छगन भुजबळ यांच्या विरोधात पुणे येथील ‘परशुराम सेवा संघा’ची कायदेशीर नोटीस !
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी श्री सरस्वतीदेवी संदर्भात टीका केल्याचे प्रकरण
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलतांना शाळेत होत असलेल्या श्री सरस्वती पूजनाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. याविरोधात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. भुजबळ यांनी समाजात अशांतता पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोप करत ‘परशुराम सेवा संघा’ने त्यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे. ‘नोटीस प्राप्त झाल्यानंतर ८ दिवसांच्या आत पत्रकार परिषद घेऊन देवी सरस्वतीविषयी केलेले चुकीचे वक्तव्य मागे घेऊन प्रामुख्याने विद्यार्थी वर्गाची, तसेच समस्त हिंदू समाज तथा ब्राह्मण समाजाची जाहीर क्षमा मागावी’, असे या नोटिशीत म्हटले आहे.
‘परशुराम सेवा संघा’चे पुणे प्रदेशाध्यक्ष, तसेच भारतीय जनता पक्षाचे उद्योग आघाडीचे सरचिटणीस विश्वजीत देशपांडे यांनी ही नोटीस दिली आहे.