सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांचा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती असलेला भाव !
मंगळुरू, कर्नाटक येथील बालसंत पू. भार्गवराम प्रभु रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात काही कालावधीसाठी आले होते. त्या वेळी त्यांची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी भेट झाली. भेटीनंतर त्यांचा त्यांच्या आईशी झालेला संवाद येथे दिला आहे.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या सर्वांच्या माता असून त्या सर्वांवर पुष्कळ प्रेम करत असल्याचे पू. भार्गवराम प्रभु यांनी सांगणे
पू. भार्गवराम : साधक श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना ‘सद्गुरु माता’ असे का म्हणत आहेत ? (साप्ताहिक भक्तीसत्संगात साधक श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना ‘सद्गुरु माता’ असे म्हणत होते.)
सौ. भवानी प्रभु : त्या गुरु असल्याने साधक त्यांना ‘गुरु माता’ असे म्हणत आहेत.
पू. भार्गवराम : त्या सर्वांची माता असल्यामुळेच ना ? त्या माझीसुद्धा माता आहेत आणि त्या तुझीसुद्धा माता आहेत. त्या आपल्या सर्वांच्या माता आहेत; म्हणून त्या सर्वांवर पुष्कळ प्रेम करतात.
२. ‘पू. भार्गवराम यांनी दोन्ही देवींमध्ये एक श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ असून दुसर्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आहेत’, असे सांगणे
श्री दामोदर संस्थान, जांबवली, गोवा येथे देवीच्या २ मूर्ती आहेत. त्या संदर्भात बोलतांना पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘या दोन्ही देवींमध्ये एक श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आहेत आणि दुसर्या श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आहेत.’’ (जांबवली येथील देवीच्या दर्शनाला वर्षातून एकदा तरी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ येतात. हे मला समजल्यावर ‘पू. भार्गवराम त्या देवीचे तत्त्व अनुभवत आहेत’, असे मला वाटले.)
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाहिल्यावर पू. भार्गवराम यांचा भाव जागृत होणे आणि त्यांनी स्पर्श केल्यावर थंडावा जाणवून पू. भार्गवराम यांचे डोळे आपोआप मिटले जाणे
सौ. भवानी प्रभु : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना पाहून तुम्हाला काय जाणवते ?
पू. भार्गवराम : माझा भाव जागृत होतो.
सौ. भवानी प्रभु : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ तुम्हाला स्पर्श करतात. त्या वेळी तुम्हाला कसे वाटते ?
पू. भार्गवराम : मला थंडावा जाणवतो आणि जेव्हा त्या माझ्या पाठीवरून हात फिरवतात, तेव्हा माझे डोळे आपोआप मिटले जातात.
४. पू. भार्गवराम यांनी भक्तीसत्संगाच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आवाज ऐकल्यानंतर ‘तो पुष्कळ मधुर असून ऐकतच रहावा’, असे वाटत असल्याचे सांगणे
पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा आवाज ऐकून किती चांगले वाटते ना ! ‘त्यांचा आवाज ऐकतच रहावा’, असे मला वाटते. त्यांचा आवाज किती मधुर आहे ना !’’
५. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. भार्गवराम यांचा हात धरून जिना चढतांना त्यांना पुष्कळ उंच उंच जात असल्याचे जाणवणे
एकदा जिना चढत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ पू. भार्गवराम यांचा हात धरून त्यांना घेऊन गेल्या. तेव्हा माझी मनातल्या मनात प्रार्थना झाली, ‘आपणच पू. भार्गवराम यांना साधनेतही असाच हात पकडून पुष्कळ पुढे घेऊन जावे.’ काही वेळानंतर पू. भार्गवराम परत आल्यानंतर मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला कसे वाटले ?’’ तेव्हा पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘त्या मला पुष्कळ वर वर घेऊन जात होत्या. ‘संपूर्ण आश्रमात फिरतांना मी पुष्कळ उंच उंच जात आहे’, असे मला जाणवले.’’
६. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या सर्वच साधकांना छान सांगत असल्याने पुष्कळ संत सिद्ध होतील ना ?’, असे पू. भार्गवराम यांनी आईला विचारणे
एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी पू. भार्गवराम यांना एक गोष्ट सांगितली. ती ऐकून खोलीच्या बाहेर आल्यानंतर पू. भार्गवराम मला म्हणाले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला किती छान सांगितले ! त्या सर्व साधकांना अशाच प्रकारे शिकवतात ना ? त्यामुळे पुष्कळ संत सिद्ध होतील ना !’’
७. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघीही देवी असल्याने सारख्याच आवडत असल्याचे पू. भार्गवराम यांनी सांगणे
एक साधिका : पू. भार्गवराम, ‘तुम्हाला सर्वांत अधिक कोण आवडते ?’ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ कि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ?
पू. भार्गवराम : त्या दोघीही देवी आहेत ना; म्हणून मला त्या दोघीही सारख्याच आवडतात.
पू. भार्गवराम यांचा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या प्रतीचा भाव पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटते. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सहवासाचा आम्हाला लाभ होतो. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांची आई), मंगळुरू, कर्नाटक. (२४.९.२०२२)