ह्यूमस (सुपीक माती)
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘पालापाचोळा, वाळलेले गवत, भाजीपाल्याचे अवशेष, पिकांचे अवशेष, गांडूळ आणि अन्य कीटक यांची मृत शरिरे अशा घटकांचे विविध जिवाणूंच्या साहाय्याने विघटन होऊन जी काळ्या रंगाची भुसभुशीत ‘सुपीक माती’ बनते, तिला इंग्रजीत ‘ह्यूमस’ म्हणतात. विविध प्रकारच्या असंख्य सूक्ष्म जिवाणूंच्या माध्यमातून नैसर्गिकपणे सुपीक माती बनवण्याचे कार्य होत असते. सुपीक माती (ह्यूमस) हे झाडांना आवश्यक असणार्या सर्व प्रकारच्या जीवनद्रव्यांचा पुरवठा करणारे जणू स्वयंपाकघर आहे. उत्तम प्रतीची सुपीक माती (ह्यूमस) बनण्यासाठी नियमित आच्छादन करणे (पालापाचोळ्याने झाडाभोवतालची माती झाकणे), जिवामृताचा वापर करणे आणि द्विदल आंतरपिके (साहाय्यक पिके) घेणे, या तीनही घटकांची पूर्तता होणे आवश्यक आहे. नैसर्गिक पद्धतीने लागवड करतांना या तीनही घटकांची पूर्तता होते. येथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे, सुपीक मातीनिर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष लागवडीच्या ठिकाणी झाडांच्या मुळांजवळ पालापाचोळा इत्यादी विघटनशील पदार्थ कुजले तरच होते. ही प्रक्रिया कचरा कुजवण्याच्या डब्यात किंवा खड्ड्यात (कंपोस्ट बीनमध्ये) किंवा खतांच्या कारखान्यात होऊ शकत नाही.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१७.९.२०२२)