एक जन, एक राष्ट्र आणि एक संस्कृती हेच भारताचे राष्ट्रीयत्व !
१. ‘भारत अनेक संकटांवर मात करून सहस्रो वर्षे टिकल्याविषयीचे रहस्य मिखाईल गोर्बाचेव्ह यांना कळावे’, असे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना वाटणे
‘सोव्हिएत संघ कोसळण्यास प्रारंभ झाला होता. त्या वेळी वर्ष १९९१ च्या सुमारास ब्रिटनमध्ये तेथील माजी उच्चायुक्त कुलदीप नय्यर हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना एका कार्यक्रमात भेटले. सोव्हिएत संघाविषयी भाष्य करतांना त्या नय्यर यांना म्हणाल्या, ‘‘तुम्हा भारतियांचे आम्हाला आश्चर्य वाटते की, एवढी संकटे आणि समस्या असतांना तुम्ही ५ सहस्र वर्षे कसे काय टिकला ? त्याचे रहस्य काय ? ते रहस्य मिखाईल गोर्बाचेव्ह यांना सांगा, म्हणजे सोव्हिएत संघ अंतर्गत तुटण्यापासून कदाचित् वाचू शकेल.’’ थॅचर यांची मार्मिक टिप्पणी बाजूला ठेवू; परंतु त्यांनी भारताचे अस्तित्व सहस्रो वर्षे टिकण्याविषयीचा नय्यर यांना जो प्रश्न विचारला, त्याविषयी आपण समस्त भारतियांनी चिंतन करणे आवश्यक आहे.
(संदर्भ : दुबई येथील ‘गल्फ न्यूज’ (३.५.२००८) यामध्ये प्रसिद्ध झालेला कुलदीप नय्यर यांचा ‘व्हायलन्स डझ नॉट पे’ लेख)
२. हिंदुस्थानचे राष्ट्रजीवन प्रारंभापासून अखंडपणे चालू असून ते एक ‘सांस्कृतिक राष्ट्र’ म्हणून जिवंत असणे
जगाच्या इतिहासाकडे आपण दृष्टीक्षेप टाकला, तर असे लक्षात येईल की, काही राष्ट्रे निर्माण झाली, विकसित झाली, विकासाच्या शिखरावर पोचली आणि कालांतराने लोप पावली. खाल्दिया, बेबिलोनिया, असीरिया, युनान आणि जूलियस सिझरचा रोम ही राष्ट्रे आज कुठे आहेत ? कधी काळी ही राष्ट्रे एवढी उन्नत होती, तरी ती जगाच्या पटलावरून नष्ट झाली. भारतावर अनेक बाह्य आक्रमणे झाली, परकियांनी कित्येक वर्षे इथे राज्य केले, तरी येथील समाजजीवन मात्र निरंतर चालू राहिले. इतक्या विस्तीर्ण भूभागावर अनेक शतके आमचे सरकार (शासन) नव्हते आणि तांत्रिक भाषेत सार्वभौमत्व नव्हते; परंतु ‘सांस्कृतिक राष्ट्र’ म्हणून आम्ही जिवंत होतो. राष्ट्र हे विशिष्ट भूमीवरील लोकांची जीवनपद्धत आणि संस्कृत यांचे नाव आहे. राष्ट्राची विशिष्ट जीवनपद्धत आणि संस्कृती राष्ट्राला प्राणासारखी असते. हिंदुस्थानचे राष्ट्रजीवन प्रारंभापासून अखंडपणे चालू राहिले आहे.
