बलपूर्वक होणार्या धर्मांतराला महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध घालावा ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री
‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या युवतीच्या कुटुंबियांची पर्यटनमंत्र्यांनी घेतली भेट !
मुंबई – बलपूर्वक होणार्या धर्मांतराच्या विरोधात उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश यांनी योग्य पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र सरकारनेही याला प्रतिबंध घालावा, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. १ ऑक्टोबर या दिवशी मंगलप्रभात लोढा यांनी चेंबूर येथे जाऊन लव्ह जिहादला बळी पडलेल्या रूपाली चंदनशिवे हिच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना लोढा यांनी वरील आवाहन केले.
या वेळी मंगल प्रभात लोढा म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूपाली चंदनशिवे हिच्या कुटुंबियांची भेट घेण्यास मला सांगितले. त्यानुसार मी इथे आलो. येत्या २-३ दिवसांत याविषयी गृहमंत्र्यांशी चर्चा करून पुढील दिशा निश्चित करण्यात येईल. रूपाली हिच्या हत्येची जलदगती न्यायालयात सुनावणी झाली पाहिजे. दोषींना कठोर शासन झाले पाहिजे. याविषयी मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी माझी चर्चा झाली. या कुटुंबियांना काय साहाय्य करता येईल, याविषयी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ.’’
रूपाली चंदनशिवे हिने ३ वर्षांपूर्वी इक्बाल शेख याच्याशी विवाह करून धर्मांतर केले होते. काही दिवसांपासून इक्बाल हा रूपाली हिला इस्लामनुसार आचरण करण्यासाठी बळजोरी करू लागल्यामुळे दोघांचे खटके उडू लागले. त्यामुळे रूपाली वेगळी राहू लागली. काही दिवसांपूर्वी इक्बाल आणि रूपाली यांच्यात वाद झाला. त्या वेळी रूपाली हिने घटस्फोट मागितल्यावर इक्बाल याने भर रस्त्यात तिची गळा चिरून हत्या केली.