कात्रज (पुणे) येथील महापालिकेच्या विसर्जन हौदात गणपतीच्या मूर्ती भग्नावस्थेत पडून !
|
कात्रज (जिल्हा पुणे) – गणेशोत्सव संपून १ मास होऊनही महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विसर्जन हौदामध्ये अनेक श्री गणेशमूर्ती भग्नावस्थेत पडलेल्या आहेत. कात्रज भागातील महापालिकेच्या राजस सोसायटीजवळ असणार्या ‘कमला सिटी सोसायटी’ हौदात घरगुती गणपतीच्या अनेक मूर्ती पडून आहेत. त्यामुळे तेथे साठलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे. गेल्या मासापासून येथे डेंग्यूचे रुग्णही आढळून आले आहेत. त्यामुळे ‘या श्री गणेशमूर्ती येथून हलवून हौद स्वच्छ करावेत’, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. (अशी मागणी करावी लागते, हे प्रशासनास लज्जास्पद ! – संपादक)
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे संपर्क साधला असता औषध मारण्यासाठी कर्मचारी येतो. तो ‘पाणी साठलेल्या जागा कोरड्या ठेवा, अन्यथा दंडात्मक कारवाई होईल’, असे ठणकावून सांगून जातो; पण शेजारीच असलेल्या विसर्जन हौदाची अवस्था त्याला दिसत नाही. यामुळे स्थानिक संतप्त झाले आहेत.
संपादकीय भूमिकाविसर्जन हौदांतील श्री गणेशमूर्तींचे काय होते, याचे वास्तव जाणून गणेशभक्तांनी धर्मभावना दुखावणार्या पुणे महापालिकेला याविषयी खडसावले पाहिजे ! |