३. ‘अमेरिकेत कुणीही आला, तरी तो तेथे एकात्म होतो’, हा अमेरिकेचा अभिमान ‘अँग्लो-सॅक्सन’ (जर्मनी भाषा बोलणारी जात) नागरिकांमुळे धुळीस मिळणे
भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही विद्वानांनी ब्रिटिशांच्या प्रभावाखाली येऊन देशात संयुक्त राष्ट्रीयता आणि संमिश्र संस्कृती यांचा उद्घोष चालू केला. वास्तविक पहाता या दोन्ही संकल्पना टिकाव धरू शकल्या, असे एकही उदाहरण या जगात नाही. या संदर्भात अमेरिकेचे उदाहरण दिशादर्शक ठरेल. युरोपमधील जर्मन, फ्रेंच, डॅनिश, स्वीडिश, ब्रिटीश आदी विविध देशांतील लोक अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले. पहिल्या महायुद्धापर्यंत ते त्यांच्या देशातील संस्कृतीचे प्रवक्ते राहिले. त्याविषयी त्यांना अभिमान होता. यामध्ये जर्मन नागरिकांची संख्या अनुमाने ९० लाख होती. जेव्हा इंग्लंड आणि जर्मनी यांच्यात युद्ध चालू झाले, तेव्हा तेथील जर्मन नागरिकांमध्ये अमेरिकेतील ‘अँग्लो-सॅक्सन’ नागरिकांच्या वर्चस्वाविषयी खळबळ निर्माण झाली. त्यातून जर्मन नागरिकांच्या मनात स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची कल्पना मूळ धरू लागली. त्या वेळी अमेरिकेत व्रुडो विल्सन हे राष्ट्राध्यक्ष होते. विल्सन यांनी जर्मन वंशाच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली. पहिल्या महायुद्धापर्यंत अमेरिकेला असा अभिमान होता की, इथे कुणीही आला, तरी तो एकात्म होतो. तो अभिमान ‘अँग्लो-सॅक्सन’ नागरिकांनी धुळीस मिळवला.
४. अमेरिकेत ‘अँग्लो-सॅक्सन’ नागरिकांवर निर्बंध घातल्यामुळे पहिल्या महायुद्धासारखी स्थिती दुसर्या महायुद्धाच्या वेळी निर्माण न होणे
त्या काळात अमेरिकेत ‘मेल्टिंग पॉट’ नावाचे एक नाटक रंगमंचावर आले होते. त्यात अमेरिकेच्या या गर्विष्ठ भावनांचे प्रतिबिंब पडले होते. जेव्हा जर्मन नागरिकांनीच विद्रोहाचा झेंडा उभा केला, तेव्हा अमेरिकी लोकांचे डोळे उघडले. वर्ष १९१८ ते १९३९ या काळात ‘अँग्लो-सॅक्सन’ नागरिकांनी ३ सांस्कृतिक आंदोलने चालवली. ‘अँग्लो-सॅक्सन’ राष्ट्र्रीयता हीच आधारभूत मानून बिगर ‘अँग्लो-सॅक्सन’ नागरिकांनी या संस्कृतीत एकात्म झाले पाहिजे’, अशी या आंदोलनांची प्रमुख भूमिका होती. त्यानंतर तेथे बाहेरून येणार्या बिगर ‘अँग्लो-सॅक्सन’ नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले. पुढे अमेरिकेला याचे फळ मिळाले. जेव्हा अमेरिकेने द्वितीय महायुद्धात सहभाग घेतला, तेव्हा त्यांच्यापुढे पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मन लोकांनी जी समस्या उभी केली होती, ती परत उद्भवली नाही. दुसरे उदाहरण कॅनडाचे आहे. तेथे फ्रेंच आणि इंग्रज एकत्र रहात होते. तेथेही ‘अँग्लो-सॅक्सन’ नागरिकांचे बहुमत आणि वरचष्मा होता. प्रारंभी साहजिकच संमिश्र संस्कृतीची गोष्ट पुढे आली.
