पाश्चात्त्यांनी भारताला लुटले…!
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील डोनेस्त्क, लुहान्स्क, जपोरिज्जिया आणि खेरसॉन हे ४ भाग रशियाला जोडण्याच्या अधिकृत करारावर स्वाक्षरी केली. या वेळी त्यांनी पाश्चात्त्य देश आणि अमेरिका यांच्यावर जोरदार टीका केली. पुतिन म्हणाले की, रशियाने जागतिक नियमांप्रमाणे वागावे, अशी पाश्चात्त्य देश अपेक्षा करतात; पण स्वत: मात्र ते दुटप्पीपणाने वागतात आणि जगाची पूर्णपणे फसवणूक करतात. या वेळी त्यांनी एक महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, पाश्चात्त्यांनी मध्ययुगात स्वत:ची वसाहतवादी सत्ता चालू केली. त्यांनी भारत आणि आफ्रिका यांची लूट केली, अमेरिकेतील लोकांची कत्तल केली. पाश्चिमात्य देशांनी संपूर्ण देशाला अमली पदार्थांवर अवलंबून ठेवत संपूर्ण समुहाची कत्तल केली. पाश्चात्त्यांना रशियाचीही अशीच स्थिती करायची होती.
सुवर्ण आणि संपत्ती पळवली !
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी महत्त्वाच्या वेळी जगासमोर सत्य मांडले आहे. इतिहासात डोकावले, तर लक्षात येते की, इंग्रज, पोर्तुगीज, डच हे भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आले, असे वरकरणी वाटत असले, तरी त्यांना येथील सत्ताच हवी होती. त्यांना भारतावर एकछत्री सत्ता प्रस्थापित करत भारताची लूट करून स्वतःचे देश समृद्ध करायचे होते. यामध्ये ते यशस्वीही झाले. काही दिवसांपूर्वी ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडील सोने, मोती यांच्या दागिन्यांचा विषय पुष्कळ चर्चिला गेला. तेव्हा लक्षात आले की, त्यांच्याकडे जे अतिशय मौल्यवान दागिने आहेत, त्यामध्ये बहुतांश दागिने भारतातील आणि उरलेले आफ्रिकेच्या देशांतील आहेत. हे दागिने म्हणजे इंग्रजांनी भारतावर राज्य केलेल्या काळातील लुटीचा पुरावाच आहे. सर्व हिर्यांमधील सर्वांत मौल्यवान हिरा म्हणजे भारतातील कोहिनूर हिरा ! हा हिरा राणी स्वत: मुकुटात घालून वापरत.
ब्रिटिशांनी घडवलेल्या (?) काही मोजक्या दागिन्यांमध्ये जे हिरे, माणिक लावलेले दिसतात, तेही भारतीयच होते; कारण तशा प्रकारचे मोती, हिरे, माणिक यांचे उत्पादन भारतातच होत असे. काही इतिहासकारांनी केलेल्या उल्लेखांनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३२ मण सोन्याचे सिंहासन, छत्रपतींची भवानी तलवार, अनेक राजे-महाराजे यांच्या मौल्यवान वस्तू ब्रिटिशांनीच पळवल्या. त्यातील काही वस्तू ब्रिटिशांच्या संग्रहालयात आढळतात. राजीव दीक्षित यांनी त्यांच्या जुन्या भाषणांमध्ये उल्लेख केला आहे की, इंग्रज, पोर्तुगीज, डच भारतातून समुद्रमार्गे जी जहाजे भरून घेऊन जायचे, त्यात अनेक टन सोने-नाणे होते. काही वेळा ही जहाजे समुद्रात बुडायची, काही जहाजांवर समुद्री चाचे (चोर) आक्रमणे करून सोने पळवायचे, केवळ तेवढे सोनेच ब्रिटिशांना मिळत नसे. उर्वरित सर्व सोने त्यांनी भारतातून लुटले आणि त्यानंतर ते देश श्रीमंत अन् समृद्ध झाले. भारतातील उत्तमोत्तम कापड, मसाल्याचे पदार्थ, वनस्पती, तेल ब्रिटिशांनी चोरून नेले आणि भारतियांना जाडेभरडे साहित्य वापरण्यास ठेवले. दुसर्या शब्दांमध्ये सांगायचे झाले, तर संपन्न आणि समृद्ध भारताला इंग्रजानी अक्षरश: कंगाल केले ! हे अल्पच म्हणून कि काय, स्वातंत्र्यचळवळीत सहभागी लाखो निष्पाप भारतियांना इंग्रजांनी ठार केले, त्यांचे परिवार उद्ध्वस्त केले, येथील गुरुकुलव्यवस्था, कायदेप्रणाली, राज्यव्यवस्था नष्ट केली आणि भारताला दारिद्र्याच्या खाईत लोटून दिले. या सर्वांकडे कानाडोळा करत येथील काही आधुनिक विचारवंत म्हणतात की, ब्रिटिशांमुळे भारतात रेल्वे आली, कारखाने उभे राहिले. कोणताही आक्रमणकर्ता कधी आक्रमण केलेल्या देशाचा, तेथील जनतेच्या हिताचा विचार करेल का ? इंग्रजांनी या व्यवस्था उभारल्या त्या भारतियांसाठी नव्हे, तर त्यांच्या स्वत:च्या लाभासाठी उभारल्या. इंग्रजांनी भारताची किती लूट केली आहे ? याची प्रत्येक तज्ञ वेगवेगळी आकडेवारी मांडत असला, तरी या लुटीला ‘अगणित’ हे विशेषण सर्वांत चांगल्या प्रकारे लागू पडू शकेल.
