कराड (जिल्हा सातारा) येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने महाआरती !
आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हिंदुत्वनिष्ठ एकवटले !
कराड, १ ऑक्टोबर (वार्ता.) – तेलंगाणा येथील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह ठाकूर यांना तेलंगाणा सरकारने कथित गुन्ह्याप्रकरणी अन्याय्य अटक केलेली आहे. यातून त्यांची तात्काळ सुटका व्हावी आणि त्यांना संरक्षण देण्यात यावे, यासाठी कराड येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘स्वयंभू श्री आदिमाया दुर्गादेवी मंदिर’ येथे महाआरती करण्यात आली. महाआरतीसाठी हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत यांनी ‘हिंदु धर्म आणि गोमाता यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून धर्मकार्य करणारे आमदार टी. राजासिंह यांची त्वरित निर्दोष मुक्तता व्हावी, अशी भूमिका व्यक्त केली. त्यांनी या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करणार्या सर्वत्रच्या धर्मप्रेमींचे रक्षण होऊन त्यांना दैवी बळ मिळावे, अशी प्रार्थना श्री आदिमायादेवीच्या चरणी करण्याचे आवाहन केले. यानंतर उपस्थितांनी आमदार टी. राजासिंह यांच्या अटकेच्या विरोधात घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री आदिमायादेवीचा जयजयकार केला.
या वेळी श्री आदिमाया मंदिराचे अध्यक्ष श्री. राजेंद्र काटवटे, उपाध्यक्ष श्री. उदय भोकरे, खजिनदार श्री. सचिन मुळे, हिंदु एकता आंदोलनचे सातारा जिल्हा संघटक श्री. अजय पावसकर, भटक्या विमुक्त आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा हिंदु एकता जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश मुळे, करवडी ग्रामपंचायत सदस्य श्री. नानासाहेब पिसाळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सागर आमले, श्री. श्रीकृष्ण पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल कडणे, श्री. मनोहर जाधव, समस्त भोई समाजबांधव, तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.