५. कॅनडात रहाणार्या फ्रेंच लोकांमध्ये पृथक (वेगळे) राष्ट्रीयत्व आणि फ्रेंच राज्य यांची कल्पना पुढे येणे
पहिल्या आणि दुसर्या महायुद्धांमध्ये इंग्लंड अन् फ्रान्स एकत्र होते. त्यामुळे कॅनडामध्ये ‘अँग्लो-सॅक्सन’ची समस्या पुढे आली नाही; परंतु जेव्हा द गॉल हे फ्रान्सचे राष्ट्र्रपती बनले, तेव्हा कॅनडातील फ्रेंच लोकांमध्ये पृथक (वेगळे) राष्ट्रीयत्व आणि फ्रेंच राज्य यांची कल्पना पुढे येऊ लागली. नेपोलियनच्या महत्त्वाकांक्षेला अनुसरून द गॉल यांना फ्रान्सला युरोपातील ‘सर्वोत्तम राष्ट्र’ बनवायचे होते. त्याचाच परिणाम म्हणून कॅनडातील फ्रेंच लोकांमध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. त्यानंतर द गॉल हे कॅनडाच्या दौर्यावर गेले असतांना ते एका अभिनंदन सोहळ्यात सहभागी झाले. तेथे त्यांनी जाहीरपणे ‘पृथक फ्रान्सिसी राष्ट्र्र आणि राज्य’ यांच्या मागणीचे समर्थन केले. गॉल यांची ही भूमिका राजनैतिक शिष्टाचाराच्या विरोधात असल्यामुळे तेथे खळबळ माजली. परिणामत: गॉल यांना त्यांचा दौरा अर्धवट सोडून फ्रान्सला परतावे लागले, असे इतिहास सांगतो. पुढेही काही काळ कॅनडामध्ये फ्रेंच लोकांचे पृथकतावादी (स्वतंत्र होण्याचे) आंदोलन चालू राहिले. तेथे सांस्कृतिक एकात्मीकरण मात्र होऊ शकले नाही.
६. जगाच्या पाठीवर कोणत्याही लोकांना एकमेकांच्या संस्कृतीत एकात्म होता न येणे
याउलट भारतात एकात्मीकरणाची प्रक्रिया पहिल्यापासून चालू राहिली; परंतु जेव्हा ‘भारत एकात्म आहे’, असे म्हटले जाते, तेव्हा ते म्हणणार्यांवर संकीर्णतेचा आरोप केला जातो. ‘भारत एकात्म आहे’, असे म्हणणारी मंडळी ‘राष्ट्रीयता आणि आंतरराष्ट्र्रीयता यांमध्ये कोणताही भेदभाव अन् अंतर्विरोध नाही’, असे मानतात; परंतु ‘आपले हृदय विशाल आहे’, असे मिरवणारी मंडळी मात्र राष्ट्रीयता आणि आंतरराष्ट्र्रीयता या संकल्पनांमध्ये अंतर्विरोध समजतात. उदाहरणार्थ द्वितीय महायुद्धानंतर झेकोस्लावाकियामध्ये स्लाव आणि झेक हे दोन वंशांचे लोक एकत्र नांदू लागले; परंतु या दोन्ही वंशांचे लोक कम्युनिस्ट (साम्यवादी) असूनही विभिन्न संस्कृतींच्या कारणास्तव एकात्म होऊ शकले नाहीत. गंमत म्हणजे दोघेही आंतरराष्ट्र्रीयतावादी होते. या देशात रशियाने हस्तक्षेप करण्यापूर्वी वर्षभर स्लाव लोकांनी ‘त्यांचे वेगळे राष्ट्र आहे’, असा आग्रह धरला होता. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र राज्य हवे आणि रशियाला तसे करण्यास मान्य नसेल, तर स्लाव अन् झेक लोकांच्या स्वायत्त राज्यांना स्वीकृती देऊन दोघांचे संघराज्य बनवण्याची त्यांनी भूमिका मांडली. जेथे आंतरराष्ट्र्रीयतावादी लोकही एकमेकांच्या संस्कृतीत एकात्म होण्यास सिद्ध होत नाहीत, तेथे आपल्या देशातील ही मंडळी संयुक्त राष्ट्रीयता आणि संमिश्र संस्कृती यांच्या गोष्टी करतात, हे आश्चर्यजनक आहे.
