श्री महाकालीदेवी शिवपिंडीवर अभिषेक करतांना आणि अर्धमहाकालेश्वर यांचे चित्र रेखाटतांना कु. रजनीगंधा कुर्हे यांना आलेल्या अनुभूती
१. श्री महाकालीदेवी शिवपिंडीवर अभिषेक करतांनाचे चित्र रेखाटतांना आलेल्या अनुभूती
१ अ. श्री महाकालीदेवी शिवपिंडीवर अभिषेक करतांनाचे दृश्य दिसणे, त्यानंतर देवानेच हे दृश्य चित्रबद्ध करण्याची आतून प्रेरणा देणे आणि ‘एवढे अवघड चित्र चित्रबद्ध कसे करायचे ?’, असा विचार आल्यावर ‘ते दृश्य मीच चित्रबद्ध करणार आहे. तू काळजी करू नकोस’, असा आतून आवाज ऐकू येणे : ‘२८.७.२०२२ या दिवशी दुपारी मी नामजप करण्यासाठी ध्यानमंदिरात बसले होते. त्या वेळी माझे भावजागृतीचे प्रयत्न आपोआप होऊन आतून शिवाचे स्मरण होत होते. तेव्हा मला ‘माझ्यासमोर मोठी शिवपिंडी आहे आणि साक्षात् श्री महाकालीदेवी त्या शिवपिंडीवर अभिषेक करत आहे’, असे दृश्य दिसले. मी श्री महाकालीदेवी शिवपिंडीवर अभिषेक करतांनाचे चित्र यापूर्वी पाहिले नव्हते. देवानेच मला आतून हे चित्र काढण्याची प्रेरणा दिली. तेव्हा माझ्या मनात ‘एवढे अवघड चित्र कसे काढायचे ?’, असा विचार आला. त्या वेळी मला ‘ते चित्र मीच काढणार आहे. तू काळजी करू नकोस’, असा आवाज आतून ऐकू आला.
१ आ. ‘चित्र कुणीतरी काढून घेत आहे’, असे जाणवणे : माझ्याकडून चित्र आपोआप रेखाटले जात होते. आधी माझ्याकडून शिवपिंडी रेखाटली गेली. नंतर श्री महाकालीदेवीचा मुकुट, मुख आणि इतर भाग आपोआप रेखाटले गेले. ‘जणूकाही हे चित्र माझ्याकडून वरपासून खालपर्यंत कुणीतरी काढून घेत आहे’, असे मला जाणवले.
१ इ. श्री महाकालीचे नेत्र रेखाटतांना ‘तिची दृष्टी शिवपिंडीवर असावी’, असे मला वाटत होते. त्यामुळे मी ‘तिची दृष्टी खाली आहे’, असे डोळे रेखाटण्याचा ३ वेळा प्रयत्न केला; परंतु माझ्याकडून ‘श्री महाकालीदेवी समोर बघत आहे’, असेच तिचे डोळे रेखाटले गेले.
१ ई. श्री महाकालीदेवीच्या गळ्यातील मुंडमाळा आपोआप काढली जाणे : मला श्री महाकालीदेवीच्या गळ्यात मुंडमाळा (देवीने मारलेल्या राक्षसांच्या मुंडक्यांची माळ) काढायची होती. त्या वेळी माझ्या मनात ‘मुंडमाळा कशी काढू ?’, असा विचार आला. त्याच वेळी माझ्याकडून ती आपोआप काढली गेली.
१ उ. श्री महाकालीदेवीचे मुख आणि नेत्र यांवर उग्रपणा असूनही तेथे भक्तीचा वास असल्याचे जाणवणे : देवीचे चित्र काढतांना मला तिच्याविषयी आतून पुष्कळ प्रेम वाटत होते. तेव्हा
श्री महाकालीदेवी ‘दुष्टांचा संहार करण्यापूर्वी शिवावर अभिषेक करत आहे’, असे मला वाटले. त्यामुळे ‘तिचे मुख आणि नेत्र यांवर उग्रपणा असूनही तेथे भक्तीचा वास आहे’, असे मला वाटले.