भारतियांना इतिहासाचा विसर !
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी किती अभ्यासपूर्वक हे विधान केले आहे, हे या विवेचनावरून लक्षात आले असेल. इंग्रज आणि अन्य पाश्चात्त्य देश यांनी भारत अन् अन्य गुलाम बनवलेले देश यांची किती लूट केली आहे ? याची चर्चा भारतीय आणि विदेशी प्रसारमाध्यमे यांमध्ये विशेष केली जात नाही. त्यामध्ये त्यांना स्वारस्य नसते. ‘केवळ इंग्रजांनी भारतासाठी काय केले ?’, याचाच पाढा वाचला जातो. इंग्रज व्यापारासाठी भारतात येण्यापूर्वी तत्कालीन एका प्रवाशाने प्रवासवर्णनात लिहून ठेवले आहे, ‘मी संपूर्ण भारत फिरलो; मात्र मला येथे एकही भिकारी आढळून आला नाही. येथे संपन्नता आहे. लोक सुसंस्कृत आहेत.’ ‘भारतात सोन्याचा धूर निघायचा’, ही केवळ आख्यायिका नसून वस्तूस्थितीच आहे. त्याचे कारण भारतात पूर्वापार धर्माचरण केले जायचे, गुरुकुल शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थी सुसंस्कृत, नैतिकता असलेले आणि विद्वान निपजायचे. न्यायदानाची चांगली पद्धत होती. गुन्ह्यांचे प्रमाण अल्प होते. लोक कष्टाळू होते आणि ईश्वरप्राप्तीसाठी काम परिपूर्ण करायचे, कलांचा विकास होता. भारताचे हे वैभव इंग्रजांच्या डोळ्यांत खुपले आणि त्यांनी भारताची केवळ लूट करून समाधान मानले नाही, तर भारताची ही संपन्नता पार धुळीस मिळवली. यासाठी त्यांनी येथील व्यवस्था नष्ट करण्याचे पातक केले आणि त्याचे भयावह दुष्परिणाम आजही भारतीय भोगत आहेत. ‘जे राष्ट्र स्वत:चा इतिहास विसरते, ते भविष्य घडवू शकत नाही’, असे एक वचन आहे. साम्यवादी इतिहासकारांनी भारताचा चुकीचा इतिहास लिहून भारतियांना त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार यांचा विसर पाडला. परिणामी स्वातंत्र्यानंतरच्या इंग्रजाळलेल्या पिढ्यांना इंग्रज हे देवतेचे रूपच वाटू लागले. भारतियांचे डोळे उघडण्याचे काम पुन्हा एका साम्यवाद्यानेच केले आहे, हे विशेष ! आता एवढ्यावरच न थांबता इंग्रजांनी लुटलेल्या भारताच्या सर्व संपत्तीचा हिशोब करून ती सव्याज वसूल करणे, हे मोठे राष्ट्रकार्य शासनकर्त्यांनी करून भारताचा गौरव वाढवावा, ही अपेक्षा !
भारताची लूट करणार्या इंग्रजांकडून सर्व अमूल्य संपत्ती सव्याज वसूल करणारे शासनकर्ते हवेत ! |