७. ‘भारतीयता हीच राष्ट्रीयता आणि संस्कृती आहे’, यावर श्रद्धा ठेवून राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देणे आवश्यक !
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला. स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते, ‘विश्वातील सर्व राष्ट्रांमध्ये भारताचे विशेष जन्म लक्ष्य (Raison deter) धर्म आहे.’ महर्षि अरविंद यांनी उत्तरपाडा येथील विख्यात भाषणात याचा पुनरुच्चार केला होता. लोकमान्य टिळक यांनी भारताच्या विशेष कर्मयोगाविषयी भूमिका मांडली होती. म. गांधींनीही ‘हिंद स्वराज’मध्ये म्हटले होते, ‘इंग्रजांच्या आगमनापूर्वीपासून भारत आसेतु हिमाचल एक राष्ट्र्र होते.’
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्याचा स्वीकार केला. राजमुद्रा म्हणून सम्राट अशोकाचे चिन्ह स्वीकारले. संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या मागे ‘धर्मचक्र प्रवर्तनाय’ असे बोधवाक्य आहे. सरन्यायाधिशांच्या मागे वाक्य आहे, ‘यतो धर्म स्ततो जय:’, नौसेनेचे बीजवाक्य ‘शं नो वरुण:’, वायूसेनेचे आहे ‘नम: स्पृशं दीप्तं’ आणि भारतीय सैन्यदलाचे आहे ‘युद्धाय कृतनिश्चय:’ ! एवढेच काय, तर आपल्या राज्यघटनेतही या प्राचीनत्वाचे प्रतिबिंब उमटले आहे. प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांनी त्यांच्या सुंदर चित्रांच्या आधारे तिला अधिक देखणे बनवले आहे. त्यात प्रभु श्रीरामचंद्रांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत २२ चित्रे आहेत. त्यात इंग्रज राजवटीतील नेताजी, राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान, तर मोगल राजवटीतील गुरु गोविंद सिंह, छत्रपती शिवाजी महाराज आणि अकबर, अशी ६ चित्रे सोडली; तर उर्वरित चित्रे नालंदा विद्यापीठ, तथागत बुद्ध, महावीर जैन, वीर हनुमान, गीतोपदेश आणि प्रभु श्रीराम यांची आहेत. या चित्रांकडे बघतांना आपल्याला आपले अखंड राष्ट्रीयत्व आणि सांस्कृतिक प्रवाह यांची अनुभूती येते.
८. आपण भारतीय एक आणि आपली संस्कृती एकच !
सूत्र असे आहे की, ‘राष्ट्र्रउभारणीचा आपला मूळ पाया कोणता ?’, हे महत्त्वाचे ठरते. संमिश्र संस्कृती आणि संयुक्त राष्ट्र्रीयता या कल्पनांनी आपले राष्ट्र उभे राहू शकणार नाही. या देशात रहाणार्या प्रत्येकाला उपासना स्वातंत्र्य आहे. ते अबाधित ठेवून राष्ट्र म्हणून आपण सर्व जण एक आहोत, एका कुटुंबाचे सदस्य आहोत, एकाच विराट राष्ट्रपुरुषांचे अंग आहोत. भारत ही आमची मातृभूमी आहे. येथे एक अतीप्राचीन संस्कृती आणि सभ्यता आहे, याची कायम जाणीव हवी. आपल्या देशात एक जन, एक राष्ट्र्र, एक संस्कृती आहे. यावर सर्वांची श्रद्धा हवी आणि तसा सर्व भारतियांचा व्यवहारही हवा.’
– श्री. रवींद्र साठे, महासंचालक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (साभार : दैनिक ‘लोकसत्ता’)
संपादकीय भूमिकाभारताचे जन्म लक्ष्य ‘धर्म’ असल्याने भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूंनी कटीबद्ध व्हावे ! |