरल्या आणि त्यांचा काही अंशीच उपयोग दिसून आला. येथे सर्वांत उपयोगी ठरलेली उपाययोजना सांगावीशी वाटते. हत्तींच्या आक्रमणांवर आनंद कुमार आणि त्यांचे सहकारी यांनी ‘नेचर कंझरवेशन फाऊंडेशन’ संस्थेच्या अंतर्गत विविध उपाययोजना राबवल्या. आनंदकुमार हे गेल्या २० वर्षांहून अधिक काळ तमिळनाडूतील वालपराई येथे हत्ती आणि मनुष्य यांच्या संघर्षावर अभ्यास करत आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार अधिकाधिक हत्तींकडून होणारी आक्रमणे ही रात्रीच्या वेळेत झाल्याचे निदर्शनास येते. त्यावर उपाय म्हणून त्यांनी प्रारंभीच्या काळात स्थानिक ‘केबल नेटवर्क’शी संपर्क करून प्रतिदिन सायंकाळी हत्तींचा वावर असणार्या भागांची माहिती तळपट्टीच्या स्वरूपात प्रसारित करण्यास प्रारंभ केला. कालांतराने भ्रमणभाष वापराचे प्रमाण वाढू लागल्यावर त्यांनी अधिकाधिक लोकांपर्यंत प्रतिदिन मोठ्या प्रमाणात लघुसंदेश पाठवण्यास प्रारंभ केला. वालपराई हा भाग ‘वेस्टर्न घाट्स’मध्ये येत असल्याने सर्वच ठिकाणी भ्रमणभाषचे ‘नेटवर्क’ उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांनी या अडचणीवर नवीन उपाययोजना काढली. त्यांनी संपूर्ण परिसराचा अभ्यास करून भ्रमणभाषसाठी ज्या पद्धतीचे मनोरे उभारले जातात, त्याच पद्धतीचे लांबून दिसतील, असे मनोरे बसवले आणि त्यावर दिवे लावले. एका विशिष्ट क्रमांकावर संपर्क केल्यावर ते दिवे चालू होतात. ज्या भागात हत्तींचा वावर आहे, त्या भागातील निवडलेले स्थानिक लोक दिवा चालू करण्याचे काम करतात. त्यामुळे सर्वांना हत्ती असल्याचे लक्षात येते. या उपाययोजनांमुळे वालपराई भागत हत्तींच्या आक्रमणांचे प्रमाण अतिशय अल्प झाले आहे.
या लेखातील सूत्रे ही प्राथमिक स्तरावरील आहेत. त्यामुळे संपूर्ण भारताचा विचार करता वन्यजीव आणि मनुष्य यांचा सखोल अभ्यास करून अन् स्थानिक परिस्थितीचा विचार करून पालटत्या काळानुसार उपाययोजना काढणे महत्त्वाचे ठरेल.’
– श्री. अमोल कुळवमोडे, वन्यजीव अभ्यासक, उंचगाव, कोल्हापूर (जुलै २०२२)
संपादकीय भुमिकाऔद्योगिकीकरणामुळे जंगले नष्ट होत असल्यामुळे त्याचा एक वाईट परिणाम म्हणजे मानव आणि वन्यजीव संघर्ष होय ! |