२. अर्धमहाकालेश्वराचे चित्र काढतांना आलेल्या अनुभूती
२ अ. नामजप करतांना श्री महाकाल आणि श्री महाकालीदेवी यांचे अर्धमहाकालेश्वराचे रूप डोळ्यांसमोर दिसू लागल्यावर ‘हे चित्रही काढ’, असे तो सांगत असल्याचे जाणवणे : पहिले चित्र काढून झाल्यावर मी खोलीत गेले असता मला पुन्हा नामजप करावासा वाटला. मी नामजप करत असतांना माझ्या डोळ्यांसमोर श्री महाकाल आणि श्री महाकालीदेवी यांचे अर्धमहाकालेश्वराचे अर्धमहाकालेश्वराचे रूप अनेक भुजांचे होते. अर्धमहाकालेश्वरे ‘हे चित्रही काढ’, असे मला सांगत असल्याचे जाणवले. त्यानंतर मलाही ‘हे चित्रही काढावे’, असे वाटले.
२ आ. चित्र आपोआप रेखाटले जाणे : सर्वप्रथम शिव आणि नंतर श्री महाकालीदेवी यांच्या जटा रेखाटल्या गेल्या. शिवाच्या नेत्रांनंतर श्री महाकालीचे नेत्र रेखाटले गेले. असे क्रमाक्रमाने दोन्ही बाजूंनी आपोआप चित्र रेखाटले गेले. हे चित्र रेखाटण्यास मला साधारण २० मिनिटे लागली.
२ इ. साक्षात् शिवाने श्री महाकाल आणि श्री महाकालीदेवी यांच्या रूपात अर्धमहाकालेश्वराचे दर्शन दिले असल्याने कृतज्ञता व्यक्त होणे : मी आतापर्यंत श्री महाकाल आणि श्री महाकालीदेवी यांचे अर्धनारीनटेश्वराचे रूप असलेले चित्र कुठेच पाहिले नव्हते; परंतु साक्षात् शिवाने त्या दोघांच्या रूपात अर्धनारीनटेश्वराचे दर्शन दिले. याबद्दल मला कृतज्ञता वाटली.
३. ‘हे चित्र का दिसले असावे ?’, असा साधिकेच्या मनात प्रश्न आल्यावर देवाने लक्षात आणून दिलेली सूत्रे
अ. २९.७.२०२२ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ झाला आहे आणि आपत्काळाची तीव्रता वाढत चालल्याने पृथ्वीवरील रज-तम नष्ट करण्यासाठी आता साक्षात् श्री महाकाल आणि श्री महाकालीदेवी सिद्ध झाले आहेत.
आ. ‘त्या दोघांची कृपा संपादन करण्यासाठी आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठीच जणू हे चित्र अर्चनभक्तीच्या स्वरूपात साकारले गेले आहे’, असे मला वाटले.
इ. चित्र काढल्यानंतर माझी आनंदावस्था पुष्कळ वेळ टिकून होती.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना
चित्र रेखाटून झाल्यावर देवानेच ते काढून घेतले, याबद्दल माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. साक्षात् शिवाने मला अर्धनारीनटेश्वराचे दर्शन दिले, यासाठी शिव आणि पार्वतीदेवी यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘हे गुरुमाऊली, ‘सूक्ष्म जगात काय घडत असते ?’, हे केवळ आपल्यालाच ठाऊक असते, तरीही तुम्ही वरील अनुभूती देऊन ‘साक्षात् ईश्वरच सगळे करवून घेतो’, हे मला अनुभवण्यास दिले. त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
‘या आपत्काळात आपल्याला अपेक्षित अशी साधना करण्याचे बळ आणि आशीर्वाद आम्हाला द्यावेत’, हीच आपल्या चरणी आर्ततेने प्रार्थना करते.’
– कु. रजनीगंधा कुर्हे, नागेशी, गोवा. (२९.७.२०२२)
(वाचा उद्याच्या अंकात : साधिकेकडून ‘शिवपिंडीचे पूजन करतांना श्री महाकालीदेवी समोर बघत आहे’, असेच चित्र रेखाटले जाण्यामागील शास्त्र)
|